अवघ्या चार हजार टॅक्सी आणि १० हजार रिक्षांचे कॅलिब्रेशन पूर्ण
|
|
|
|
|
२५ नोव्हेंबरची मुदत पुढे जाण्याची शक्यता? प्रतिनिधी मुंबई डॉ. हकीम समितीच्या शिफारसींनुसार भाडेवाढ झाल्यावर अवघ्या चार हजार टॅक्सी आणि १० हजार रिक्षांचे कॅलिब्रेशन १५ दिवसांत पूर्ण झाले आहे. उर्वरित रिक्षा-टॅक्सींचे कॅलिब्रेशन रिक्षा-टॅक्सींच्या मीटरमध्ये कॅलिब्रेशन करण्याच्या कामाचा वेग पाहता २५ नोव्हेंबपर्यंतची मुदत पुढे जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील रिक्षा-टॅक्सींची भाडेवाढ ११ ऑक्टोबर रोजी झाल्यावर सर्व ई-मीटर आणि मेकॅनिकल मीटरमध्ये २५ नोव्हेंबपर्यंत कॅलिब्रेशन करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र कॅलिब्रेशन झालेल्या मीटरची तपासणी करणाऱ्या यंत्रणांकडे असणारी अपुरी व्यवस्था आणि मेकॅनिकल मीटरचेही ई-मीटरमध्ये रूपांतरण करून त्यांचेही कॅलिब्रेशन करणे या सर्व तांत्रिक बाबींमुळे रिक्षा आणि टॅक्सींच्या कॅलिब्रेशनचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. परिवहन विभागाकडून दिवसाला सुमारे ८०० रिक्षा-टॅक्सींच्या मीटरची तपासणी होत आहे. हा आकडा एक हजापर्यंत गेला तरीही अवघ्या २५ दिवसांमध्ये मुंबईच्या तीनही प्रादेशिक परिवहन विभागांकडून सर्व रिक्षा-टॅक्सींचे कॅलिब्रेशन पूर्ण होणे शक्य नसल्याचे परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ताडदेव येथील मध्य मुंबई प्रादेशिक परिवहन विभागात शुक्रवारी ४१२ टॅक्सींचे कॅलिब्रेशन झाले. आतापर्यंत या विभागात २८७५ टॅक्सींचे कॅलिब्रेशन झाले आहे. वडाळा येथे पूर्व उपनगर परिवहन विभागात ४८६ टॅक्सींचे तर अंधेरी येथील पश्चिम उपनगर परिवहन विभागात ३०६ टॅक्सींचे कॅलिब्रेशन झाले आहे. २५ ऑक्टोबरला सर्व टॅक्सींना ई-मीटरची लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ४४ हजार टॅक्सींपैकी सुमारे १३२०० टॅक्सी या मेकॅनिकल मीटरच्या असून त्यांना कॅलिब्रेटेड ई-मीटर्सच लावण्यात येणार आहेत. परंतु या टॅक्सींचे मेकॅनिकल मीटर बदलण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत असल्याने या सर्व टॅक्सी २५ नोव्हेंबपर्यंत कॅलिब्रेटेड होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे एक लाख रिक्षांमध्ये अद्याप केवळ १० ते ११ हजार रिक्षांचे कॅलिब्रेशन झाल्यामुळे उर्वरित रिक्षांचे कॅलिब्रेशन २५ नोव्हेंबपर्यंत होणे अशक्य असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. परिवहन विभागाची तयारी असली तरी मीटर तपासणी करणाऱ्या यंत्रणा अपुऱ्या असल्यामुळे आता २५ नोव्हेंबरची तारीख पुढे ढकलण्याबाबत परिवहन विभाग विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. |