गडकरींना अडवाणींचा पाठिंबा
|
|
|
|
|
पीटीआय , नवी दिल्ली
आपल्या कंपनीतील आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या कंपनी व्यवस्थापकांच्या बचावासाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी सरसावले आहेत. गडकरी यांनी स्वतहून या आरोपाच्या चौकशीला सामोरे जाण्याच्या निर्णयाचे अडवाणी यांनी स्वागत केले आहे.
गडकरी यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणाचा कॉंग्रेसने राजनैतिकदृष्टय़ा गैरवापर करू नये, असे म्हटले आहे. शिवाय या प्रकरणामुळे भाजपला घाबरण्याचे कारण नाही, असेही अडवाणी यांनी स्पष्ट केले. याबाबत अडवाणी यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका जाहीर केली आहे. नितीन गडकरी यांनी त्यांच्या पूर्ती पॉवर अॅण्ड शुगर या कंपनीत बेकायदेशीरपणे निधी जमवल्याचा तसेच बोगस माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी कंपनी व्यवहार खात्याने गडकरी यांची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. गडकरी यांच्यावर कंपनीशी संबंधित बाबींबाबत आरोप करण्यात येत आहेत. तसेच त्यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर केल्याचे कुठेही निष्पन्न होत नाही. शिवाय कंपनी व्यवहार खात्याकडून करण्यात येणाऱ्या चौकशीत काहीही निष्पन्न होणार नसून गडकरी त्यातून निदरेष सुटतील, असे अडवाणी यांनी म्हटले आहे.या प्रकरणाचा पक्षाला कोणताही फटका बसण्याची शक्यता नसल्याचेही अडवाणी यांनी स्पष्ट केले. गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून काँग्रेसप्रणीत सरकारने राजकीय हेतूने प्रेरित त्याला राजकीय रंग देऊ नये. तसेच या प्रकरणी होणारी चौकशी निपक्षपातीपणे व्हावी,असे अडवाणी यांनी म्हटले आहे. दरम्यान, पूर्ती पॉवर अॅण्ड शुगर या कंपनीत अनेक घोटाळे झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर नितीन गडकरी यांच्या अध्यक्षपदाचा दुसरा टप्पा अडचणीत आला आहे. पक्षाचे खा.राम जेठमलानी यांनीदेखील पक्षाच्या हिताचा विचार करता नितीन गडकरी यांनी पदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी केली आहे.
सुषमा स्वराज, जेटली गडकरींच्या पाठीशी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी कंपनी घोटाळ्यांच्या आरोपांना घेरलेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बिनबुडाचे आरोप मान्य करून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याच्या गडकरी यांच्या भूमिकेलाही भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी विरोध केला आहे. पूर्ती पॉवर अॅण्ड शुगर या कंपनीत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाल्यानंतर गडकरी यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यावर गडकरी यांच्यावरील आरोप बिनबुडाचे असून आम्ही त्यांच्यामागे ठामपणे उभे असल्याचे सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर म्हटले आहे. |