कलिनरी ऑलिम्पिक्समध्ये भारतास रौप्यपदक
|
|
|
|
|
अलिबागचा शेफ देवव्रत जातेगावकरची करामत विवेक दिवाकर
२० किलो मार्जरिन या प्रकाराचे लोणी आणि दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अलिबाग येथील रॅडिसन्स ब्ल्यू या फाईव्ह स्टार हॉटेलमधील एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून कार्यरत असणाऱ्या देवव्रत आनंद जातेगावकर याने ‘वल्र्ड् इंटरनॅशनल शेफस् असोसिएशन’ आणि ‘जर्मन शेफस् असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने जर्मनीत जागतिक पातळीवरील ‘आय.के.ए.कलिनरी ऑलिम्पिक्स’ स्पर्धेत ‘ओ सिन्ड्रेला!’ हे मखमली शिल्प उभारून रौप्यपदक पटकाविले. अमेरिका, इंग्लड, जपान, कोरिया, इटली, फ्रान्स यांसारख्या जगभरातील ७५ राष्ट्रांतील जवळपास दोन हजार शेफस् या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते.
अशा प्रकारच्या ऑलिम्पिक आयोजनाला सुरुवात झाल्यापासून गेल्या २५ वर्षांपासून प्रथमच एक भारतीय शेफ या स्पर्धेत उतरला. या स्पर्धेत देवव्रत याने मार्जरिन प्रकारचे लोणी वापरून ३ * ३ * ३ फूट असे एक सुंदर भव्य शिल्प बनविले. खरे तर लोण्यासारख्या नाजूक पदार्थाचे एवढे मोठे शिल्प अलिबागपासून जर्मनीपर्यंत सांभाळून नेणे हेच एक आव्हान होते. परंतु सर्व अडचणींवर मात करून देवव्रत यांने त्याच्या ‘ओ सिन्ड्रेला!’ या शिल्पाला रौप्यपदक मिळवून दिले, असे हॉटेलतर्फे सांगण्यात आले. सिन्ड्रेला परिकथेतील अद्भुत क्षण देवव्रत याने आपल्या शिल्पातून जिवंत केला आहे. अन्याय, दारिद्रय़ यांनी गांजलेली मुलगी सिन्ड्रेला. दयाळू परी तिला राजकुमारी बनवून राजमहालात नृत्यासाठी पाठविते. परीची जादू फक्त मध्यरात्रीपर्यंतच टिकणार असते. रात्रीचे बाराचे ठोके पडून लागतात. सिन्ड्रेला महालातून बाहेर धाव घेते. राजपुत्र तिला मागून हाका मारत असतो. घाईत तिच्या पायातील बूट निसटून पडतो. पण मागे वळायला वेळ कुठे असतो? अशी सर्व कथा देवव्रतने आपल्या शिल्पात जिवंत केली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांबरोबर आपल्या अनुभवाविषयी बोलताना देवव्रत यांनी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला की, सर्वसाधारणपणे अशा ऑलिम्पिक्समध्ये भाग घेण्यासाठी प्रत्येक देश आपापल्या शेफस्ना स्पॉन्सर करत असतात. भारतानेही असेच आपल्या शेफस्ना आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी प्रायोजित केल्यास, या देशातील ‘हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री’ची भरभराट होण्यास मोठी मदत होईल. ‘रॅडिसन ब्ल्यू’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष विनय फडणीस यांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाल्याचे देवव्रत याने सांगितले. |