वाडिया रुग्णालयाच्या जागेचा फेरविचार करणार - महापौर
|
|
|
|
|
प्रतिनिधी मुंबई रुग्णालयासाठी महापालिकेने वाडिया रुग्णालयाला भाडेपट्टय़ावर जमीन उपलब्ध केली असून त्या बाबतच्या अटी आणि शर्तीना रुग्णालय प्रशासनाकडून हरताळ फासला जात असेल, तर देण्यात आलेल्या जमिनीचा फेरविचार करण्यात येईल, असा इशारा महापौर सुनील प्रभू यांनी दिला.
वाडिया रुग्णालयातून एक दिवसाच्या बालकाची चोरी झाल्यानंतर सुनील प्रभू यांनी शनिवारी रुग्णालयाला भेट दिली. तसेच चोरीला गेलेल्या बाळाची आई जस्मीन नाईक यांचीही महापौरांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. वाडिया रुग्णालय चालविण्यासाठी दरवर्षी महापालिकेकडून ठराविक हिस्सा रुग्णालयाला दिला जातो. रुग्णालयीन प्रशासनाने दुरुस्तीच्या नावाखाली रुग्णालयाचा मोठा भाग बंद ठेवला असून एकाच भागात रुग्णालय चालविण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु ते अद्यापही बसविण्यात आलेले नाहीत. रुग्णालयामधील सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी असून सुरक्षा व्यवस्थेकडे रुग्णालयाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. रुग्णालयाचे प्रशासन पालिकेच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावत असेल तर रुग्णालयासाठी देण्यात आलेली जमीन परत घेण्याबाबत विचार केला जाईल, असा इशारा सुनील प्रभू यांनी दिला. या संदर्भात वाडिया ट्रस्टचे पदाधिकारी, महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक लवकरच महापौर दालनात आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मूल चोरी प्रकरणाच्या तपासाची चौकशी करण्यासाठी महापौरांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. परंतु ते उपलब्ध झाले नाहीत. तसेच गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधून मूल चोरीच्या घटनेची कल्पना दिली. बाळाचे आई-वडील आणि इतर नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून तपास गतिमान करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी विनंती त्यांनी गृहमंत्र्यांना केली. वाडिया रुग्णालयाला भेट देताना सुनील प्रभू यांच्यासोबत माजी महापौर श्रद्धा जाधव, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉ. संध्या कामत आदी उपस्थित होते. |