इतिहासात आज दिनांक.. : २० ऑक्टोबर १९४० या दिवशीच्या इंग्रजी ‘हरिजन’ या पत्रात महात्मा गांधी यांनी Who is Vinoba? असा लेख लिहून विनोबांची संपूर्ण भारताला ओळख करून दिली. वैयक्तिक सत्याग्रहातील शुद्ध सत्याग्रही म्हणून गांधीजींनी विनोबांची ‘पहिले सत्याग्रही’ म्हणून निवड केली. अशा प्रकारे एखाद्या कार्यकर्त्यांचा परिचय करून देणारा लेख स्वत: गांधीजींनी लिहिणे हे एक दुर्मिळ उदाहरण होते. याच लेखाच्या जोडीला महादेवभाई देसाई यांनी एक लेख लिहिला. त्यात ते लिहितात- ‘विनोबांनी सत्य,अहिंसेचे उपासक आणि कार्यरत असलेले खरे सेवक जेवढे तयार केले तेवढे तयार करणारा बापूंच्या अनुयायांमध्ये आणखी कोणी क्वचितच असेल. ’ १९५० कृ. भा. बाबर यांनी ‘समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. ग्रामीण भागातील जिज्ञासूंची ज्ञानभूक भागविण्यासाठी माला स्थापली. १९६२ चीनने भारतावर हल्ला केला. ‘हिंदी - चीनी भाई भाई’ अशा वातावरणात चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. चीनच्या तोफखान्याने आणि पायदळाने जो हल्ला केला त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर संख्येत आणि शस्त्रबळात कमी पडले. पुढे महिनाभर हे युद्ध चालले आणि चीनने स्वत:च एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. कम्युनिस्ट चीनला मान्यता देणे, संयुक्त राष्ट्रसंघात चीनला प्रवेश देऊन सुरक्षा समितीचे सदस्यत्व बहाल करायला लावणे या भूतकाळातील पुण्याईच्या गोष्टी भारताला उपयोगी पडल्या नाहीत. या युद्धामुळे भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण सुरू झाले. प्रा. गणेश राऊत -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सफर काल-पर्वाची : वोडियार राजवटीचा उत्तरार्ध ‘ओडियार’ या शब्दावरून ‘वोडियार’ हे नाव तयार झाले. ओडियार म्हणजे मालक. म्हैसूरच्या राजकीय कारकीर्दीतील वैभवशाली राजा चिक्कदेवराज याचा कार्यकाळ १७१४ साली संपली. त्याआधीच, इ.स. १७११ मध्ये त्याने राजधानी म्हैसूरहून श्रीरंगपट्टण येथे हलविली होती. इ. स. १७६० ते १७९९ या काळात वोडियार घराण्याचे राजे नाममात्र होते. त्या वेळचा सेनापती व दलवाई हैदर अली हाच प्रत्यक्ष कारभार पाहात होता. हैदरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू हा राज्यकारभार पाहू लागला. तो स्वत:ला ‘सुलतान’ म्हणवून घेत असे. टिपूच्या विरोधात ब्रिटिश, निजाम आणि मराठे एकत्र होऊन झालेल्या युद्धात टिपू मारला गेला. त्यानंतर १७९९ साली पाच वर्षांचा मुमाडी कृष्णराजा वोडियार याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने म्हैसूरच्या गादीवर बसवून पूर्णय्या याला दीवाण म्हणून राज्यकारभार पाहण्यासाठी नियुक्त केले. कृष्णराजाने आपली राजधानी श्रीरंगपट्टणहून परत म्हैसूर येथे नेली. १८२० सालापासून वोडियार आणि ब्रिटिशाचे संबंध बिघडू लागले. त्यामुळे १८३१ साली ब्रिटिशांनी म्हैसूर राज्य आपल्या ताब्यात घेतले. पुढील ५० वर्षे ब्रिटिशांचे शासन म्हैसूरमध्ये ब्रिटिश कमिशनर पाहात होते. सर मार्क कब्बन या कमिशनरने म्हैसूर संस्थानामध्ये चांगल्या प्रशासकीय सुधारणा घडवून आणल्या. १८७६ मध्ये म्हैसुरात मोठा दुष्काळ पडून सात लाख प्रजाजन मृत्युमुखी पडले. सन १८८१ मध्ये ब्रिटिशांनी म्हैसूर संस्थानाचा ताबा परत वोडियार चामराजा (नववा) यास दिला. चामराजानंतर १८९५ साली कृष्णराज (चौथा) याच्याकडे राजेपद आले. कृष्णराजाच्या दरबारात एम. विश्वेश्वरय्या हे दिवाण होते; तर के. शेषाद्री अय्यर, सी. रंगाचार्य हे मंत्री होते. विश्वेश्वरय्या यांनी औद्योगिक क्षेत्र व शेती यांत चांगली प्रगती केली. राजा कृष्णराज (चौथा) याच्याबद्दल सर्वत्र आदर होता. महात्मा गांधी कृष्णराजाला ‘संत राजा’ असे म्हणत. कृष्णराजानंतर त्याचा पुतण्या जयचामराजा गादीवर आला. नऊ ऑगस्ट १९४७ रोजी म्हैसूर संस्थानने स्वतंत्र भारतात सामील होण्याचा करार केला. सुनीत पोतनीस -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कुतूहल : घरगुती गॅसची सुरक्षितता
घरगुती गॅस जितका सोयीचा, सुखकारक व कार्यक्षम तेवढाच तो जर नीट हाताळला नाही तर धोक्याचाही होऊ शकतो. खरे म्हणजे आगीची सुरुवात चकमक निर्माण करण्यासाठी जेव्हा गारगोटीचा उपयोग सुरू झाला तेव्हापासून म्हणजे जाळ हा स्वयंपाकासाठी निर्माण केला व तो नियंत्रणात ठेवला तर उपयोगाचा पण जर तो हाताबाहेर गेला तर धोक्याचा. पूर्वी प्रभाकर सेफ्टी स्टोव्ह होता. त्याच्या नावातच सेफ्टी होती. पण जास्त पंप केला की त्याचाही भडका उडायचा आणि क्वचित स्फोट होई. तसेच गॅसचे आहे. गॅस सिलेंडरवर एक नियंत्रक असतो. त्याला रेग्युलेटर म्हणतात. तेथून एक रबरी नळी गॅस शेगडीपर्यंत येते. गॅस शेगडीवर चार बर्नर्स असतील तर प्रत्येकाल एकेक व्हाल्व्ह असतो व तो सुरू बंद करायला एकेक बटण असते. तेथून गॅस पुढे सरकला की तो बर्नरच्या तोंडाशी येतो व तो आपण पेटवल्यावर बर्नरभोवती ज्योत पेटते. ही ज्योत चांगली निळ्या रंगाची असते. म्हणजे गॅस कार्यक्षमतेने जळत असल्याचे ते लक्षण आहे. बर्नरच्या भोकात त्यावर ठेवलेला पदार्थ उतू गेला तर त्याचे कण बर्नरच्या भोकात अडकून बसतात व बर्नर चौफेर पेटत नाही आणि मिळणारी ज्योत एकसारखी असत नाही, आचही मग कमी होते. शेगडीवर बसवलेले व्हाल्व्हस् गळतात व गॅस तर वाया जातोच, पण तेथे जळती काडी लावली तर जाळ निघतो. आता बाजारात गॅस सेफ नावाचा एक नवीन नियंत्रक आला असून तो गॅस सिलेंडरवर बसवतात व त्यावर नेहमीचा रेग्युलेटर बसवतात. हा नियंत्रक गॅस जेव्हा वापरात नसतो तेव्हा आपोआप बंद होतो. म्हणजे गॅस चालू असताना जर आपण चाकूने रबरी नळी कापली व कापलेल्या उघडय़ा भागावर जळती काडी धरली तरी तेथून गॅस बाहेर येत नाही आणि साहजिकच गॅस पेटायचा प्रश्न उरत नाही. तसेच या नळीवर सुईने भोक पाडले व तेथे जळती काडी जवळ आणली तरी तेथे गॅस पेट घेत नाही. कारण गॅसच तेथून बाहेर येत नाही. यामुळे उंदराने नळी कुरतडली तरी येथून गॅसगळती होत नाही. अशा रीतीने बाजारात आलेला हा नियंत्रक सगळ्यांनी बसवणे सुरक्षित असते. त्याची किंमत ३९०० रुपये आहे. तो भारतीय बनावटीचा असून मुंबईत उपलब्ध आहे. अ. पां. देशपांडे मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी , मुंबई २२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मनमोराचा पिसारा.. : मित्रा, तुझा आभारी आहे! मित्रा,
