महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त दिल्लीत आजपासून परिषद Print
नवी दिल्ली, १५ एप्रिल/प्रतिनिधी
जागतिकीकरणाच्या व्यापक प्रक्रियेत देश बळकट करण्यासाठी महाराष्ट्राचा पाया विस्तारण्याचे ध्येय बाळगणाऱ्या ‘महाराष्ट्र डेव्हलपमेन्ट अँड प्रमोशन सेंटर’ या संस्थेने सार्वजनिक उत्सव समितीच्या सहयोगाने महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त नवी दिल्लीत १६ आणि १७ एप्रिल रोजी ‘महाराष्ट्र अ‍ॅट फिफ्टी आयडियाज ऑफ इंडिया’ ही परिषद आयोजिली आहे.
तीन मूर्ती भवनातील नेहरू स्मृतीसंग्रहालयातील वाचनालय सभागृहात शुक्रवारी सकाळी दहा वाजता उद्घाटन सत्रात ‘सीएनएन आयबीएन’चे मुख्य संपादक राजदीप सरदेसाई अध्यक्षस्थान भूषवितील. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक प्रमुख पाहुणे असून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख बीजभाषण करतील. ११.३० ते १ या वेळेत प्रा. सुरेंद्र जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासविषयक परिषदेत विजय नाईक, प्रा. गोपाळ गुरू, डॉ. थॉम वोल्फ हे सहभागी होतील. दुपारी २ वाजता राजकारणविषयक परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे डी. पी. त्रिपाठी, ज्येष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी, भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा सदस्य भारतकुमार राऊत सहभागी होतील. दुपारी ४ ते ५.३० या वेळेत प्रशासनविषयक परिषदेत माजी केंद्रीय गृहसचिव के. पद्मनाभय्या, डॉ. नरेंद्र जाधव, सुधीर देव्हारे, शैलेश गांधी विचार मांडतील. सायंकाळी सहा वाजता ‘नटरंग’ या चित्रपटाचे प्रदर्शन होईल. यावेळी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, झी एन्टरटेनमेन्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वैद्य, चित्रपट दिग्दर्शक रवि जाधव व कलाकार अतुल कुलकर्णी उपस्थित असतील.
शनिवार १७ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता अर्थशास्त्रविषयक परिषदेत सुहास बोरकर, प्रा. अश्विनी देशपांडे, डॉ. चंद्रहास देशपांडे, डॉ. एस. एस. मंथा सहभागी होतील. दुपारी बारा वाजता सामाजिक परिषदेत प्रा. मकरंद परांजपे, शरद जोशी, प्रा. आर. के. काळे आणि पी. ए. इनामदार सहभागी होतील. अडीच ते चार या वेळेत कला व संस्कृतीविषयक परिषदेत प्रा. आशुतोष भोपटकर, डॉ. गो. पु. देशपांडे, अरुण साधू, विनय सहस्त्रबुद्धे विचार मांडतील. साडेचार ते साडेपाच या वेळेत समारोप सत्रात माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे, न्या. व्ही. एस. सिरपुरकर आणि शिवसेना नेते मनोहर जोशी विचार मांडतील.
२००८ मध्ये ‘महाराष्ट्र डेव्हलपमेन्ट अँड प्रमोशन सेंटर’ची स्थापना झाली आहे. महाराष्ट्राच्या विकासाबाबत विचारगटाचे काम करायचे तसेच देश व विदेशातील मराठीजनांमध्ये संवादाचा दुवा बनण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.