निवडणूक झाली एकतर्फी, मराठेंना ‘जातिवाद’ भोवला?
|
|
|
|
|
शेखर जोशी, मुंबई अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, संमेलनाध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक आणि वाद हे जणू समीकरण झाले आहे. चिपळूण येथे होणाऱ्या आगामी ८६व्या साहित्य संमेलनाध्यक्ष पदाची निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. संमेलनाध्यक्ष निवडणुकीत चार उमेदवार असले तरी खरी लढत डॉ. नागनाथ कोतापल्ले आणि ह. मो. मराठे यांच्यातच होईल, असे चित्र होते.
मात्र प्रत्यक्षात डॉ. कोतापल्ले आणि मराठे यांना मिळालेली मते पाहिली तर ही निवडणूक एकतर्फीच झाली. ह. मो. मराठे यांनी मतदारांना जे पत्रक पाठवले त्यातील काही मजकुरावरून तापविल्या गेलेल्या वातावरणाचा परिणाम निवडणुकीच्या मतदानावर झाला. मतदारांना पाठविलेल्या पत्रातील काही मजकुराचा विपर्यास झाल्याने नाहक वाद निर्माण केला गेला, असे हमो यांचे म्हणणे होते. मात्र, त्यानंतरही तो वाद शमला नाही व त्याचे पडसाद मतदानातून उमटलेच. ‘ह. मो.’ संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून आले तर कदाचित चिपळूणचे संमेलन निर्विघ्नपणे पार पडणार नाही, ते उधळून लावले जाईल, अशी भीती आणि संभ्रम मतदारांमध्ये निर्माण केला गेला आणि त्यातून डॉ. कोतापल्ले यांना एकगठ्ठा मतदान झाले असावे, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या निवडणुकीत महामंडळाच्या घटक संस्था, संलग्न आणि समाविष्ट संस्थांच्या मतदार संख्येबरोबरच संमेलन आयोजक असलेल्या निमंत्रक संस्थेच्याही मतदार संख्येत वाढ झाली होती. संमेलनाध्यक्ष निवडण्यात हे ८५ मतदार निर्णायक भूमिका बजावणार होते. चिपळूणचे संमेलन कोणताही वाद न होता निर्विघ्नपणे पार पडावे, अशी संयोजकांची अपेक्षा होती. त्याचाही परिणाम मतदानावर झाला असावा. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत वसंत आबाजी डहाके हे संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून आले. त्या वेळीही डॉ. कोतापल्ले निवडणुकीच्या िरगणात होते. डहाके यांच्यासाठी डॉ. कोतापल्ले यांनी माघार घेतली असली तरी तेव्हाही डॉ. कोतापल्ले यांची तयारी झालेली होती. यंदाच्या निवडणुकीत तो पूर्वानुभव, यंदा निवडणुकीसाठी नव्याने केलेली तयारी आणि मराठे यांच्या पत्रकातून उफाळलेल्या वादाचा फायदा त्यांना झाला असावा. मात्र असे असले तरी मराठे यांना इतक्या कमी संख्येने मिळालेली मते हा खुद्द मराठे आणि त्यांच्या चाहत्यांसाठीही धक्का आहे, असे मानले जात आहे. कोतापल्लेंना कसा झाला फायदा? ‘ह. मो.’ संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून आले तर कदाचित चिपळूणचे संमेलन निर्विघ्नपणे पार पडणार नाही, ते उधळून लावले जाईल अशी भीती आणि संभ्रम मतदारांमध्ये निर्माण केला गेला. यंदा सलग दुसऱ्या वर्षी निवडणुकीसाठी नव्याने केलेली तयारी आणि मराठे यांच्या पत्रकातून उफाळलेल्या वादाचा फायदाही कोतापल्ले यांना झाला. |