राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री लक्ष्य
|
|
|
|
|
खास प्रतिनिधी, मुंबई
सोनिया गांधी, राहुल गांधी या काँग्रेस नेत्यांवर टीका करण्यात आली, पण त्याच वेळी शिवसेनेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुक केले. या मागचे गुपीत काय, असा सवाल करतानाच काँग्रेस-शिवसेनेत काही गुप्त समझोता आहे, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी व्यक्त केली. तसेच मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे भूखंड विकसित करण्याकरिता असलेली कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत घेण्यात आला आणि लगेचच त्याला स्थगिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती पुरविण्यात आली, की त्यामागे आणखी काही आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करीत राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आह़े
मुख्यमंत्री चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गेले काही महिने जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. राष्ट्रवादीच्या विरोधातील मोहिमेचे सूत्रधार मुख्यमंत्रीच असल्याचा संशय राष्ट्रवादीच्या गोटात व्यक्त केला जातो. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे भूखंड आणि शिवसेनेने मुख्यमंत्र्यांचे केलेले समर्थन यावरून राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांबद्दल संशयकल्लोळ निर्माण करण्याचा व्यक्त केला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सोनिया गांधी, शरद पवार, राहुल गांधी, अहमद पटेल, रॉबर्ट वढेरा, सुशीलकुमार शिंदे यांच्यावर यथेच्छ टीका करण्यात आली. पण मुख्यमंत्री चव्हाण यांच्याबद्दल चांगले मत व्यक्त केले गेले. मुख्यमंत्री चव्हाण यांच्याबद्दल चांगले मत व्यक्त केले गेल्याने शिवसेनेने एकप्रकारे राज्य सरकार चांगले काम करते, असे प्रशस्तीपत्रच दिल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हाणला. मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांचे कौतुक म्हणजे साऱ्या सरकारचे कौतुक. शिवसेनेने सरकारचे कौतुक केले आहेत याचा अन्य विरोधी नेत्यांनी दखल घ्यावी, असेही मलिक म्हणाले. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे भूखंड विकसित करण्याची कालमर्यादा चार वर्षांवरून सहा वर्षे करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. बुधवारी या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. काही ठराविक बडय़ा कंपन्यांच्या फायद्यांसाठीच हा निर्णय झाला होता. मुख्यमंत्र्यांना पुरेशी माहिती पुरविण्यात आली होती का, अशी शंका मलिक यांनी व्यक्त केली. प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय झाला त्या समितीत मलिक हेसुद्धा सदस्य असून ते बैठकीला उपस्थित होते. बैठकीत विरोध का केला नाही, या प्रश्नावर बैठकीची कागदपत्रे वारंवार मागणी करूनही अगोदर दिली जात नाहीत. ऐनवेळी बैठकीची कागदपत्रे दिली जातात. यामुळेच अभ्यास करणे शक्य झाले नाही, असे मलिक यांचे म्हणणे होते. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ही स्वच्छ आहे. यामुळेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाला बैठकीत विरोध झाला नाही, असाही टोला हाणण्याची संधी राष्ट्रवादीने सोडली नाही.
|