मधुकर दरेकर आज एकाहत्तरीत Print
क्रीडा
मुंबई, २४ जून / क्रीडा प्रतिनिधी
पॉवरलिफ्टिंग खेळातील महान तपस्वी मधुकर दरेकर शनिवारी एकाहत्तरीत पदार्पण करतील. महाराष्ट्र शासनानेही त्यांच्या या कार्याची वेळोवेळी दखल घेत त्यांना शिवछत्रपती पुरस्कार, उत्कृष्ट प्रशिक्षकाचा दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
मला जे काही पुरस्कार मिळाले ते योग्य वेळी मिळाले. याचप्रमाणे खेळाडू घडविणे आणि स्पर्धा संयोजनाचे काम करीतच राहू. त्यासाठी पैशांची चणचण भासू देणार नाही, असे दरेकर यांनी सांगितले. स्पर्धा सहभाग आणि सरावाचा खर्च वाढत आहे. स्पर्धा संयोजनही अधिकाधिक महागडे होत आहे. पूर्वीप्रमाणे कष्ट करण्याची खेळाडूंची तयारी नसते. त्यांना झटपट यश हवे असते, असे दरेकर यावेळी म्हणाले.
१९६८ मध्ये दरेकर पॉवरलिफ्टिंगकडे वळले आणि त्यात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला. नऊ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविणाऱ्या दरेकरांनी नंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतही सुवर्णपदकाला गवसणी घातली.
धुरी सरांच्या आग्रहामुळेच ते प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरले आणि त्यांनी घडविलेल्या शिष्यांनीही राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल  केले आहे. महिलांसाठी हा खेळ सुरू करण्यातही दरेकर सरांचाच सिंहाचा वाटा आहे. वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग या खेळाचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विविध जिल्ह्य़ांमध्ये ते या खेळाच्या स्पर्धाचे आयोजन करतात, तसेच खेडेगावांतील मुलांना या खेळाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करतात. या खेळाकडे वळणारा युवा वर्ग प्रामुख्याने गरीब घरातीलच असल्याने त्यांच्या स्पर्धेचे प्रवेश शुल्क, गाडीभाडे आदी खर्चही प्रसंगी ते स्वत:च्या खिशातूनच करतात. या खेळाच्या विकासासाठी शासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही, याची आजही त्यांना खंत वाटते, पण त्यामळे त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.