ग्रेट आयडियाज् : ‘व्यवस्थापन म्हणजे इतरांना प्रेरित करणं..’-ली आयकोका Print

altअनघा दिघे, सोमवार, २७ फेब्रुवारी  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altऑटोमोटिव्ह जगताचा बादशाह आणि उत्तम संवादपटू म्हणजे ली आयकोका. अमेरिकन मूल्यांचं साकार मूर्त स्वरूप बनण्यापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास रोमहर्षक आहे. निम्नस्तरीय सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्याबद्दल ते सांगतात. संभाषण कलेमार्फत दुसऱ्याला उद्युक्त करण्याचे कौशल्य विकसित करण्यावर ते भर देतात.. मिस्टर मस्टॅग या नावाने ख्याती लाभलेल्या ली आयकोका यांची फोर्ड कंपनीतून उचलबांगडी झाली आणि नंतरच्या दशकामध्ये अमेरिकन मोटार उद्योगाच्या विक्रीच्या आलेखांमध्ये तसेच नफा करणाऱ्या कंपन्यांच्या नावांमध्ये फार झपाटय़ाने बदल झाले. क्राईस्लर कॉर्पोरेशन दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभी असताना ली आयकोका यांनी १९७८ मध्ये अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. तेव्हाच्या क्राईस्लरमध्ये सर्वच मुख्य कार्यकारी अधिकारी जणू स्वत:ची जहागिरी असल्याच्या भ्रमात वावरत होते. उत्पादनाच्या नवनिर्मितीचे अध्वर्यू अभियंते आणि प्रत्यक्ष उत्पादन विभाग यांच्यात काहीच सुसंवाद, कुठल्याही प्रकारची देवघेव नव्हती. इतकंच नव्हे, तर कंपनी संपूर्णपणे डबघाईस आली होती.
करिअरच्या सुरुवातीपासूनच आयकोका यांची फोर्डमधील कारकीर्द मस्टँगसारख्या झकास गाडीची निर्मिती आणि मार्केटिंगचं तुफान तंत्र हे लोकोत्तर म्हणावं असंच आहे. डबघाईस आलेल्या क्राईस्लरमधील त्यांचं योगदान जाणून घ्यायचं तर काही प्रश्न पडतात; ते असे की, क्राईस्लरमध्ये बदल घडवून आणणारं त्यांचं तंत्र हे अभिनव होतं का? उत्पादनामध्ये त्यांची अभिजातता (इनोव्हेशन) दिसते का? आणि तिसरे म्हणजे, त्यांच्या यशाचं नेमकं गमक काय - संघटन-कौशल्य की वित्तीय कौशल्य?
सुसंवाद आणि संघकौशल्य या दोन्ही गोष्टींची कमतरता त्या काळात क्राईस्लरमध्ये भेडसावणारी होती. कामगार आणि अधिकारी या दोघांची नस चांगली ओळखली असल्यामुळे कंपनीतील या दोन्ही शक्तींना ते एकत्र आणू शकले.
आयकोका यांनी अधोरेखित केलेले उत्तम भाषणाचे महत्त्व त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहोत..
‘संवाद साधणं हे माझं अनमोल असं व्यवस्थापन तंत्र बनलं. अर्थकारणातील तज्ज्ञ असणारे बिझनेसमन किंवा तांत्रिकदृष्टय़ा उजवे असे बिझनेसमन यशस्वी होताना मी पाहिले आहेत. ज्या दिशेनं एखाद्या संस्थेनं जावं, असं मला वाटतं, त्या दिशेनं लोकांना हाकारण्यात मी तरबेज आहे, हे मी फार आधीपासून ओळखलं होतं आणि हे घडवून आणण्यासाठी तुम्ही वापरता ते शब्द महत्त्वपूर्ण असतात. उत्तमरीत्या संवाद संपर्काचं हे तंत्र मी दररोज वापरत होतो. लोकांनी काय करावं, असं तुम्हाला वाटतं हे तुम्ही जर नेमकेपणानं व्यक्त करू शकलात आणि जर ते योग्य असेल, सयुक्तिक असेल तर लोक तसं वागतात व काम पुरं करतात, हे इंगित मी पुरतेपणी ओळखून चुकलो होतो.. परंतु, केवळ योग्य माहिती पुरवण्यापेक्षा अधिक प्रभावी असं काहीतरी संवादामध्ये असतं. प्रभावी संवाद हा प्रेरणा देणारा असतो. दुसऱ्याला प्रेरित करणं हेच माझ्या भाषण-संभाषणातील उद्दिष्ट असतं. कुठलीही माहिती ही तुम्ही एखाद्या परिपत्रकाद्वारे किंवा बुलेटिनमार्फतही पुरवू शकता. परंतु, एखाद्याला प्रेरित करण्यासाठी संवाद हा प्रस्थापित व्हावा लागतो. तो हृद्य असावा लागतो. अनेकांना एकाच वेळी प्रेरित करण्यासाठी भाषण हा मानवी क्रियांमधील एक फर्मास आणि अत्यंत प्रभावी पर्याय ठरतो.
