भगवानदादांवर पुन्हा ‘अलबेला!’
|
|
|
|
|
प्रतिनिधी मुंबई ‘अलबेला’ चित्रपटाने प्रचंड लोकप्रिय झालेले दिवंगत कलावंत भगवानदादा यांच्या जन्मशताब्दी वर्षांतच त्यांच्यावरील चित्रपटाची घोषणा शनिवारी करण्यात आली. किमया मोशन पिक्चर्स निर्मित पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन निरंजन पटवर्धन करणार आहेत.
चित्रपटाची घोषणा ख्यातनाम दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी शनिवारी भगवानदादा यांच्यावरील ‘एक अलबेला’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना केली. भगवानदादा पालव जन्मशताब्दी समितीच्या वतीने भगवानदादा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘एक अलबेला’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ सिनेपत्रकार इसाक मुजावर यांनी लिहिलेल्या व रसिक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जुन्या काळातील अभिनेत्री जीवनकला, ज्येष्ठ अभिनेता विजू खोटे, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, माजी नगरपाल किरण शांताराम, भगवानदादा यांचे पुत्र अरूण पालव आदी मान्यवर उपस्थित होते. भगवानदादा यांच्याबद्दल सांगताना मधुर भांडारकर म्हणाले की, चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी आपण व्हिडिओ कॅसेटचा व्यवसाय करीत होतो. तेव्हासुद्धा भगवानदादा यांच्या अलबेला चित्रपटाला ग्राहकांकडून मोठी मागणी असायची. किंबहुना शनिवारी-रविवारी ‘अलबेला’ जरूर पाहा, असे आपण ग्राहकांना आवर्जून सांगायचो, असेही भांडारकर म्हणाले. यावेळी भांडारकर यांच्या हस्ते अच्युत पालव यांच्या सुलेखनाद्वारे तयार झालेल्या बॅनरचे अनावरणही करण्यात आले. ‘अलबेला’ याच नावाने किमया मोशन पिक्चर्सतर्फे २०१३ मध्ये मराठी चित्रपट रूपेरी पडद्यावर आणला जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार विक्रम गायकवाड हे या चित्रपटात काम करणार आहेत. त्यामुळे भगवानदादांचा चेहरामोहरा हुबेहूब करण्यात नक्कीच यश मिळेल असे किमया मोशन पिक्चर्सचे डॉ. मोनीश बाबरी यांनी सांगितले. चित्रपटाचे नाव अलबेला हेच ठेवण्यात आले असले तरी ‘अलबेला’ चित्रपट आला त्यापूर्वीचे आणि त्यानंतरचे भगवानदादा कसे होते हे या चित्रपटातून दाखविले जाणार आहे. सुलोचनादीदी, इसाक मुजावर, जीवनकला यांनी यावेळी भगवानदादांच्या आठवणी सांगितल्या. |