‘हे थांबलं पाहिजे’ पण कसं थांबणार?
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘हे थांबलं पाहिजे’ पण कसं थांबणार? Bookmark and Share Print E-mail
रविंद्र पाथरे, रविवार, १३ जून २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सध्या मुंबईत दडपला गेलेला मराठी माणूस, त्याच्यावरील अन्याय, परप्रांतीयांचे लोंढे, त्यांची मुजोरी, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा दिल्लीकरांचा डाव.. अशा अनेक मुद्दय़ांवर मराठी माणसांची डोकी भडकवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत. यात मराठी माणसाचं काही भलं करण्यापेक्षा त्यांचा वापर करून आपल्याला सत्तेची खुर्ची कशी मिळेल यासाठी डावपेच लढवणं, हीच त्यामागची खरी प्रेरणा आहे. आणि सुजाण मराठी माणसं हे पुरतं जाणून असल्यानं सहसा ते आपली माथी फिरवून घेत नाहीत आणि अशांना डोक्यावर चढू देत नाहीत. कारण यापूर्वीही त्यांनी अशाच मराठी माणसाच्या भल्याच्या डरकाळ्या ऐकल्या होत्या. आणि त्यावर विश्वास ठेवून त्यांच्या हाती राज्याची सत्ता दिल्यानंतर त्यांनी काय दिवे लावले, हेही चांगलंच अनुभवलेलं आहे. राज्यातले फक्त सत्ताधारी बदलले, ‘खाद्यंती’ तशीच चालू राहिली. किंबहुना ही खाद्यंती करतानाही मराठी माणसालाच लुटलं गेलं. त्यांना गिरणगावाबाहेर पडावं लागलं. जे सरळपणे गेले नाहीत, त्यांना हाकललं गेलं. आणि हे सारं मराठी माणसाच्या भल्याकरताच केलं गेलं. मग कसा काय ठेवणार मराठी माणूस यांच्यावर विश्वास? आजवरचा यांचा इतिहास काय सांगतो, हे मराठी माणसानं जवळून अनुभवलेलं आहे. त्यामुळे पाटी बदलली म्हणून मराठी माणूस फसेल, हे कदापि शक्य नाही. खरंच जर यांना मराठी माणसाचा कळवळा असता तर यांनी मुंबईच्या मूलभूत प्रश्नांमध्ये प्रथम लक्ष घातलं असतं. पुरेशा पायाभूत सोयीसुविधा नसताना उभे केले जाणारे गगनचुंबी टॉवर्स, आलिशान मॉल्स पहिल्यांदा त्यांनी रोखायला हवे होते. भ्रष्टाचारात पुरते बुडालेले लोकप्रतिनिधी, राजकारणी, बिल्डर, कंत्राटदार, नोकरशहा, अधिकारी यांची मानगुट पकडून त्यांना यांनी सरळ करायला हवं होतं. त्यामुळे खरोखरच हे लोकांचं भलं करायला निघाले आहेत, हे त्यांना प्रत्ययाला आलं असतं. मगच लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला असता. परंतु याउलट हे स्वत:च बिल्डर बनून अथवा बिल्डरांशी साटंलोटं करून मुंबईत गगनचुंबी टॉवर्स उभारताहेत. सत्ताधाऱ्यांशी चुंबाचुंबी करून आपले स्वार्थ पदरात पाडून घेत आहेत. हे सारं काय चाललंय, हे मराठी माणसाला कळत नाही, अशी जर त्यांची समजूत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरताहेत, असंच म्हणायला हवं. आज लोकांचा कुणावरच विश्वास उरलेला नाही. सगळे एकाच माळेचे मणी आहेत, हे त्यांना कळून चुकलंय. तेव्हा आपण कुणाच्याच नादी न लागलेलं बरं. आपलं जे काही भलं करायचं आहे ते आपलं आपणच करू, या निष्कर्षांप्रत ते आले आहेत.
