इंजिनमध्ये बिघाड, चाक बदलून काय होणार?
|
|
|
|
|
गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांची टीका प्रतिनिधी
ठाणे केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांसंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ठाण्यामध्ये खरपूस समाचार घेत इंजिनमध्ये बिघाड असताना चाके बदलून काय होणार, अशी उपहासात्मक टीका केली. तसेच राज्यकर्त्यांमधील चारित्र्याचा अभाव आणि सध्याच्या शिक्षण पद्धतीवरही त्यांनी आपल्या मिश्कील शैलीत भाष्य करून टोले लगावले. ठाणे येथील गडकरी रंगायतमध्ये श्वेता गानू लिखित ‘स्वप्नांना ओढ समृद्धीची’, ‘शिंपल्यातील मोती’ तसेच दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूस्नेहलता देशमुख, दीपक घैसास, स्वागताध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई, शंकरराव बोरकर, अॅड. विलास जोशी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर आणि २० नामांकित उद्योजक उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर काही निवडक उद्योजकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या कार्यक्रमात मुख्यमंत्री पर्रिकर बोलत होते. सध्याच्या शिक्षण पद्धतीत दोष आहे, आपण इंग्रजीच्या मागे लागलो आहोत, ते अत्यंत चुकीचे आहे, असे मत व्यक्त करत इंग्रजी आल्यावरच डॉक्टर होता येत असेल तर मग इंग्लंडमध्ये सर्वच डॉक्टर झाले पाहिजे होते, असा टोलाही त्यांनी हाणला. तसेच मातृभाषेत शिक्षण घेतले तर मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने समजते. त्यामुळे किमान प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेत असावे, असे त्यांनी स्पष्ट केले. मी उद्योजक आहे पण, राजकारणात आलो म्हणून पैसा करू शकलो नाही. कारण, राजकारणात नसतो तर व्यवसायात अधिक लक्ष देऊन पैसे कमवू शकलो असतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. काही राज्यकर्त्यांच्या अंगात थोडी सरस्वती तर काहींमध्ये थोडी लक्ष्मी असते. मात्र, सध्या राज्यकर्त्यांमध्ये चारित्र्याचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे चारित्र्य नसेल तर राज्यात लक्ष्मी राहणार कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपण कोणत्याही व्यक्तीला समोर ठेवून भाष्य केलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. |