विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
|
|
|
|
|
प्रतिनिधी, नाशिक
महागाई भत्त्यात सात टक्के वाढ मिळावी, यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि जिल्हा अधिकारी महासंघ या संघटना सहभागी झाल्या. जुलै २०१२ पासून महागाई भत्त्यात सात टक्के वाढ मिळावी, महागाई भत्त्याची ३५ महिन्यांची थकबाकी मिळावी, वाहतूक, शैक्षणिक, वसतिगृह यांचे भत्ते मिळावे, केंद्राप्रमाणे बोनस मिळावा, आगाऊ वेतनवाढ मिळावी, नवीन पेन्शन धोरण रद्द करावे,
रिक्त पदे त्वरित भरावीत, ऑक्टोबर २००६ पासून ते ३१ मार्च २०१० या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, २० वर्षे सेवा झालेल्या आणि जानेवारी २००६ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण निवृत्तिवेतन मिळावे, फेब्रुवारी ते जून २००६ या कालावधीत वार्षिक वेतनवाढ असलेल्या कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००६ प्रमाणे वेतनवाढ मिळावी, या मागण्यांसाठी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. |