सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२ इतिहासात आज दिनांक.. ५ नोव्हेंबर १५५६ मुघलांचा वारस अकबर आणि दिल्ली सत्ताधीश हेमू यांच्यात निर्णायक स्वरूपाची पानिपतची दुसरी लढाई सुरू. ही लढाई अकबराने जिंकली. पानिपतच्या तिन्ही लढायांत एतद्देशीय सत्तांचा पराभव झालेला दिसून येतो. १८१७मराठा-इंग्रज युद्धाची धुमश्चक्री खडकी (पुणे शहर) येथे झाली. या लढाईला तैनाती फौजा पुण्याच्या रोखाने निघाल्याची पाश्र्वभूमी होती. पेशव्यांचे खास दूत विठोजी नाईक रेसिडेन्सीत माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांना भेटायला गेले व ब्रिटिश फौजा परत पाठविणे आणि ब्रिटिश फौजांचा तळ पेशवे सांगतील तेथे हलविणे अशा मागण्या कानावर घालून परतले. एलफिन्स्टनने पेशव्यांना युद्धाची धमकी दिली. मराठे रेसिडेन्सीच्या दिशेने धावताच एलफिन्स्टनने महत्त्वाची कागदपत्रे जाळली. मराठय़ांनी इमारतीला आग लावली. एलफिन्स्टन सुखरूप पळाला. खडकीच्या युद्धात मराठय़ांनी ब्रिटिशांस चांगल्या पद्धतीने तोंड दिले. परंतु इंग्रजांनी फितुरीचा हातखंडा प्रयोग मराठय़ांवर केला. १६ नोव्हेंबरला येरवडय़ाला लढाई झाली येथे इंग्रजांचा विजय झाला. २२ नोव्हेंबर रोजी ब्रिटिश फौजा पेशव्यांच्या पाठलागावर निघाल्या. १८४३विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग सांगलीच्या दरबारात केला. त्यामुळे आज हा दिवस ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून पाळला जातो. डॉ. गणेश राऊत
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सफर काल-पर्वाची : सिकंदरचा हिंदुस्थान प्रवेश इसवी सनपूर्वी ३२६ मध्ये सिकंदर म्हणजेच अलेक्झांडर दि ग्रेट याने अटकच्या उत्तरेस सिंधू नदी ओलांडली व प्रत्यक्ष भारताच्या भूमीवर पाय ठेवला. तक्षशीलेचा राजा अंभी याने सिकंदरचे स्वागत केले. दरबार होऊन एकमेकांना देणग्या देण्यात आल्या. तक्षशीलेच्या पलीकडे झेलम आणि चिनाब या नद्यांच्या मध्ये पौरव राजाचे राज्य होते. सिकंदरचे लोक जेव्हा पौरव राजाकडे आले तेव्हा पौरवाने सिकंदरला निरोप पाठविला की, ‘‘मी आपली भेट माझ्या सरहद्दीवरच सशस्त्र घेईन.’’ सिंधूच्या दोन्ही किनाऱ्यांवर दोन्ही सैन्य समोरासमोर होती. पौरवाच्या सैन्यात तीस हजार पायदळ, चार हजार घोडदळ, तीनशे रथ व दोनशे हत्ती होते. त्या दिवशी जबरदस्त पाऊस झाल्याने सिकंदरला नदी ओलांडता येईना. त्याने त्याचे सर्व सैन्य घेऊन १७ मैल पलीकडे सिंधू नदीतील एका बेटाचा आडोसा घेऊन नदी ओलांडली. सिकंदरच्या सैन्यात ११ हजार पायदळ व घोडदळ होते. दुसऱ्या दिवशी पौरवाला जेव्हा कळले की, आपल्या बाजूच्या तीरावर सिकंदराचे सैन्य पोहोचले आहे. तेव्हा त्याने दोन हजार घोडदळ व १२० रथ सिकंदरला विरोध करण्यास पाठविले आणि ६० हत्ती पाठविले. तुंबळ युद्ध होऊन पौरवाचा मुलगा मारला गेला. त्याच्या सैन्याचा धुव्वा उडाला. पौरव सैन्याकडे पुरुषभर उंचीची धनुष्ये होती. जमिनीवर धनुष्य उभे टेकवून ते बाण मारीत असत. चिखल झाल्याने त्यांना धनुष्य नीट उभे करता येत नव्हते, रथही फसले. पौरवाचे आणखी दोन पुत्र मारले गेले. पौरवालाही नऊ जखमा झाल्या, पण तो शरण गेला नाही. सिकंदरने त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला राजाची वागणूक देऊन त्याचे राज्य त्याच्याकडे कायम ठेवले व त्यात भरही घातली. पौरवाने पुढे सिकंदरला साहाय्य केले व तक्षशीलेचा राजा अंभी आणि पौरव यांच्यात सिकंदरने समझोता घडवून आणला. सुनीत पोतनीस
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कुतूहल : सर्पदंश सापांमध्ये विषारी, बिनविषारी असे दोन प्रकार तर आहेतच पण काही साप निमविषारीसुद्धा असतात. साप चावलेल्या व्यक्तींमध्ये कोणती लक्षणे दिसतात यावरून तो साप विषारी आहे की नाही ते लक्षात येते. साप चावलेल्या जागेवर जळजळ
