केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार, तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांच्यापाठोपाठ माहिती व नभोवाणीमंत्री अंबिका सोनी आणि सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांच्यासह सात मंत्र्यांनी शनिवारी राजीनामे दिल्यामुळे आज, रविवारी सकाळी होत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
विस्तार व खांदेपालटात तरुण रक्ताला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण राहुल गांधी यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नसून सोनिया गांधींपाठोपाठ त्यांना काँग्रेस पक्षातच दुसऱ्या क्रमांकाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. माहिती व नभोवाणीमंत्री अंबिका सोनी, सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक, पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले राजीनामे सोपविले. आदिवासी कल्याण राज्यमंत्री महादेव सिंह खंडेला, जलसंपदा राज्यमंत्री व्हिन्सेंट पाला आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री अगाथा संगमा यांनीही राजीनामे दिले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी हे सर्व राजीनामे स्वीकारले आहेत. काँग्रेस पक्षसंघटनेत काम करण्यासाठी राजीनामे दिल्याचे वासनिक, सोनी, सहाय यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे तारीक अन्वर यांच्या मंत्रिपदाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी अगाथा संगमा यांनी राजीनामा दिला. मंत्रिपद नाकारले म्हणून काँग्रेसचे आंध्र प्रदेशचे खासदार सांबशिव राव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. परराष्ट्रमंत्रिपदासाठी उद्योग व वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. ५९ वर्षीय आनंद शर्मा यांनी यूपीए-१ मध्ये प्रणब मुखर्जी यांच्यासोबत परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून काम केले होते. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामा राव यांच्या कन्या डी. पुरंदेश्वरी यांना वाणिज्यमंत्री म्हणून बढती मिळणार आहे. पुरंदेश्वरी यांनी स्वत:च ही माहिती देत मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार मानले. याशिवाय अंबिका सोनी यांचे खाते क्रीडा राज्यमंत्री अजय माकन यांना बढतीसह मिळण्याची शक्यता आहे. नगरविकासमंत्री कमलनाथ यांना संसदीय कामकाज मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार सोपविला जाऊ शकतो. आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालय सोपविले जाऊ शकते. जयपाल रेड्डी यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय सोपविले जाऊ शकते.
महाराष्ट्राबाबत अनिश्चितता महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत आणि विलास मुत्तेमवार यांना अद्याप निरोप मिळालेला नव्हता.
यांना बढती अपेक्षित जयंती नटराजन, के. व्ही. थॉमस, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, मिलिंद देवरा, दिनशॉ पटेल, हरीश रावत.
यांचा समावेश शक्य शशी थरूर, आंध्र प्रदेशातून अभिनेता चिरंजीवी, पश्चिम बंगालमधून ए. एच. खान चौधरी, दीपा दासमुन्शी आणि प्रदीप भट्टाचार्य, झारखंडमधून प्रदीप बालमुचू, कर्नाटकातून ए. रहमान.
सतरा जागा रिकाम्या : केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या तृणमूल काँग्रेसच्या सहा, द्रमुकच्या दोन, राष्ट्रवादी काँग्रेसची एक तसेच विलासराव देशमुख आणि वीरभद्र सिंह यांच्यामुळे रिक्त झालेल्या दोन जागांसह सहा मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यांमुळे काँग्रेसच्या आठ जागा अशा मिळून एकूण सतरा जागा रिक्त आहेत. मित्रपक्षांपैकी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारीक अन्वर यांनाच राज्यमंत्रिपदी संधी मिळणार आहे. |