धरणामध्येही पाणी बचतीचे प्रयोग
|
|
|
|
|
बारवीमधील तात्पुरत्या बंधाऱ्यामुळे १५ दिवसांचा अतिरिक्त जलसाठा खास प्रतिनिधी, ठाणे
ठाणे जिल्ह्य़ात भविष्यकालीन पाणीपुरवठय़ासाठी नवे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे अस्तित्वात असणारे जलसाठे जपून वापरणे अपरिहार्य आहे. या पाश्र्वभूमीवर मुरबाड तालुक्यातील बारवी धरणात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असणारे पाणी बचतीचे प्रयोग मोलाचे ठरत असून त्यामुळे तब्बल १५ दिवसांचा अतिरिक्त जलसाठा उपलब्ध होत आहे. विस्तारीकरण योजनेत बारवी धरणाची उंची सहा मीटरने वाढली असून आता केवळ झडपा बसविण्याचे काम बाकी आहे. मात्र या ठिकाणी गेली तीन वर्षे तात्पुरता बंधारा (कॉफर डॅम) बांधून धरण व्यवस्थापन वाया जाणारे तब्बल १० दशलक्ष घनमीटर पाणी अडवीत आहे. त्यामुळे धरणात साधारणत: १५ दिवसांचा अतिरिक्त जलसाठा उपलब्ध होऊ लागल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांना आंध्र आणि बारवी धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. आंध्र धरण यंदा तब्बल १९ टक्के कमी भरले असल्याने दिवाळीपासूनच पाणीटंचाई भेडसाविण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारवी धरणात होणारी ही पाणी बचत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बारवी धरणात सध्या १७४ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. झडपा बसविण्याच्या ठिकाणाहून वाया जाणारे पाणी गेली तीन वर्षे वाळूच्या गोण्यांनी अडविले जाते. या तात्पुरत्या बंधाऱ्यामुळे प्रत्यक्षात १८४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होते. धरण विस्तारीकरण मार्गी लागल्यानंतर जवळपास दुप्पट म्हणजे ३४० दशलक्ष घनमीटर जलसाठा होणार आहे. |