शब्दाला शब्द :‘ अनुवादक हा लेखक असलाच पाहिजे! Print
राजू इनामदार ,रविवार,१६ जानेवारी २०११
लेखक, प्रकाशक, अनुवादक, सजावटकार, मुखपृष्ठकार हे पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेतील महत्त्वाचे घटक. त्यांच्या भूमिका मांडणारे सदर..
विलास गीते यांना १९९३ मध्ये अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. रवींद्रनाथ टागोर, सत्यजीत राय, पंडित रविशंकर अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांची ४० हून अधिक पुस्तके आजवर त्यांनी मराठीत आणली आहेत. अहमदनगरमध्ये राहून १९७० पासून अनुवादाचे काम करत असलेल्या गीते यांचा अकादमीच्या प्रथितयश भाषांतरकारांमध्ये समावेश आहे. अनुवाद प्रक्रियेबाबत त्यांच्याशी केलेली ही बातचीत..
‘अनुवाद हा काही सृजनशील साहित्यप्रकार नाही’, ‘अनुवाद केला आहे होय? मग त्यात काय एवढे!’, ‘अनुवाद काय वाचायचा? मुळातून ते पुस्तक वाचा..’ मराठी साहित्यात अनुवादित साहित्याबाबत असे बरेच समज-गैरसमज प्रचलित आहेत. त्यामुळे तुम्ही प्रथम अनुवाद म्हणजे नक्की काय, ते सांगा..
- हे गैरसमज काही आजचे नाहीत. ते बऱ्याच पूर्वीपासून चालत आलेले आहेत. तरीही अनुवादित साहित्याची वाचकांची आवड काही कमी झालेली नाही. त्यावरून काय समजायचे ते समजा. अनुवाद हा माझ्यासाठी तरी साहित्यप्रकारच आहे. मूळ लेखकाने त्याला जे भावलेले असते ते लिहिलेले असते. ते त्याला जसे भावले तसेच्या तसे, त्याच आशयासह परभाषिक वाचकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे अनुवाद. यात ‘तसेच्या तसे’ याला फार महत्त्व आहे. आशय बिघडता कामा नये, ही यातील फार महत्त्वाची बाब आहे. म्हणूनच अनुवादक हा फार नसला तरी थोडाबहुत लेखक असलाच पाहिजे, असे माझे आग्रही मत आहे. लेखनाप्रमाणेच अनुवाद हीसुद्धा मेंदूला थकवणारी, कष्टमय, तरीही आनंद देणारी प्रक्रिया आहे असा माझा अनुभव आहे.
बंगाली भाषेतील उत्तमोत्तम साहित्य तुम्ही मराठीत आणले आहे. असे भाषांतर करताना काय अडचणी येतात? ही अनुवाद प्रक्रिया नेमकी कशी असते?
- अनुवादकाची दोन्ही भाषांबरोबर- म्हणजे त्याला ज्या भाषेत अनुवाद करायचा आहे त्या (लक्ष्यभाषा) व ज्या भाषेतून करायचा आहे त्या (स्रोतभाषा)- जवळीक असली पाहिजे. हे कोणत्याही भाषेतील अनुवादासाठीचे पहिले महत्त्वाचे सूत्र आहे. तसे नसेल तर मग भाषांतर हे फक्त रूपांतर होते. त्यात मूळ भाषेतील गंमत, रस येत नाही. बंगाली भाषेचेच उदाहरण द्यायचे झाले तर सध्या मी तस्लीमा नसरीनच्या आत्मकथेच्या तिसऱ्या भागाचा अनुवाद करतो आहे. त्यात ‘पारमार्थिक मुलो’ असे एक प्रकरण आहे. बंगाली भाषेत एखाद्याने ‘आमिष दाखवले’ असे म्हणताना ‘मुळा दाखवला’ असे म्हणतात. आता त्या प्रकरणाचे ‘मुळा दाखवला’ असे शब्दश: मराठी भाषांतर केले तर रसभंग होईल. असे आमिष दाखविण्याला मराठीत ‘गाजर दाखवणे’ म्हणतात. त्यामुळे तेथे ‘गाजर दाखवले’ असे म्हणणेच योग्य आहे. त्यामुळे आशय तोच राहिला. अशा बऱ्याच गमती आहेत. त्यांच्यात सिगारेटही ‘खातात’ व पाणीही ‘खातात’च! आपल्याकडे यासाठी ओढणे व पिणे असे वेगळे शब्द आहेत. त्यांचाच वापर करणे अर्थवाही ठरते.
