इतिहासात आज दिनांक.. : ३१ ऑक्टोबर १७९५श्रेष्ठ इंग्रज कवी जॉन कीट्स यांचा लंडन येथे जन्म. १८७५ भारताचे पोलादी पुरुष, उपपंतप्रधान, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्य़ात जन्म झाला. वकिली चालू असताना महात्मा गांधी यांच्या संपर्कात ते आले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाचे ते सरदार झाले. खेडा, बाडरेली सत्याग्रह, हैदराबाद, जुनागड, काश्मीर संस्थानांचे विलीनीकरणात त्यांचा सहभाग होता. १९८४ भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या. १९१७ मध्ये अलाहाबाद येथे पं. जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. सारे घराणेच भारतीय स्वातंत्र्यलढय़ात सहभागी असल्याने देशभक्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी वानरसेना स्थापून इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली. शांतिनिकेतन, पुणे, इंग्लंड, स्वित्र्झलड येथे शिक्षण. १९४२ मध्ये लढाऊ काँग्रेस कार्यकर्ते फिरोज गांधी यांच्याशी विवाहबद्ध. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताच्या उभारणीत भरीव योगदान. केंद्रीय सामाजिक न्याय आयोग, कँाग्रेस कार्यकारिणी सदस्य, युवक काँग्रेस अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्षपद, माहिती व नभोवाणी मंत्री, पंतप्रधानपद अशी पदे त्यांनी भूषविली व त्यावर स्वत:चा ठसा उमटविला. १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण, १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव, बांगलादेश निर्मिती, भारताचा पहिला अणुस्फोट, ब्ल्यू स्टार ऑपरेशन, वीस कलमी कार्यक्रम यांमुळे त्यांची कारकीर्द वादळी ठरली. प्रा. गणेश राऊत -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सफर काल-पर्वाची : कुमरान स्क्रोलचे मोल इस्रायलमधील मेंढपाळाला मिळालेले चमडी पट्टय़ांवर केलेल्या लिखाणाचे गुंडाळे बेथलेहेममधील एका दुकानदाराने विक्रीसाठी बाहेर ठेवले. त्या रस्त्याने जाताना हिब्रू विद्यापीठाचे प्राध्यापक सुकेनिक यांना ते दिसले. त्यांना त्या गुंडाळ्या म्हणजेच स्क्रोल्सचे महत्त्व माहीत होते. त्यांनी त्या सात पैकी तीन गुंडाळ्या जुजबी किमतीला घेतल्या. नंतर जेरूसलेमच्या सेंट मार्क चर्चचे प्रमुख रेव्हरंड सॅम्युएल यांनी उरलेल्या चार गुंडाळ्या घेतल्या. अमेरिकेत या चार स्क्रोल्सना चांगले पैसे मिळतील असा अडाखा बांधून ते अमेरिकेत गेले. तेथल्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये त्यांनी त्यासाठी जाहिरात दिली. ती जाहिरात नेमकी सुकेनीक यांचा मुलगा यादीन याने वाचून तो सॅम्युएल यांना भेटला. यादीन हे पुरातन वस्तूंचे संशोधन करीत होते. त्यांनी अमेरिकेतले धनाढय़ ज्यू गोटस्मन यांच्या सहकार्याने ती चर्मपत्रे सॅम्युएलकडून दोन लाख पन्नास हजार डॉलर्सना विकत घेऊन त्या दोघांनी सर्व सात स्क्रोल्स इस्रायल सरकारच्या ताब्यात दिले. इस्रायल सरकारने त्या गुंडाळ्यांचे बरेच संशोधन केले. या चर्मपत्रांवर गुहेत राहणाऱ्या कर्मठ संन्याशांनी त्यांच्या प्रार्थना, उपासनांचा मजकूर, बायबलवरील भाष्ये आणि येशू ख्रिस्तांच्या काळातल्या घटनांचे प्रत्यक्ष वर्णन लिहिले आहे. यातील काही हस्तलिखिते पहिल्या, दुसऱ्या शतकातली आहेत. काही स्क्रोल्सवर मूळ हिब्रूतून दुसऱ्या शतकात ग्रीक भाषांतर केलेले ‘सेप्टुआजित’ हे बायबलही आहे. या चर्मपत्रांमुळे बायबलच्या अस्सलपणावर शिक्कामोर्तब झाले आहे. या वस्तूचे इतके मूल्य आहे हे कळल्यावर कुमरान प्रदेशातील बेदुइन लोक टेकडय़ांवरील नवनवीन गुहज्ञांमध्ये चर्मपत्रासाठी धुंडाळू लागले. एका गुहेत बायबलच्या स्तोत्र संहितेची गुंडाळी आणि २९ फूट लांबीचा टेंपल स्क्रोल मिळाला. एका गुहेत तांब्यांची गुंडाळी मिळाली. या गुंडाळ्यांवरील लिखाण आणि बायबलची संहिता तंतोतंत मिळतीजुळती आहे. सुनीत पोतनीस -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कुतूहल : ओझे वाहून नेल्यामुळे होणारे आजार
