डहाणू नगर परिषदेची निवडणूक ४ नोव्हेंबरला
|
|
|
|
|
ठाणे, २४ ऑक्टोबर - डहाणू नगर परिषदेची निवडणूक येत्या ४ नोव्हेंबर रोजी होत असून, २५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी काही अपवाद वगळता आपले उमेदवार निश्चित केल्याने हळूहळू प्रचाराला सुरुवात होत आहे.
त्यासाठी विविध राजकीय पक्षांतील मोठय़ा नेत्यांना प्रचारासाठी आणून त्यांच्या सभा एक-दोनच राजकीय पक्ष घेणार असल्याने मैदाने मिळविण्यासाठी कोणत्याही पक्षात रस्सीखेच दिसून येत नाही. डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत २३ जागांसाठी १३२ उमेदवार िरगणात उभे आहेत. यापैकी महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे १२ महिला नगरसेविका म्हणून निवडून येणार आहेत. ६ प्रभागांतून २३ जागांसाठी ही निवडणूक लढविली जाणार असून, माकप ५, बहुजन विकास आघाडी २०, काँग्रेस आय २३, राष्ट्रवादी काँग्रेस २३, शिवसेना-भाजप युती २२, मनसे ३, आरपीआय २, तर अपक्ष २ जागा लढवीत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी प्रचाराची दिशा बदलली असून, जाहीर सभा, चौकसभा, सभागृहे येथे सभा घेऊन प्रचार न करता उमेदवारांसोबत, सर्व कार्यकर्त्यांसोबत मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे तंत्र अवलंबिले आहे, असे असले तरी २६ ऑक्टोबरला एका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि २ नोव्हेंबरला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार डहाणूत येत आहेत. तर १ नोव्हेंबर रोजी काँग्रेस आय पक्षाच्या प्रचारासाठी राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे डहाणूत येत आहेत. |