अर्थात याचा अर्थ मराठी माणसाच्या गळचेपीचा जो मुद्दा उपस्थित केला जात आहे तो पूर्णत: चुकीचा आहे असं नाही. परंतु त्याला आपले मुर्दाड सत्ताधारी आणि स्वत: मराठी माणूसच कारणीभूत आहे. कॉंग्रेसचे राज्यातील सत्ताधीश हे दिल्लीचे लांगुलचालन आणि जी हुजूरगिरी करण्यातच धन्यता मानतात. त्यांना स्वत:चं काही मत नाही. ध्येयधोरणं नाहीत. राज्याच्या विकासाबद्दल कुठलंही ‘व्हिजन’ नाही. दुसऱ्यांच्या ओंजळीनं पाणी पिणाऱ्यांकडून अर्थात अशी अपेक्षा करणंही चूकच आहे. त्यांचा एककलमी कार्यक्रम म्हणजे सत्तेच्या चाव्या वापरून आपली, आपल्या मुलाबाळांची आणि नातलगांची सात पिढय़ांची ददात मिटेल इतकी मालमत्ता गोळा करायची! मग राज्य आणि जनता खड्डय़ात का जाईना. त्यांना त्याची काही पडलेली नाही.
असा सगळा अंधार सर्वत्र दाटलेला असताना या झाकोळाचं प्रतिबिंब आपल्या कला, साहित्य तसंच सांस्कृतिक क्षेत्रात पडणं अपेक्षित होतं. परंतु तसंही होताना दिसत नाही. कारण या क्षेत्रांतले लोकही सरकारचे मिंधे तरी आहेत किंवा आपली संवेदना तरी हरवून बसलेत. नाटकांत काही अंशी या वास्तवाचे पडसाद उमटताना दिसतात. मुंबईतील आणि राज्यातील परप्रांतीयांच्या लोंढय़ावर प्रकाश टाकणारी काही नाटकं गेल्या काही वर्षांत एकापाठोपाठ आली. आजही येताहेत. परंतु त्यांतही अभिनिवेश आणि भाबडेपणाचाच अंश जास्त आहे. किंवा मग सध्या चलनी नाणं असलेला ‘मराठी माणूस’ हा विषय एन्कॅश करण्याचा धंदेवाईक दृष्टिकोन तरी! एक ‘भय्या हात-पाय पसरी’चा थोडासा अपवाद वगळता ही बहुतांश नाटकं या विषयाला न्याय देणारी नव्हती. कारण या प्रश्नाच्या खोलात कुणी जायला तयार नाही. या विषयाशी संबंधित सगळ्या पैलूंना भिडण्याची ताकद आणि इच्छा त्यांच्यात नाही. त्यामुळे मराठी माणसाच्या नावानं गळा काढणारे पक्ष व संघटना आणि ही नाटकं यांच्यात गुणात्मक काहीच फरक नाही. अशा नाटकांत आणखी एकाने भर पडलीय ती संजीवनी थिएटर्स निर्मित ‘हे थांबलं पाहिजे’ या राकेश शिर्के लिखित आणि विजय खानविलकर दिग्दर्शित नव्या नाटकाची! या नाटकावर ‘भय्या हात-पाय पसरी’चा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. कारण या नाटकातही मराठी वस्तीत केळी विकणारा भय्या आपल्या गोडबोल्या स्वभावानं आणि सतत पडतं घेऊन आपला स्वार्थ कसा साधत असतो, नंतर आपल्या पत्नीला आणि जातभाईंना आणून आपलं बस्तान इथं कसं बसवतो, पुढे आपली बहुसंख्या झाल्यावर मुजोरी करून ज्यांनी आपल्याला मदतीचा हात दिला त्या माईंनाच आणि त्यांच्या लघुउद्योगावर अवलंबून असलेल्या मराठी आयाबायांना व त्यांच्या मुलाबाळांना आयुष्यातून कसं उठवतो, हे दाखवलेलं आहे. फक्त इथं जास्तीची एक गोष्ट म्हणजे ‘आयत्यावर कोयता’मध्ये दाखविल्याप्रमाणे राज ठाकरेसदृश राजाराम ठोकरे हे नावसाधम्र्य असलेलं पात्र. या पात्राचं दिसणं, वागणं-बोलणं, चालणं, लकबी सारं काही राज ठाकरे स्टाईलचं आहे. तेव्हा हे नाटक उघड उघड राज ठाकरेंची लाइन मांडणारं आहे, यात शंका घ्यायचं कारण नाही. मात्र तरी काही अंशी तोंडी लावणं म्हणून राज ठाकरेंच्या हिंसक राजकारणाबद्दल नाटकात माईंच्या करवी काही शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत. परंतु त्याही फार वरवरच्या आहेत. त्या माईंच्या व्यक्तिगत जीवनातील अनुभवांवर आधारित आहेत. पण याच माई नंतर मरताना आपल्या मुलाला- अमरला मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढायला परवानगी देऊन राजाराम ठोकरे यांच्या हिंसक राजकारणाला पाठिंबाच देतात. असो.