अनुवाद करताना नेमकी सुरुवात कशी करायची?
- माझ्यापुरती मी एक पद्धत तयार केली आहे. बहुतेक अनुवादक असेच करत असावेत असा माझा अंदाज आहे. ज्या पुस्तकाचा अनुवाद करायचा आहे ते प्रथम मी संपूर्ण वाचतो. त्यामुळे त्या लेखकाची शैली कळते. वाचत असतानाच त्यातील न समजलेल्या शब्दांखाली मी खुणा करतो. नंतर अशा शब्दांची पुस्तकाच्या पृष्ठसंख्येनुसार सूची तयार करतो. शब्दकोशातून या शब्दांचे अर्थ पाहिले की पुस्तकाचे पुन्हा वाचन होते. तरीही काही शब्द अडतात. मग मी ते बंगाली भाषिक मित्रांकडून समजून घेतो. पूर्वी मी यासाठी शांतीनिकेतनचे प्राचार्य दिनकर कौशिक यांना पत्र लिहायचो. ते मला त्या शब्दाचा अर्थ व त्याला पूरक असे चित्र काढून पाठवायचे. यातील गंमत म्हणजे त्यावेळी पत्रे वेळेवर जायची व मिळायचीही. त्यामुळे मला १५ दिवसांपेक्षा जास्त काळ कधीही प्रतीक्षा करावी लागलेली नाही. अशी अनेक पत्रे आज माझ्या संग्रही आहेत.
प्रत्येक भाषेत म्हणी, वाक्प्रचार असतात. त्याच अर्थाच्या म्हणी व वाक्प्रचार अनुवादित भाषेत शोधतानाही अडचण येत असणार..
- फक्त म्हणी, वाक्प्रचारच नाहीत, तर दोन्ही भाषांतील रूढी, प्रथा, परंपरा यांचीही अनुवादकाला चांगली माहिती असणे आवश्यक असते. उदाहरणच द्यायचे तर बंगालीत ‘बौभात’ असा एक शब्द मला अडला होता. शब्दकोश पाहून झाला, मित्रांना विचारून झाले, मात्र मूळ लेखकाला जे अभिप्रेत होते ते काही मला मराठीत आणता येईना. मग थेट बंगालमधल्याच काही मित्रांना विचारल्यावर मला ते समजले. तिथे घरातील नवी सून आपल्या सासरच्या माणसांना प्रथम जेवायला वाढते. जेवणाचा तिथे स्वतंत्र कार्यक्रमच असतो. त्याला ‘बौभात’ असे म्हणतात. हे जेव्हा समजले, तेव्हाच मला त्या अर्थाचे मराठी शब्द माझ्या अनुवादात वापरता आले. ‘त्याच्या वडिलांचे भाताचे दुकान होते’ या वाक्यानेही मला असेच दुबरेध केले होते. म्हणजे ‘त्यांची एक खानावळ होती’- हे समजले तेव्हा माझी अडचण दूर झाली.
रवींद्रनाथ टागोर, सत्यजीत राय यांची अनेक पुस्तके तुम्ही मराठीत अनुवादित केली आहेत. तुम्ही बंगाली भाषा कशी अवगत केली?
