व्यक्तिवेध : डॉ. अनंत फडके Print
सोमवार, २१ जून २०१०
प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. अनंत फडके यांचे नुकतेच निधन झाले आणि त्यांच्या रूपाने देशातील भूशास्त्रीय वैशिष्टय़ांची जगाला ओळख करून देणारा एक अवलिया आपल्याला सोडून गेला. भारतात अनेक वैशिष्टय़पूर्ण नैसर्गिक, भौगोलिक गोष्टी असल्या तरी त्यांची जागतिक पातळीवर ओळख असतेच असे नाही. कारण आपल्यालासुद्धा त्यांची नेमकेपणाने माहिती नसते, मग जगाची गोष्ट तर लांबचीच! पण काही माणसांच्या प्रयत्नांमुळे ही माहिती जनसामान्यांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचविणे शक्य झाले. भूशास्त्राबाबत हे महत्त्वाचे काम डॉ. फडके यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवले होते. महाराष्ट्रातील काळय़ा पाषाणाची (बेसॉल्ट) एक ओळख म्हणजे त्यातील पोकळय़ांमध्ये आढळणारी वैशिष्टय़पूर्ण खनिजे! त्यापैकी सर्वात महत्त्वाचा गट म्हणजे ‘झिओलाईट्स’ खनिजांचा! रंगाने, आकाराने आणि एकमेकांमध्ये गुंतलेल्या वैशिष्टय़पूर्ण रचनेने ही खनिजे अतिशय आकर्षक दिसतात. त्यांचे हे आकर्षक स्वरूप जगापर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्यांमध्ये डॉ. फडके यांचा समावेश होता. पण तेवढय़ावरच न थांबता त्यांनी या खनिजांचे संशोधन करून त्याचे गुणधर्म शोधण्याचे आणि वर्गवारी करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांचे हे कार्य जगभरातील भूशास्त्रज्ञांचे या खनिजांकडे लक्ष वेधण्यास उपयुक्त ठरले. काही दशकांपर्यंत ब्राझीलमधील अशा खनिजांना जगभरातून मागणी होती, पण आता त्यांच्या तोडीस तोड अशी महाराष्ट्रातील अशा खनिजांची गणना केली जाते. त्यांच्या अशा प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी दोन खनिजे नव्याने जगाला माहिती करून दिली. त्याबाबतकाही तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत, पण त्यांची काही वैशिष्टय़े त्यांनी वेगळेपणाने दाखवून दिली. त्यातील एक म्हणजे- केळकराईट! आपले गुरू डॉ. के. व्ही. केळकर यांच्या विषयी आदर व्यक्त करण्यासाठीच त्यांच्या नावावरून या नव्या खनिजाला त्यांनी हे नाव दिले. पुण्यातील वाघोली येथे आढळणारे निळय़ा रंगाचे आकर्षक ‘कॅव्हेन्झाईट’ हे खनिज भारतात आढळत असल्याची पहिली नोंदही त्यांनी केली. नागपूरजवळील ‘सौसर’ नावाच्या रूपांतरित खडकांच्या सखोल अभ्यासाचे श्रेय, तसेच गुजरातमधील राजपिपळा, गरुडेश्वर येथे आढळणाऱ्या माशांचे ठसे शोधून काढण्याचे श्रेयसुद्धा त्यांच्याच नावावर आहे. आपल्याकडील गोष्टींना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इग्लंड अशा अनेक देशांमधील भूशास्त्राच्या परिषदांमध्ये भाग घेतला आणि तिथे अनेक संशोधन प्रबंध वाचले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसाठी संशोधनपर लेखनही केले. विविध देशांमधील प्रसिद्ध भूशास्त्रांसोबत एकत्रितपणे काम करूनही त्यांनी आपला हा उद्देश साध्य केला. महाराष्ट्रात आढळणाऱ्या खनिजांचा औद्योगिक वापर करता येईल का, यासाठीसुद्धा डॉ. फडके यांनी संशोधन केले. शीतीकरणाच्या (रेफ्रिजरेशन) प्रक्रियेत ‘क्लिनोप्टोलाईट’चा वापर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा प्रकारच्या संशोधनात मोठे यश मिळाले नसले, तरी खनिजांच्या या बाजूकडे लक्ष वेधण्यास त्यांचे कार्य निश्चितपणे उपयुक्त ठरले. भूशास्त्रातील खनिजशास्त्र, भूरचनाशास्त्र आणि ज्वालामुखीविज्ञान यांसारख्या विषयांतही त्यांचे योगदान मोठे आहे. १९५०च्या दशकात या विषयांमध्ये संशोधनाला विशेष वाव नसताना त्यांनी धडपड करून हे काम केले. संस्थात्मक पातळीवरही त्यांनी योगदान दिले. पुणे विद्यापीठात भूशास्त्र विभाग वाढविण्यात त्यांचा वाटा होताच, त्याचबरोबर अनेक विद्यार्थी घडविण्यातही त्यांनी हातभार लावला. निवृत्तीनंतरही आयुष्याच्या अगदी शेवटच्या आठवडय़ापर्यंत (वयाच्या ७४व्या वर्षांपर्यंत) ते सक्रिय होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘डेक्कन व्होल्कॅनोलॉजिकल सोसायटी’ची स्थापना केली. त्याद्वारे भूशास्त्र हा विषय सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करत होते. त्या दृष्टीने लोणारच्या विवरासंबंधी विस्तृत परिषद भरवून त्यांनी त्याच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. परदेशात तेथील छोटी छोटी भूशास्त्रीय वैशिष्टय़े जपली जातात आणि त्यांची उत्तम प्रकारे नोंद केली जाते. याबाबत आपल्याकडे असलेली उणीव दूर करण्याच्या कामाला डॉ. फडके यांनी सुरुवात केली होती. त्यांच्या निधनामुळे हे कार्य अपूर्ण राहिले आहे. भूशास्त्रातील संशोधक व विद्यार्थ्यांनी हे कार्य पुढे सुरू ठेवले तर तीच खऱ्या अर्थाने डॉ. फडके यांना श्रद्धांजली ठरेल.