ऑटोमोबाइल डिझायिनग: तंत्र आणि डिझायिनगचा अनोखा मेळ Print

गीता कॅस्टेलिनो, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२

अनुवाद - सुचित्रा प्रभुणे
तंत्र आणि कल्पकता यांचा अनोखा मेळ असलेले ऑटोमोबाइल डिझायनिंग म्हणजे नक्की काय असते? त्याचे प्रशिक्षण व करिअरसंधी याची सविस्तर माहिती देणारा लेख-
रस्त्यावरून जात असताना अचानकपणे नव्या एका कारचे मॉडेल आपल्यासमोरून जाते आणि आपण त्याकडे डोळे विस्फारून बघत बसतो. त्या कारचे देखणेपण, आकर्षकता आपल्या मनात भरते. याचे नेमके श्रेय कोणाचे असते? थोडा विचार केला तर सहजपणे लक्षात येईल की, ही सारी करामत गाडी निर्मिती करणाऱ्या कंपनीपेक्षा प्रत्यक्षात त्या गाडीचे मॉडेल तयार करणाऱ्या ऑटोमोबाइल डिझायनरची आहे. गाडीची रचना नेमकी कशी असावी, हे ठरवण्याचे काम या ऑटोमोबाइल डिझायनरचे असते. सर्वसाधारणपणे गाडीच्या डिझाइनचे प्रामुख्याने तीन भाग पडतात- ते म्हणजे, इंटेरिअर ऑटोमोटिव्ह डिझाइन, इक्स्टिअरिअर म्हणजेच बाह्य डिझाइन आणि रंगाचे डिझाइन.
इंटेरिअर म्हणजेच अंतर्गत डिझाइनमध्ये गाडीच्या आतील भागाचा विचार प्रामुख्याने केला जातो. ज्यात गाडीच्या आतील भागाची रचना, तिचा आकार, विविध भाग नेमके कुठे असतील, जो गाडी वापरणारा आहे त्याला ती चालवताना आरामदायी आणि सहज कशी वाटेल या बाबींचा विचार केला जातो.
इक्स्टिअरिअर म्हणजेच गाडीचे बाह्य डिझाइन. हा डिझाइनमधला सर्वात महत्त्वाचा भाग असतो. यात गाडीचा बाह्य आकार कोणत्या पद्धतीचा असेल, तिची स्टाइल कशी असेल, डोळ्यांना ती कशी दिसेल या सर्व गोष्टींचा थ्री डी आणि व्हच्र्युअल तंत्र वापरून विचार केला जातो.
गाडीची अंतर्गत आणि बाह्य रचना लक्षात घेऊन तिचा बाह्य व आतील रंग कोणता असेल, कोणकोणत्या रंगांमध्ये गाडीची मॉडेल्स खुलून दिसतील या गोष्टींचा विचार रंगांच्या डिझाइनमध्ये केला जातो.
तयार केल्या जाणाऱ्या गाडीचा नेमका वापर कशासाठी केला जाणार आहे, कोणकोणत्या घटकांद्वारे ती हाताळली जाणार आहे, आदी सर्व बाबींची माहिती ऑटोमोटिव्ह डिझायनरला असणे आवश्यक असते. त्यामुळेच बहुतांश वेळा त्यांना ऑटोमोबाइल इंजिनीअरसोबत बसून काम करावे लागते .
ऑटोमोबाइल डिझायिनगमध्ये ऑटोमोबाइलच्या विविध वाहनांचे जसे कार, ट्रक , व्हॅन्स , बसेस् आणि मोटरबाइक इ. चे डिझायिनग केले जाते.