एकुणात हे नाटक मराठी माणसाचा ज्वलंत विषय घेऊन आलेलं आहे. त्याची मांडणी सर्वसाधारणत: रोज वर्तमानपत्रांतून येणाऱ्या बातम्यांवर आणि राज ठाकरे यांच्या आगखाऊ भाषणांवर आधारीत आहे. त्यामुळे मराठी माणसांच्या दुर्दशेबद्दल कणव दाटून येणाऱ्यांना आणि या स्थितीला ते का आले, याचं वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण करू न शकणाऱ्यांना प्रभावित करू शकेल. परंतु अशी प्रचारी नाटकं कलात्मक नसतील तर फार तग धरू शकत नाहीत, हेसुद्धा वास्तव आहे. अन्यथा यापूर्वी याच विषयावर आलेली नाटकं धो-धो चालली असती. सरधोपट मांडणी आणि नाटय़विषयाची खोली गाठू न शकल्यानं हे नाटक मनाची बिलकूल पकड घेत नाही. नाटकातलं व्यक्तिरेखाटनही इतकं वरवरचं आहे, की कुठलीही व्यक्तिरेखा नाटय़गृहाबाहेर पडल्यावर लक्षात राहत नाही. ना विषय, ना मांडणी, ना व्यक्तिरेखाटन, ना सादरीकरण- काहीच नाही. तेव्हा केवळ मराठी माणसाच्या प्रेमाखातर, त्याच्यावरील कथित अन्यायाच्या पुन:प्रत्ययाकरता पाहायचं असेल तर तुम्ही हे नाटक पाहू शकता.  
लेखन-दिग्दर्शनाबद्दल खास लिहिण्याजोगं काही नाही. उलट, टपके काकांसारखं विदुषकी पात्र निर्माण करून नाटकाचा विषय हास्यास्पद बनवला गेला आहे. विजय खानविलकरांनी उभारलेलं चाळीचं नेपथ्य ठीक. अरुण कानविंदे यांनी पाश्र्वसंगीतातून नाटकातील मूड्स गडद केले आहेत. अशोक वायंगणकर यांनी संगीत दिलेली दोन गाणी कर्णमधुर आहेत. बाकीच्या तांत्रिक बाबीही ठीक.
संजीवनी जाधव यांनी गिरणी संपात पोळलेली आणि त्यात आपला नवरा गमावून बसलेली हळवी, परंतु कष्टाळू माई साकारली आहे. मराठी माणसाच्या लढय़ात आपला एकुलता एक मुलगासुद्धा आता गमावू नये म्हणून तिची होणारी घालमेल त्यांनी नेमकेपणानं व्यक्त केली आहे. संजय चव्हाण यांचा बिरजूभय्या उत्तम. त्यांचा उत्तर प्रदेशी बोलीचा लहेजा आणि लकबी दाद देण्याजोग्या. सुवर्णा कांबळे यांची भय्याणीही जेवढय़ास तेवढी. गणेश पाटील यांनी राज ठाकरेंशी साधम्र्य असलेल्या आपल्या व्यक्तिमत्त्वासह त्यांचे मॅनरिझम्स छान आत्मसात केले आहेत. परंतु त्यांची भाषा मात्र अशुद्ध आहे. ती ऐकताना कधी कधी हसू येतं. दीपक जोशी यांचा टपके काका नाटकात थोडा विरंगुळा आणत असला तरी मूळ विषयाशी विसंगत आणि अनावश्यक असं हे पात्र आहे. मंगेश कासेकर (अमर), नीलम माने (सई), भूमिजा पाटील (बेबी) आणि सागर मिठबावकर (आशीष) यांनी आपल्या भूमिका संहितेच्या मर्यादेत चोख वठवल्या आहेत.