ऑस्ट्रेलियातील निवडणूक रिंगणात तब्बल ४० भारतीय
|
|
|
|
|
पीटीआय, मेलबोर्न
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांचा दबदबा वाढत असून व्हिक्टोरिया राज्यात होणाऱ्या स्थानिक निवडणुकीत तब्बल ४० भारतीय आपले नशीब आजमावत आहेत. व्हिक्टोरिया राज्याच्या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार ७७ जागांसाठी ४० भारतीय उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याशिवाय भारतीय वंशाचे १० उमेदवारही निवडणूक लढवीत आहेत. २६ ऑक्टोबरला होणाऱ्या या निवडणुकीत ऑस्ट्रेलियात अनेक सकारात्मक बदल होतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
या निवडणुकांच्या निमित्ताने भारतीय समुदायाच्या शक्तीचे पहिल्यांदाच प्रदर्शन होत आहे, असे मत ‘साऊथ एशियन टाइम्स’या भारतीयांसाठी चालविण्यात येणाऱ्या वृत्तपत्राचे मालक नीरज नंदा यांनी व्यक्त केले. यामधील अनेक उमेदवार हे राजकारणात नवखे आहेत, त्यामुळे बहुतेकांचा पराभव अटळ आहे तरीही त्यांचा सहभाग हीच लक्षणीय घटना असल्याचे नंदा यांनी स्पष्ट केले. पश्चिम मेलबोर्नमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या इम्तियाज खान यांनीही नंदा यांच्या मताला दुजोरा दिला. यंदाच्या निवडणुकीत चिनी उमेदवारांपेक्षा भारतीयांची संख्या अधिक आहे, ही आमच्यासाठी उत्साहवर्धक बाब आहे. या निवडणुकीत विजयी झाल्यास भारत-ऑस्ट्रेलियामधील संबंध अधिक दृढ व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खान यांनी सांगितले. तर ऑस्ट्रेलियामध्ये माहिती तंत्रज्ञान कंपनी ते सुपरमार्केटपर्यंत सर्वच क्षेत्रांत भारतीयांनी आपला ठसा उमटविला आहे, तर राजकारणाचा अपवाद कशाला? असा प्रश्न लेबर पक्षाचे सक्रिय सदस्य मनोज कुमार यांनी विचारला. भारतीयांनी ऑस्ट्रेलियन संस्कृतीमधील आपले योगदान वाढविण्याची वेळ आता आली आहे, असा दावा कुमार यांनी केला. |