जालनात तापाचे सुमारे पाच हजार रुग्ण
|
|
|
|
|
उद्यापासून जनजागृती मोहीम जालना/वार्ताहर शहरात विविध प्रकारच्या तापाचे सुमारे पाच हजार रुग्ण असल्याची माहिती मिळाली. यात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्याही मोठी असून या दृष्टीने व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे ‘रोटरी क्लब ऑफ जालना रेन्बो’ च्या या संदर्भातील मोहिमेचे प्रकल्पप्रमुख डॉ. राजेश सेठिया यांनी सांगितले.
डेंग्यूपासून संरक्षण करण्यासाठी क्लबच्या वतीने हाती घेतलेल्या मोहिमेची माहिती त्यांनी दिली. क्लबच्या अध्यक्षा निर्मला साबू व आयएमएच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त हवालदार या वेळी उपस्थित होते. डॉ. सेठिया म्हणाले की, १९९४ मध्ये सुरतमध्ये झालेली प्लेगची लागण, २००६ मधील चिकुनगुन्याची साथ व सध्या डेंग्यसदृश तापाच्या साथीमुळे दवाखाने, रुग्णालयांतही रुग्णांची गर्दी उसळली आहे. डेंग्यू हा अत्यंत धोकादायक आजार असल्याने तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय व आवश्यक काळजी घेतली पाहिजे. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी ‘कोरडा दिवस’ पाळला पाहिजे. त्यासाठी आठवडय़ातून एक दिवस घर व परिसरातील सर्व पाणीसाठे कोरडे करवून घेतले पाहिजे. या संदर्भात जनजागृती करण्यासाठी शनिवारी (दि. १०) शहराच्या विविध भागांतून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. क्लबच्या वतीने सध्या शहरातील काही भागात धूर फवारणी करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. रोटरी क्लब ऑफ जालना रेन्बोचे सचिव डॉ. नितीन खंडेलवाल, उपाध्यक्षा डॉ. आरती मंत्री, डॉ. मुकुंद मंत्री, डॉ. सचदेव, डॉ. चारुस्मिता हवालदार, डॉ. सुरेश साबू इत्यादींची उपस्थिती यावेळी होती. सध्या विविध प्रकारच्या तापांचे २० हजारांपेक्षा अधिक रुग्ण असण्याची शक्यता आहे. |