व्यक्तिवेध : डॉ. सुब्रा सुरेश Print
गुरुवार, २१ ऑक्टोबर २०१०
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनामध्ये मूळ भारतीयवंशीय असलेल्या उच्चशिक्षितांना महत्त्वाच्या पदांवर नेमण्याचा सिलसिला मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) इंजिनिअरिंग विभागाचे डीन सुब्रा सुरेश यांची नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या (एनएसएफ) संचालकपदी नियुक्ती झाल्याने कायम राहिला आहे. नॅशनल सायन्स फाऊंडेशन या संस्थेला तब्बल ६.९ अब्ज डॉलर (तीन लाख कोटी रुपये) इतक्या रकमेचे आर्थिक पाठबळ लाभले आहे. ही रक्कम भारतातील थेट कर संकलनाच्या उत्पन्नाहूनही अधिक आहे व ती अमेरिकेतील केवळ एका संस्थेसाठी केलेली आहे. अमेरिकेमध्ये तीन पातळ्यांवर संशोधन चालते. त्यामध्ये औद्योगिक, संरक्षण तसेच शुद्ध विज्ञानातील संशोधनाचा समावेश होतो. तेथील संरक्षण क्षेत्रातील संशोधनामध्ये गणितज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांचा मोठय़ा प्रमाणावर सहभाग असतो. नॅशनल सायन्स फाऊंडेशनसारखी संस्था ही प्युअर रिसर्चमध्ये सक्रिय आहे. ही संस्था संपूर्ण स्वायत्त असून तिच्यावर सरकार व उद्योगक्षेत्र दबाव टाकू शकत नाही. औद्योगिक व संरक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे नव्हे तर मुलभूत विज्ञानामध्ये एनएसएफने केलेल्या विस्तृत संशोधनामुळेच अमेरिका आज महासत्ता बनली आहे. अमेरिकेचे विज्ञानविषयक धोरण हे स्वतंत्र व सार्वभौम आहे. कोणत्याही विषयाचे मुलभूत संशोधन हा या देशाच्या प्रगतीचा पाया आहे. अमेरिकेतील एमआयटीमध्ये सुब्रा सुरेश मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बॉयोलॉजिकल इंजिनिअरिंग, मटेरिअल्स सायन्स अँड इंजिनिअरिंग, हेल्थ सायन्सेस या विभागाचे संयुक्त प्रमुख म्हणून कार्यरत होते. जानेवारी २००० ते जानेवारी २००६ पर्यंत ते मटेरिअल्स सायन्स आणि इंजिनिअरिंग या विभागाचे प्रमुख होते. १९७७ साली चेन्नईतील आयआयटीमधून बी. टेक. ची पदवी संपादन केल्यानंतर अमेरिकेच्या आयोवा स्टेट युनिव्‍‌र्हसिटीतून १९७९ साली त्यांनी एसएस केले. त्याचप्रमाणे एमआयटीमधून १९८१ साली ते एससीडी झाले. त्यांना स्वीडनच्या रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या मान्यवर संस्थेकडून मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे. १९८३ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ व लॉरेन्स बर्कले लॅबोरेटरी येथून पोस्टडॉक्टरल संशोधन पूर्ण केले. १९८३ साली ते ब्राऊन विद्यापीठामध्ये इंजिनिअरिंग विषयाचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून रूजू झाले. जुलै १९८९ मध्ये ते ‘प्रोफेसर’ झाले. १९९३ साली ते एमआयटीमध्ये मटेरिअल्स सायन्सेस व इंजिनिअरिंग या विषयाचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. सिंगल बायोलॉजिक सेल व मॉलिक्युल्स यांच्या कार्याबाबत त्याचप्रमाणे इंजिनिअर्ड मटेरिअल्सच्या नॅनो व मायक्रोस्केल मेकॅनिकल प्रॉपर्टीजच्या क्षेत्रामध्येही त्यांनी केलेल्या संशोधनाचा फायदा झाला आहे. त्यांनी आजवर आंतरराष्ट्रीय नियतकालिके व संशोधन पत्रिकांमध्ये सुमारे २१० शोधनिबंध लिहिले आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १४ पेटण्टचे ते को-इन्व्हेन्टर आहेत. फॅटिग्यू ऑफ मटेरिअल्स, फंडामेन्टल्स ऑफ फंक्शनली ग्रेडेड मटेरिअल्स, थिन फिल्म मटेरिअल्स या तीन पुस्तकांचे लेखक तसेच सहलेखक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रातील त्यांच्या कर्तबगारीची दखल घेत विविध संस्थांवरही त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भारत व अमेरिकेतील मटेरिअल्स सोसायटीजमध्ये त्यांची फेलो किंवा मानद फेलो म्हणूनही निवड झाली आहे. अशी चमकदार कामगिरी बजाविणाऱ्या प्रा. सुब्रा सुरेश यांची अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर बराक ओबामा यांनी त्यांचे जाहीर अभिनंदन केले. अमेरिकेला आता गरज अधिक प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची व त्यासाठी अविरत संशोधन होण्याची. त्यामुळे नॅशनल सायन्स फाऊन्डेशनचे संचालक म्हणून डॉ. सुब्रा सुरेश भविष्यात बजाविणार असलेल्या कामगिरीकडे अवघ्या अमेरिकेचे लक्ष असणार आहे.