क्राईस्लरमधील माझ्या कारकिर्दीमध्ये बहुतेक वेळा मी सरधोपट मार्ग सोडून जाणाऱ्या एकांडय़ा शिलेदारासारखा होतो. एकापाठोपाठ एक भाषणांचा मी सपाटा चालवला होता. मी असे मत व्यक्त करायचो की, या ८० च्या दशकाचा डामडौल हा लवकरच ढेपाळणार आहे. जनता-कर्जाचा हा भयकारी बोजा आपल्या मुलांसाठी घातक ठरणार आहे. किंवा इंधन बचत करण्यासाठी गॅसवर कर लावला पाहिजे, असे मत मांडून मी लोकांना छोटय़ा चारचाकी विकत घेण्यासाठी उद्युक्त करायचो. अमेरिकन उद्योगांना मार्केटमध्ये शिरकाव करू न देणाऱ्यांना खुल्या धोरणाने आपण मात्र का स्वीकारावे, असेदेखील मी विचारायचो.
मुद्दामच मी माझ्या श्रोत्यांना अस्वस्थ करायचो. त्यांना विचार करायला भाग पाडायचो. त्या काळच्या पारंपरिक विचारप्रक्रियेला आणि ज्ञानाला लोकांनी आव्हान द्यावे, यासाठी मी त्यांना उद्युक्त करायचो.
चांगले भाषण हे एखाद्या चांगल्या कादंबरीसारखे असते. हे संघर्षांच्या मूळ मुद्दय़ाभोवती गोवलेले असते. जगात सगळंच काही सुरळीत असेल तर भाषणाची गरजच काय? जे सोयीस्कर आहे, पण मुळात चुकीचं आहे आणि जे अस्वस्थ करणारं आहे, परंतु सत्य आहे, अशा दोन गोष्टींमध्ये मूलत: संघर्ष असतो. सत्य हे विदारक, दुखावणारं असतं, परंतु ते योग्यरीत्या जर विकता आलं तर त्याला नेहमीच बाजारपेठ असते.
भाषण ही विक्रीची एक संधी असते. एक चांगला विक्रेता म्हणून मी माझ्या करिअरमध्ये कीर्ती कमावली. भले एखादी कार विकायची असो किंवा एखाद्या सार्वजनिक धोरणामध्ये बदल घडवून आणावयाचा असो.. चांगल्या विक्रेत्याला हे माहीत असतं की, ग्राहकाला केवळ तुमच्या उत्पादनामध्ये रस वाटून पुरेसे होत नाही. तुम्हाला ऑर्डर मिळवायची असते. क्राईस्लरमधील माझ्या प्रत्येक भाषणामध्ये समारोप करताना मी ऑर्डरबद्दल विचारणा करायचो. माझ्या मतांचे मंडण आणि साधकबाधक चर्चा केल्यानंतर पहिल्या रांगेतील श्रोत्यांना मी विचारायचो की, ज्या समस्यांचा मी नुकताच ऊहापोह केला त्याबद्दल आता काय करण्याची त्यांची इच्छा आहे, ती सोडवण्यासाठी त्यांना काय करावेसे वाटते? कृती करण्याचं आवाहन तुमच्या भाषणात असलं पाहिजे. तुम्ही असंच तुमच्या श्रोत्यांना मोकाट सोडू शकत नाही. काहीतरी करण्यासाठी उद्युक्त होऊनच श्रोत्यांनी सभागृह सोडले पाहिजे.’
धाडसी निर्णय आणि जोखीम उचलण्याची जबरदस्त क्षमता हे आयकोका यांचे विशेष पैलू. यश मिळवायचं तर प्रत्येक व्यापारामधील आणि उत्पादनामधील सुप्त जोखीम ही उचलावीच लागते, असं त्यांना वाटायचं. व्यापारामधील दैनंदिन क्रिया-व्यापारांच्या फार पलीकडची दूरदृष्टी ही आयकोकांची वैशिष्टय़पूर्णता. त्यांची विचार करण्याची पद्धत फार वेगळी आहे. त्यांच्या अभिनव निर्भरतेसाठी ते आजही प्रसिद्ध आहेत. महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी जगावेगळे निर्णय घ्यायला ते कधीही कचरले नाहीत. खूपच कमी वेळात कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळेच त्यांना उत्तुंग यश लाभले, असे विश्लेषकांचे मत आहे.