राष्ट्रवादीत ‘चरबी’ वाढली!
|
|
|
|
|
८० टक्क्य़ांहून अधिक कार्यकर्ते वजनदार अभिजित घोरपडे , पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश कार्यकर्त्यांमध्ये ‘चरबी’ वाढल्याचे पुण्यात पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी झालेल्या आरोग्य तपासणीत स्पष्ट झाले. तपासणी केलेल्या कार्यकर्त्यांपैकी ८० टक्क्य़ांहून अधिक जणांची प्रकृती चांगली नसून, त्यांना वाढलेले वजन, वाढलेली चरबी, स्नायूंची ताकद कमी होणे अशा तक्रारी सतावत असल्याचे आढळून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसांचे अधिवेशन पुण्यात गेल्या शनिवार-रविवारी पार पडले. शिबिराच्या ठिकाणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश संघटक सचिव आशाबी शेख यांच्या ‘न्यूट्रीशिओ क्लब’तर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचा लाभ तब्बल ४४० कार्यकर्त्यांनी घेतला.
या तपासणीसाठी ‘कराडा स्कॅन’ ही आधुनिक यंत्रणा वापरण्यात आली. त्याद्वारे पोटातील चरबी, शरीरातील इतर चरबी, बॉडी-मास इंडेक्स (उंचीच्या तुलनेत वजन), स्नायूंची ताकद अशा गोष्टी तपासण्यात आल्या. या निकषांवरून कार्यकर्त्यांची प्रकृती ‘गुड’ आहे, ‘बॅड’ आहे की ‘अलार्मिग’ आहे असा शेरा देण्यात आला. त्यावरून बहुतांश कार्यकर्ते ‘अलार्मिग’ या गटात मोडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत तपासणी करणाऱ्या संगिनी पोळ यांनी सांगितले की, दोन दिवसांत साधारणत: ४४० जणांनी तपासणी करून घेतली. त्यापैकी सुमारे ३५० जणांची प्रकृती अलार्मिग असल्याचे आढळून आले. त्यापाठोपाठ सुमारे ८० जण ‘बॅड’ प्रकृतीचे असल्याचे स्पष्ट झाले, तर या निकषांवर ठणठणीत असलेल्यांची संख्या केवळ दहाच्या आसपास आहे. यामागे मुख्यत: खाण्यातील अनियमितता, पुरेशी झोप न घेणे, खाण्याच्या चुकीच्या सवयी, चांगले अन्न न खाणे ही कारणे आहेत. समाजात या व्याधींचे प्रमाण वाढत आहे, तेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून आले, असेही संगिनी यांनी सांगितले. जाडजूड कार्यकर्ते आलेच नाहीत! ही आरोग्य तपासणी मोफत असल्याने गावोगावचे सामान्य कार्यकर्तेच त्याचा लाभ घेत होते. महागडय़ा गाडय़ांमधून मिरवणारे, श्रीमंत कार्यकर्ते या तपासणीकडे वळलेच नाहीत. ‘जाडजूड व वजन वाढलेले कार्यकर्ते ही तपासणी करण्यासाठी आलेच नाहीत. ते असते तर चरबी वाढलेल्या कार्यकर्त्यांचे प्रमाण आणखी वाढले असते,’ असे निरीक्षण खुद्द संगिनी पोळ यांनीच नोंदवले. |