इगतपुरीत डेंग्यूसदृश आजाराने शिक्षकाचा मृत्यू
|
|
|
|
|
इगतपुरी तालुक्यात अस्वच्छता व दूषित पाण्यामुळे आजार वाढले असून कवडदरा येथील आश्रमशाळेतील शिक्षकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला.
खेड आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार तालुक्याच्या पूर्व भागात डेंग्यूचे पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. वर्षभराच्या तालुका आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार अतिसार, ताप, हिवताप, गॅस्ट्रो, विषमज्वर आदी रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झालेली दिसून येते. कवडदरा येथील मधुकरराव पिचड आश्रमशाळेतील पांडुरंग फटांगरे (३७) या शिक्षकाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. फटांगरे हे अनेक दिवसांपासून डेंग्यूने आजारी होते. नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी हे साथीचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमून दिलेल्या गावात, वाडय़ा-पाडय़ांवर फिरकत नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येक आरोग्यसेवकास सर्वेक्षण करण्यासाठी सक्तीचे करावे, साथ नियंत्रणात आणण्यासाठी औषधोपचार करावा, अशी मागणी होत आहे. |