सुलोचना चव्हाण, संगमनेरकर यांना महापालिकेचा ‘पठ्ठे बापूराव पुरस्कार’
|
|
|
|
|
पुणे वृत्तान्त
|
पुणे, १८ जानेवारी / प्रतिनिधी
ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण आणि ज्येष्ठ लोककलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांची निवड ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. लोकनाटय़ व लोककलांच्या क्षेत्रातील कलावंतांना प्रतिवर्षी पुणे महापालिकेतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो. महापौर मोहनसिंग राजपाल यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. लोककलावंतांना प्रदान केल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी (सन २००७) लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांची, तर २००८ या वर्षांच्या पुरस्कारासाठी गुलाबबाई संगमनेरकर यांची निवड करण्यात आली आहे.
शाल, स्मृतिचिन्ह आणि पंचवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महापालिकेतर्फे १९९५ पासून हा पुरस्कार दिला जात आहे. या पुरस्काराबरोबरच लोकनाटय़ क्षेत्रातील सहायक कलाकार तसेच उदयोन्मुख कलाकारांचाही स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये देऊन गौरव केला जातो. त्या नावांचीही घोषणा महापौरांनी केली. सन २००७ च्या पुरस्कारांसाठी यशवंत गुलाब गाडे (ढोलकी वादक), प्रभाकर राहू म्होरकर (तबला वादक), गोविंद वनारे (पेटी मास्तर), माया पांडे (नृत्य), हिराबाई लक्ष्मण जावळकर (गायिका) यांची निवड झाली असून सन २००८ च्या पुरस्कारांसाठी अरुण गजानन मुसळे (पेटी मास्तर), हरिभाऊ साधू लाखे (तबला वादक), कृष्णा घोटकर (संबळ वादक), अनुसया जयवंत जावळे (गायिका) आणि वैययंता कडू (नृत्य) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार प्रदान समारंभ बुधवारी (२० जानेवारी) सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या स्मिता तळवलकर आणि ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असेल. पुरस्कार प्रदान समारंभानंतर गुलाबबाई संगमनेरकर यांचा गायनाचा कार्यक्रमही आयोजिण्यात आला आहे. |