प्रशिक्षणसंस्था
ऑटोमोबाइल डिझायिनगचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. या संस्थांमध्ये नियमितपणे पदवी किंवा पदविका शिक्षण देणारे अभ्यासक्रम असतात. या alt
शिवाय देश-परदेशात अशा काही संस्था आहेत, ज्या ऑटोमोबाइल डिझायिनगचे प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील प्रशिक्षणांमधून डिझायिनगचे विविधांगी ज्ञान मिळते. जसे डिझायिनग करताना कोणकोणत्या तंत्रसामग्रीचा उपयोग करावा, संगणकाच्या सहाय्याने नकाशात्मक प्रक्रियेचे विश्लेषण करणे, कोणत्याही स्वरूपाच्या रस्त्यावर वाहन नीट धावू शकेल, या गोष्टीचा विचार करून विविध डिझायिनगच्या प्रक्रिया व त्यांची रचना इत्यादी. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना थ्री डी तंत्रांचा अवलंब कसा करावा, याचे प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून मॉडेल तयार करीत असताना काही त्रुटी जाणविल्यास अथवा काही नव्याने बदल करायचा झाल्यास, त्याचा नेमका अंदाज या तंत्रामुळे येतो. त्याचबरोबर उत्पादन डिझायिनग व्यवस्थापन (प्रॉडक्ट डिझायिनग मॅनेजमेन्ट), वाहनाची रचना, सुरक्षितता, त्याचा परिणाम, ऑटोमोटिव्ह प्रक्रियेमध्ये करावा लागणारा संगणकाचा नेमका व आवश्यक असा वापर आदी. सर्व गोष्टीच्या सखोल ज्ञानांचा समावेश या प्रशिक्षणामध्ये केला जातो.
कोणत्याही वाहन निर्मितीमागचा हेतू सरळ, साधा असला तरीही त्यामध्ये काय काय घडवता येऊ शकेल हे पाहण्याचे काम ऑटोमोबाइल डिझायनरचे असते. त्यामुळेच बहुतेक वेळेला डिझायनर मंडळींना इंजिनीअर्स किंवा इतर डिझायनर मंडळींच्या टीमबरोबर काम करावे लागते. प्रत्यक्ष वाहनाची निर्मिती होत असताना त्यामध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टींचा विकास साधता येईल, याचा नेमका अंदाज यावेळी डिझायनरला येत असतो.
वाहनाची संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर डिझायनरचे काम सुरू होते. कॅड तंत्राचा वापर करून तो त्या वाहनासंदर्भातील चित्रे तयार करतो. मग संगणकीय प्रोग्रॅमच्या सहाय्याने सखोल आणि सुस्पष्ट अशी चित्रे (ड्रॉइंग) बनवली जातात. थ्रीडी इमेजच्या स्वरूपातील ही चित्रे असतात. ज्यात वाहनाच्या लहानसहान गोष्टींपासून ते मोठय़ा गोष्टींपर्यंतचा, जसे हेडलाइटस्चे कोन कसे असावेत इथपासून ते एक्झॉस्टची टीप कशी असावी, आदींचे सखोल व सूक्ष्म चित्रण त्यात केले जाते. त्याचबरोबर वाहनाच्या आतील व बाहेरील रंगसंगतीचा देखील यात विचार केलेला असतो.
एकदा का चित्रांचा भाग स्पष्ट झाला की डिझायनर मातीच्या सहाय्याने वाहनांची प्रतिकृती तयार करतो. कोणत्याही वाहनाचे डिझाइन करण्यापूर्वी त्या वाहनाचे कार्य आणि त्याची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, तसेच ते वाहन कोणकोणत्या प्रकारच्या रस्त्यावर धावणार आहे या गोष्टींची नेमकी जाण डिझायनरला असणे आवश्यक आहे.
नवनिर्मितीबरोबर चित्रकला आणि शिल्पकलेवर प्रभुत्व असेल तर ती व्यक्ती ऑटोमोबाइल डिझायनरच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊ शकते.
ऑटोमोबाइल डिझायनर म्हणून करिअरला सुरुवात करताना डिझायनरकडे कॅडची पदवी असणे ही प्राथमिक अट आहे . ही पदवी साधारणपणे कला शाखेच्या अथवा तंत्रज्ञान संस्थेच्या किंवा खासगी प्रशिक्षण संस्थांमार्फत प्राप्त करता येते. डिझायिनगमधून पदवी प्राप्त केल्यानंतर काही डिझायनर मंडळी पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा विचार करतात. पण इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की, जर वेतनवाढीच्या दृष्टीने हे शिक्षण घेतले जात असेल तर त्याचा तसा काहीच फायदा होत नाही. ज्यांना खरोखरीच या क्षेत्रात करिअर करण्यामध्ये रस असेल त्यांनी ऑटोमोटिव्ह किंवा ट्रान्सपोर्टटेशन डिझायिनगचे प्रशिक्षण घ्यावे.
