जात प्रमाणपत्राअभावी नवी मुंबईच्या महापौरांना धक्का Print

निवडणुकीतील अर्ज बाद विरोधकही बाद झाल्याने पराभव मात्र टळला
प्रतिनिधी, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेत पाशवी बहुमत असूनही जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार आणि विद्यमान महापौर सागर नाईक यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविला. नाईक यांच्या सुदैवाने शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनोज हळदणकर, सुतीश रामाणे तसेच काँग्रेसचे अमित पाटील यांचे अर्जही पुरेशी कागदपत्रे नसल्याने बाद ठरले. अन्यथा एकहाती बहुमत असून विरोधकांचा महापौर खुर्चीवर बसलेला पाहण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली असती.
नवी मुंबईचे पुढील अडीच वर्षांचे महापौरपद इतर मागासवर्गीय जातीसाठी (ओबीसी) आरक्षित आहे. शुक्रवारी महापालिकेच्या बेलापूर येथील मुख्यालयात महापौरपदाची निवडणूक सुरू होताच शिवसेनेच्या सदस्यांनी सागर नाईक यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. सागर नाईक हे खुल्या प्रवर्गातील प्रभागातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करावे, अशी मागणी शिवसेनेचे उमेदवार मनोज हळदणकर यांनी केली. यावर निवडणूक निर्णय अधिकारी तसेच रायगडचे जिल्हाधिकारी होनाजी जावळे यांनी नाईक यांचा अर्ज तपासला असता जातीचे वैधता प्रमाणपत्र त्यांना आढळून आले नाही. त्यामुळे अर्ज बाद करत असल्याचे जावळे यांनी जाहीर करताच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या तोंडचे पाणीच पळाले. यानंतर शिवसेनेचे मनोज हळदणकर, सतीश रामाणे तसेच काँग्रेसचे उमेदवार अमित पाटील यांचे अर्जही जातीचे प्रमाणपत्र नसल्याने बाद ठरविण्यात आले. मात्र आपण ओबीसी राखीव मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून आलो असल्याने आम्हाला महापौर निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची आवश्यकता काय, असा सवाल शिवसेना, काँग्रेसच्या उमेदवारांनी केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा युक्तिवाद अमान्य केला. दरम्यान, जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असतानाही केवळ सत्तेची धुंदी चढल्याने नाईक यांनी ते सादर केले नाही, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी केला. त्यानंतर पालिका मुख्यालयाबाहेर शिवसेना तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा करत सत्ताधाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.      
पालकमंत्र्यांना चपराक
सर्व उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याने महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून पालकमंत्री गणेश नाईक यांचा पुतण्या असूनही सागर नाईक यांना साधे जात वैधता प्रमाणपत्र सादर करता आले नसल्याने गणेश नाईकांनाही चपराक बसली आहे. विशेष म्हणजे, नगरसचिव विभागातून आपले जात वैधता प्रमाणपत्र जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आल्याची तक्रार शिवसेनेचे उमेदवार मनोज हळदणकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली असून या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निवडणुकीचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर निवडणुकीचा पुढील कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती कोकण विभागीय आयुक्त विजय नहाटा यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.