‘नमस्कार प्रेमाचा आणि विनंती आग्रहाची’ असा मायना लिहून माझी कानउघाडणी करणारे पत्र मिळाले. तू आपल्या जुन्या मैत्रीची साक्ष काढलीस म्हणून पत्र वाचले आणि त्याचा ‘बॉल’ करून डस्टबिनमध्ये भिरकावले. मला शहाणपणा शिकविणारा तू कोण? माझ्या कुटुंबीयांची बाजू घेण्याचा आणि मला खोटं पाडण्याचा तुला कोणी अधिकार दिला? अशा विचारानं ते पत्र झिडकारले. कोणाच्या हाती लागू नये म्हणून फेकून दिले. जाळूनच टाकायला हवे होते, पण काही वेळाने अस्वस्थ झालो. तुझ्या पत्रातली काही वाक्यं मनात येऊ लागली. ‘आधी अविश्वास आणि आता असुरक्षितता याने मी गांजलेला आहे’ हे शब्द कानावर परत परत आदळले आणि डस्टबिनमध्ये चुरगळलेले पत्र शोधू लागलो. तोच बायको येऊन म्हणाली, ‘काय हवंय? कचऱ्यात का शोधताय? मला सांगा, मी देते शोधून..’ मी नेहमीसारखा वस्कन ओरडेन म्हणून ती दोन पावलं मागे सरकली. ‘तुमची कागदपत्रं मी वाचणार नाही, तुम्हाला वाकायला त्रास होतो म्हणून पुढे आले..’ ती म्हणाली. तेवढय़ात पत्र मिळाले. मी वाचायला आत गेलो तेव्हा ‘ही चष्मा घेऊन आली.. मित्रा, त्या क्षणी मला स्वत:मध्ये काही तरी बदल होत असल्याचे जाणवले. माझ्या कुटुंबीयांवर मी कधी विश्वास टाकला नाही. त्यांच्यावर सदैव डाफरलो. त्यांच्याशी प्रेमाने दोन शब्द बोललो नाही. कधी त्यांचं कोडकौतुक केलं नाही, कारण मी सदैव धास्तावलेलो होतो. प्रेमाने माणसं बिघडतात, प्रेम करणाऱ्या माणसाच्या डोक्यावर मिऱ्या वाटतात, असं मी कायम गृहीत धरलं. मी त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांना हव्या त्या गोष्टी आणून दिल्या म्हणजे प्रेमच केलं असं म्हणत असे. माझ्या मनाची मी तशी समजूत करून घेतली होती. आता, मुलं माझ्यावर प्रेम करीत नाहीत, त्यांच्या मनात फक्त कर्तव्याची भावना असावी, असं वाटतं. बायकोला तर मी कधी बरोबरीनं वागवलं नाही, सगळ्या नव्या-जुन्या चुकांचं खापर तिच्या डोक्यावर फोडलं. तिच्यावर सगळी जबाबदारी ढकलून मोकळा होत असे. तिला कमी लेखण्याची एकही संधी सोडली नाही. माझ्यासारख्या रुक्ष, तिरकस (खडूस) माणसावर तरीही तिने प्रेम केलं असं वाटतं. मला वाकायला त्रास होतो, हे माझ्यापेक्षा तिच्या लक्षात राहातं, ते त्या प्रेमापोटी या गोष्टीची जाणीव नाही. मला वाटते, तुझी माझी पिढी अशा अर्थहीन क्षुद्र अहंगडाने पछाडलेली आहे. (तुझा अपवाद!) हल्ली नाटक, सिनेमातून, टीव्ही सीरियलमधून आईबापांना छळणारी तरुण पिढी दाखवली जाते. जुन्या मराठी नाटकांत तर म्हातारे चांगले आणि तरुण वाईट असंच चित्रण केलं होतं. त्याचा परिणाम माझ्यावर झाला असावा. ‘मला सगळे वृद्धाश्रमात नेऊन टाकणार’ या विचारानं पछाडला होतो. माझ्या वागणुकीबद्दल तीच शिक्षा योग्य असं वाटलं म्हणून मीच हा मुलांकडे विषय काढला. सुरुवातीला त्यांना वाटलं की मी नेहमीसारखा तिरकस, कुजकट बोलतोय, पण मला रडू आवरेना, ‘मी तुमच्यावर प्रेम केलं नाही, प्रेमानं बोललो नाही, तुमच्यावर विश्वास टाकला नाही’ असं म्हटलं. तेव्हा त्यांना कळलं की मी त्यांची मनापासून माफी मागतोय. सगळ्यांनी मला आपलंसं केलं, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.. तेव्हापासून माझं जीवन बदललं आहे. आता पोटभर हसतो. मुलाशी गप्पा मारतो, बायकोला हळूच डोळा घालतो.. मित्रा, तुझा आभारी आहे.. मैत्रीची शपथ. मला माफ कर. डॉ. राजेंद्र बर्वे -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
|