खेडेगावातून पाण्याचे हंडे एकावर एक ठेवून पाणी भरणाऱ्या स्त्रिया, लहान मुली आपल्या नजरेस पडतात. डोक्यावर दोन किंवा तीन हंडे आणि कमरेत एखादी कळशी घेऊन या स्त्रिया डौलदारपणे चालत असतात. गावातून एकापुढे एक चालणाऱ्या या स्त्रियांमध्ये कोण जास्त हंडे घेऊन जाते यामध्ये जणू स्पर्धाच असते. आपल्याला पाहताना हे काम कष्टाचे वाटते. त्यांना हे रोजचेच असते. या कामामुळे आपल्याला पुढे काही आजार होऊ शकतील असे त्यांना अजिबात वाटत नाही. मान, पाठीचा कणा, ओटीपोट या अवयवांवर ताण येतो. या अवयवांना बोलता येत नाही त्यामुळे ते अवयव बिचारे गप्प बसतात. पण पुढे कधी तरी रागवतात, असहकार करतात किंवा संप पुकारतात तेव्हा आपल्याला रडवतात. पाण्याच्या आणि हंडय़ांच्या एकत्रित वजनाचा ताण पाठीवर पडल्यामुळे पाठीचे दुखणे पाठ सोडत नाही. शिवाय हंडा उचलताना कोपर आणि खांद्यावर ताण येतो. याचा दुसरा घातक परिणाम म्हणजे गर्भाशय खाली सरकते किंवा मागे पडते. मानेचे मणके झिजतात, मानेच्या शिरेवर ताण येतो, हाताला मुंग्या येतात. खेडय़ातील जीवनपद्धतीत पाणी लांबून डोक्यावर आणावेच लागते. त्याला काही पर्याय नाही. अशा वेळेस काही खबरदारी घेता येते. कमरेच्या डाव्या किंवा उजव्या बाजूवर नेहमी वजन ठेवत असलात. तर मधून मधून दुसऱ्या बाजूलापण कामाला लावा. त्यामुळे एकाच बाजूवर ताण येणार नाही. हंडा किंवा वजनदार वस्तू जमिनीवरून उचलताना कमरेत वाकून उचलण्याऐवजी गुडघा टेकून उचला. असे केल्याने पाठीत लचक भरणार नाही. पाठ, मान खांदे सरळ रेषेत राहतील अशा पद्धतीने चालावे. सुचेता भिडे मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी , मुंबई २२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मनमोराचा पिसारा.. : तुझ्या हातात हात अलगद..
चालता चालता थबकलो, थकलो नव्हतो तरी थांबलो. थांबलो फक्त थांबण्यासाठी. थांबून पाहण्यासाठी की थांबणं म्हणजे असतं काय? थांबणं म्हणजे संपणं नाही, थांबणं म्हणजे न चालणं नाही. पाय थांबले, मन थांबत नव्हतं. त्याच वेगानं चालत होतं. अवचित भटकलेलं, इथे तिथे रेंगाळणारं. कुठूनही कुठे जाणारं.. पाय थांबले तरी मन थांबलं नाही आणि मन थांबलं नाही म्हणून चालत राहिलो. कधी खूप खूप, दूर, दूर. कधी तिथल्या तिथे घुटमळत राहिलं मागे-पुढे. पायात लुडबुडत राहिलं. हवं तिथे पोचूनही हरवल्यासारखं काही तरी गवसल्यावरदेखील अपुरं आणि अधुरं वाटत राहिलं.. मन काही थांबेना, उभ्या जागी बसलो, धानस्थ वगैरे. गुडघ्यावर हात. पाठीच्या कण्यातला नैसर्गिक बाक आणि वळणांना सांभाळून तरी श्वासाच्या खुंटीवर मन स्थिरावत नव्हतं. काया स्थिर, मन चंचल, अविश्रांत भटकणारं. मग ठरवलं, थांबल्या थांबल्या, थबकल्या थबकल्यानं नाही काही साध्य होतं. चालावं, चालत राहावं, मन स्थिरावण्याकरता चालावं. मग वाटेत भेटलं वॉकिंग मेडिटेशन.. चंक्रमण, चालता चालता ध्यानस्थतेचा अनुभव घेता येतो. सहज, सुंदर नि साधा. नाही तरी मेडिटेशन म्हणजे आत्ममग्न संवाद. मनातल्या करुणेचा साक्षात्कार, मनातल्या प्रशांत स्थिरतेचा जागता अनुभव. तिथेच ही कविता भेटली. घे माझा हात तुझ्या हातात अलगद, आपण करू वाटचाल आपण होऊ पांथस्थ फक्त चालत राहू चालताना, चालण्याचा आनंद घेऊ कुठेही पोहोचायचं नसताना, चालत राहू शांतपणे चालू सुखासमाधानानं चालू
आपलं चालणं म्हणजे शांतीसाठी पदभ्रमण आपलं चालणं म्हणजे सुखासाठी पदभ्रमण मग ध्यानात येईल तुझ्या न् माझ्या शांतीसाठी पदभ्रमण असं काही नसतं चालत राहाणं हीच शांती सुखासाठी पदभ्रमण असं काही नसतं. चालत राहाणं हेच सुख आपण आपल्यासाठी चालतो मी माझ्यासाठी, तू तुझ्यासाठी तू माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी चालता चालता होतो क्षणोक्षणी स्पर्श सुखाचा, चालता चालता होतो पदोपदी स्पर्श शांतीचा प्रत्येक पदन्यासासमवेत येते ताजीतवानी झुळूक प्रत्येक पदन्यासानं फुलतात चिमुकली फुलं, नाजूक आपल्या वाटेपाशी प्रत्येक पाऊल म्हणजे जवळिक धरेशी प्रत्येक पाऊल म्हणजे संवाद पृथ्वीशी प्रत्येक पाऊल म्हणजे उमटलेला ठसा, प्रेमाचा, शांतीचा अवघी अवनी होते प्रेममय, सुखी जेव्हा असतो हात तुझ्या माझ्या हातात आणि वाहतो झरा प्रेमाचा तुझ्या माझ्यात.(संदर्भ- वॉकिंग मेडिटेशन थिच, हॅत, हान - जयको प्रकाशन) डॉ. राजेंद्र बर्वे -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
|