गडकरींच्या कथित भ्रष्टाचाराविषयी काँग्रेसचे मौन
|
|
|
|
|
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या कंपन्यांमधील कथित भ्रष्टाचाराविषयी सोमवारी काँग्रेसने मौन धारण केले. एखाद्या व्यक्तीवरील वैयक्तिक आरोपांविषयी काँग्रेसला काहीही बोलायचे नाही. अशा भ्रष्टाचाराची दखल संबंधित शासकीय संस्था घेतील आणि कायदा आपले काम करेल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संदीप दीक्षित म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी अल्पावधीत बेहिशेबी संपत्ती जमविल्याचे अरिवद केजरीवाल यांनी आरोप केल्यापासून काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे. या मुद्दय़ावरून भाजपनेही काँग्रेसवर हल्ला चढविला आहे.
पण केजरीवाल यांनी गडकरी यांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवल्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी गडकरींवरील आरोपांची सखोल चौकशी करून या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा वैयक्तिक आरोपांमध्ये काँग्रेस पक्ष भूमिका घेणार नसल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. गडकरी यांच्या अखत्यारीतील कंपन्यांनी भ्रष्टाचार केला की नाही, याची चौकशी सेबी किंवा तत्सम सक्षम संस्थांना करता येईल. राज्य शासनालाही भ्रष्टाचाराच्या आरोपांची दखल घेऊन चौकशी करता येईल, असे दीक्षित यांचे म्हणणे आहे. गडकरींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मौन बाळगल्याने रॉबर्ट वढेरांवरून सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षावर होणाऱ्या आरोपांची तीव्रता कमी होईल, असे काँग्रेसला वाटत आहे. भाजपने वढेरा यांच्या भ्रष्टाचारावरून काँग्रेसवर तोफ डागण्याची तयारी चालविली असताना काँग्रेसने मात्र आक्रमक भूमिका घेण्याचे टाळले आहे. गडकरी यांच्यावर केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांना महत्त्व द्यायचे नसल्यामुळे काँग्रेसने अशी भूमिका घेतली आहे काय, असे विचारले असता दीक्षित यांनी नकारार्थी उत्तर दिले. |