ऑटोमोबाइल डिझायनरच्या प्राथमिक प्रशिक्षण काळात जो अभ्यासक्रम शिकवला जातो, त्यात प्रामुख्याने कार आणि रस्त्यावर धावणाऱ्या इतर वाहनांच्या डिझाइनचा विचार केला जातो. जर या अभ्यासक्रमात तुम्हाला पदवी मिळवायची असेल तर गणित, कॅड आणि नमुना प्रतिकृती तयार करणे ( मॉडेल मेकिंग ) इ. विषयांवर तुमचे प्रभुत्व असणे आवश्यक आहे.  
यासंदर्भात ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्यादेखील काही संस्था आहेत. तुमच्या सोयीनुसार तिथे प्रशिक्षण घेण्याची सवलत असते. तेव्हा अशा अभ्यासक्रमांचा देखील तुम्ही उपयोग करून घेऊ शकता.
प्रशिक्षण काळामध्ये इंटर्नशिप हा महत्त्वाचा भाग असतो. कारण प्रत्यक्ष ऑटोमोबाइल डिझायनर म्हणून करिअरला सुरुवात करण्यापूर्वी या इंटर्नशिपच्या माध्यमातून alt
बरेच काही शिकता येते. नि त्याद्वारे स्वतलादेखील जोखण्याची संधी मिळते. कारण या काळात तुम्ही प्रत्यक्ष अनुभवी आणि तज्ज्ञ डिझायनरबरोबर काम करीत असतात. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. या अनुभवाचा उपयोग तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ तयार करण्याच्या दृष्टीने होऊ शकतो. तर या इंटर्नच्या काळात तुमचे काम कंपनीला पसंत पडल्यास तुम्हाला थेट नोकरीसाठी देखील विचारले जाऊ शकते . इतर क्षेत्रांप्रमाणे ऑटोमोबाइल डिझाइन क्षेत्रातदेखील स्पध्रेला चांगलेच तोंड द्यावे लागते. बहुतांश डिझायनर मंडळी ही संकल्पना आणि डिझाइन विभागात ( कॉन्सेप्ट अ‍ॅण्ड डिझाइन ) काम करताना आढळतात. कारण तिथे एकाच वेळी अनेक प्रकारच्या वाहनांच्या निर्मितीच्या डिझाइनचे काम सुरू असते. शिवाय, कार ही अशी गोष्ट आहे, जिला जागतिक स्तरावरील बाजारपेठेत नेहमीच चांगली मागणी असते. त्यामुळे ऑटोमोबाइल डिझायनरना या क्षेत्रात कामाच्या दृष्टीने चांगलाच वाव आहे. अगदी आर्थिक मंदीच्या काळातदेखील नवनवीन आणि वेगळ्या संकल्पना राबवू पाहणाऱ्या डिझायनर मंडळींच्या शोधात ऑटोमोबाइल कंपन्या असतात. कारण डिझाइनमध्ये काही फेरफार करून अथवा एखादी अभिनव संकल्पना घेऊन ती या काळात आणल्यास विक्रीचा चांगलाच खप होताना दिसतो.
ऑटोमोबाइल डिझायनरच्या कामाचे स्वरूप हे औद्योगिक डिझायनरच्या श्रेणीत येते. त्यामुळे त्याला मिळणाऱ्या कामाचा मोबदला हा त्याच्यामधील कल्पनाशक्ती, त्याच्याजवळ असलेले गुण विशेष, अनुभव तसेच तो ज्या कंपनीसाठी काम करीत आहे यांसारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतो.  
मागील काही वर्षांत भारताने ऑटोमोबाइल क्षेत्रात चांगलीच आघाडी मिळवली आहे, तेव्हा ऑटोमोबाइल डिझायनरना या क्षेत्रात करून दाखविण्यासारखे खूप काही आहे. फक्त गरज आहे ती सतर्क राहून संधींचा लाभ घेण्याची.