विदर्भात तुरीवर किडीचा प्रादुर्भाव
|
|
|
|
|
सोयाबीन व धानाला पावसाचा तडाखा नागपूर / प्रतिनिधी
विदर्भात तूर पिकावर किडीचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून शुक्रवारी झालेल्या पावसामुळे कापणी झालेल्या सोयाबीन व हलक्या दर्जाच्या धानाला तडाखा बसला आहे. विदर्भात सध्या खरीप पिकांचा हंगाम जोरावर आहे. नागपूर विभागात तूर पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र १.५१ लाख हेक्टर असून सरासरी उत्पादकता ११ क्विंटल प्रतिहेक्टर आहे.
विभागात सोयाबीन पिकाची कापणी पूर्ण झाली असून मळणीला सुरुवात झालेली आहे. तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या पिकावर शेंगा पोखरणारी हिरवी अळी, पिसारी पतंग व शेंगमाशीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केली नाही तर पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. शेंग पोखरणारी हिरवी अळी अत्यंत नुकसानकारक कीड आहे. या अळ्या कोवळी पाने, फुले कुरतडून खात असून शेंगाना छिद्रे पाडत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तीन फवारण्या करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. यात पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना अॅझाडिरेक्टीन दहा हजार, पीपीएम १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी, त्यानंतर १५ दिवसांनी इमॅमेक्टीन बेंझोएट ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करावी. तिसरी फवारणी सुद्धा १५ दिवसांनी करावी. यासाठी डेल्टामेथ्रीन व ट्रायझोफॉस हे मिश्र कीटकनाशक वापरावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालकांनी केले आहे. विदर्भात काही ठिकाणी कापसाच्या वेचणीला सुरुवात झाली आहे. धान पीक सध्या लोंब धरण्याच्या अवस्थेत आहे तर काही ठिकाणी धानाची कापणी सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरी व एटापल्ली तालुक्यांतील काही गावांमध्ये धान पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. विभागात सर्वच जिल्ह्य़ात पीक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर औषधांचे वाटप करण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात पाऊस शुक्रवारी पाऊस झाला. कापणी झालेल्या सोयाबीन व धान पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. बाजार समित्यांच्या आवारात असलेले धान्य झाकून ठेवण्यात आले आहे. ४ नोव्हेंबपर्यंत पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने शेतक ऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही कृषी सहसंचालकांनी केले आहे. |