झाली नाही, सूज आली नाही तर साप बिनविषारी होता असं समजायला हरकत नाही. साप चावलेल्या ठिकाणी जळजळ होणे, सूज येणे, अंग जड होणे, जीभ जड होणे, दातखिळी बसणे साप चावला असेल त्या ठिकाणी फोड येणे, नाडीचे ठोके अनियमित होणे, नाकातोंडातून रक्त येणे. लघवीतून रक्त पडणे, हिरडीतून रक्त येणे, लघवीतून रक्त पडणे ही साप चावल्याची काही सामान्य लक्षणे आहेत. प्रथमोचार : जखम स्वछ धुवून घ्यावी, रुंद क्रेप किंवा साध्या कापडाचे बँडेज साप चावलेल्या जागेवर बांधावे, जर शरीराच्या कोणत्याही अवयवातून रक्तस्राव होत असेल तर बँडेज बांधू नये. व्यक्तीला आधार देणे हे सर्वात महत्त्वाचे. चालण्यामुळे किंवा बोलण्यामुळे त्या व्यक्तीची शक्ती खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. उंच वाढलेल्या गवताच्या जागी जाणे टाळावे. पायवाटेनेच जावे. हातात काठी घ्यावी. काठी आपटत आपटत शेतातून जावे, नाइलाजच असेल तर पायात बूट घालवेत, पोटरी आणि पोटरीचा भाग जाड आवरणाने झाकावा. डोंगरकपारी किंवा कडे चढताना दोन दगडांमधे हात ठेवण्याचा प्रसंग येतो. अशा वेळेस दगडांमधील जागेत काही नाही ते तपासून घ्यावे. चूलीच्या जवळपास लाकडे-काटक्या यांचा ढीग करून ठेवू नये. साप घरात आला तर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. कपाट, पलंग यांच्या खाली जाऊन लपून बसणार नाही याची काळजी घ्यावी. काही धाडसी तरुण हाताल रुमाल बांघून किंवा हातमोजे घालून सापाला पकडण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न करू नये. घराच्या आजूबाजूला खरकटे अन्न, ओलावा असेल तर उंदीर अशा भागात येतात, उंदरांचा पाठलाग करत साप घरात शिरतात. घराबाहेरच्या जागेत कुठेही ओलावा अडगळ ठेवू नये. सुचेता भिडे मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी , मुंबई २२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मनमोराचा पिसारा.. रात्र काळी.. घागर काळी.. संताच्या गवळणी, पदं, अभंग अशा पद्य रचनांमधील रूपकं मनाला स्तिमित करतात. आपल्या भवतालच्या क्षुल्लक आणि नित्य परिचयातील कामं गृहकृत्य आणि परिसरातील निसर्ग हे सगळं त्यांना रुपकात्मक वाटायचं. अशा नित्यकर्मातलं कौशल्य, वृक्षवेलींवरचा फुलांचा बहर, फळांनी लगडलेल्या फांद्या आणि भुंग्यासारखे कीटक यामध्ये त्यांनी सौंदर्य शोधलं. परमात्म्याने सामान्य लोकांना उधळलेलं प्रेम त्यांना अशा सामान्य गोष्टीमधून प्रतीत झालं. इथे विष्णुदास नामदेवांच्या गवळणीची वारंवार आठवण येतेय. गोविंद पोवळे आणि भजनी मंडळाचे साधे, सरळ सूर कानात घुमू लागतायेत. मित्रा, या साध्या रचनेचा विचार केला तर त्यातल्या प्रतीकामध्ये मन हरवून जाते, विचारांचा संज्ञाप्रवाह मनात वाहू लागतं. या संतांनी आपल्या विठुरायावर केलेल्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या अनुभूतीने मन ओथंबून जातं. डोळ्याला
नकळत पाझर फुटतो. रात्र काळी, घागर काळी यमुना जळे ही काळी वो माय बुंथ काळी, बिलवर काळी गळा मोतीयाळी काळी वो माय मी काळी कांचोळी काळी
कास कासौळी ते काळी वो माय एकली पाण्याला नवजाय साजणी सवें पाठवी मूर्ती सावळी वो माय विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी कृष्णमूर्ती बहू काळी वो माय गदिमांनी ‘ळ’ हे अक्षर यमकाकरता योजून घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा. हे गाणं लिहिलं. विष्णुदासांनी हा प्रयोग शेकडो वर्षांपूर्वी करून ठेवला होता. या गवळणीतली रूपकं अतिशय मार्मिक आहेत. वेळ रात्रीची काळी यमुनेची ‘जळे’ काळी, घागर काळी आणि मीही काळी’. इथे काळा रंग अज्ञानाचं प्रतीक होतो. यमुना म्हणजे जीवनरूपी काळा प्रवाह. मी मोठय़ा हौसेने घातलेले बिलवर आणि गळ्यातले मोती काळे, बुंथ काळी. माझी काचोळी काळी अंगावरचं वस्त्रही काळं. मी म्हणजे अंधारमय अज्ञान आहे. कसं वो माय, कसं ग बाई माझं, जीवन काळोखलेलं आहे. अशातही घागरीने पाणी भरण्यासारखी नित्य र्कम करावी लागताहेत. या तमोमय आयुष्याला एकटेपणा न आला तरच नवल! कोणाचीही साथ नाही, आधार नाही. म्हणून माझ्या काळेपणाला छेद देणारी सावळी मूर्ती मजपाशी ठेवायला हवा. म्हणजे त्या सावळ्या विठ्ठलाच्या सान्निध्यात, भक्तीमध्ये आणि भजनात माझं जीवन उजळून जाईल. त्याचा सावळा रंग मला प्रकाश दाखवील. मी एकटी नाही. मला आता त्या तमसाची, भीती वाटत नाही. पदोपदी त्या सावळ्या, गोजिऱ्या विठुरायाची संगत आहे.. किती साधीभोळी गवळण आहे. होय ना? असं ऋजु, जीवन जगता आलं पाहिजे, असंच वाटतं, ना रे! नुसत्या विचारानं अंगभर पिसारा फुलतो.. डॉ. राजेंद्र बर्वे
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
|