- शालेय वयापासून मला या भाषेचे कसे कोण जाणे, पण आकर्षण निर्माण झाले. या आकर्षणातूनच मी या भाषेकडे वळलो. आकाशवाणीवरचे भाषापाठ ऐकत मी बंगाली शिकलो, यावर आज कोणी विश्वास ठेवणार नाही, पण ते सत्य आहे. त्याशिवाय दिनकर कौशिक, वीणा आलासे, चंद्रकांत पाटील व अशाच असंख्य मित्रांची याकामी मला मोलाची मदत झाली. त्यांनी शब्दकोश दिले. एखाद्या शब्दाचा अर्थ मिळावा म्हणून अनेकदा माझ्याइतकेच तेही अस्वस्थ झाले आहेत. कवी बा. भ. बोरकर एकदा नगरला आले होते. मी मैत्रेयीदेवींच्या ‘टागोर बाय फायर साइड’ या पुस्तकाचा अनुवाद केला होता. सहज म्हणून त्यांना तो दाखवला. त्यांनी ‘आगे बढो’ म्हणून प्रेरणा दिली. भालचंद्र नेमाडे यांनाही सत्यजीत राय यांच्या एका पुस्तकाचा अनुवाद पाठवला होता. त्यांनीही- ‘भलतेच लोक बंगालीचे भाषांतर करून चुकीची पुस्तके मराठीत आणत आहेत. तुम्ही क्लासिक पुस्तकांचे अनुवाद करून त्याला आवर घालू शकता, हेच काम करा,’ म्हणून लिहिले. पु. ल. देशपांडे यांनीही एका भाषांतराचे असेच कौतुक केले. त्यानंतर मग सारेच जुळत गेले. प्रकाशक मिळत गेले. पुस्तके येत गेली. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यावर मग तर जबाबदारीच आली.
अनुवादित साहित्याचा वेगळा असा काही वाचकवर्ग आहे का? अशा वाचकांचा तुम्हाला काही वेगळा अनुभव आला आहे का?
- मराठीला भाषांतरीत साहित्याची मोठी परंपरा आहे. मामा वरेरकर व त्यांच्याही आधी काहीजण असे अनुवाद करतच होते. आता त्यात सफाई आली आहे. मला स्वत:ला माझ्या अनेक अनुवादित पुस्तकांबाबत जाणकार व साध्या वाचकांकडूनही चांगले अभिप्राय आले आहेत. गेल्या काही वर्षांत तर या साहित्यप्रकाराला फार चांगले वातावरण निर्माण झालेले आहे.
सध्या तुम्ही प्रख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांच्या ‘राग-अनुराग’ या आत्मकथेचा अनुवाद करीत आहात. त्यात काही विशेष आहे का?
- ‘राग-अनुराग’ हे पं. रविशंकर यांनी त्यांचे मित्र शंकरलाल भट्टाचार्य यांना प्रवासात सांगितलेल्या स्वत:च्या आयुष्यातील विविध आठवणींचे भट्टाचार्य यांनी केलेले संकलन आहे. हा प्रवास काही एकाच वेळी झालेला नाही. त्यामुळे संपुर्ण पुस्तकात वेळोवेळी ‘बरं का शंकर..’, ‘असे पहा शंकर..’ असे संबोधन आलेले आहे. त्यामुळे या संपूर्ण पुस्तकाला एक वेगळीच शैली आली आहे. खुद्द रविशंकर यांनी मला अनुवादाची परवानगी दिली, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. त्यातच अशा वेगळ्या शैलीतील पुस्तकाचा अनुवाद करतानाही मजा आली. मैत्रेय प्रकाशनच्या वर्षां सत्पाळकर आणि त्यांचे संपादक मनोज आचार्य हे पुस्तक करीत आहेत. मला स्वत:ला या पुस्तकाने जो आनंद दिला, तोच इतर वाचकांनाही मिळेल, याची मला खात्री आहे.
अनुवादाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नवोदितांसाठी काही सांगाल का?
- अनुवादाचे काम निव्वळ व्यावसायिक म्हणून करत असा किंवा आनंद म्हणून, पण त्या कामावर प्रेम करा. शब्दकोशांची मैत्री करायला शिका. अनुवादासाठी व त्यातही प्रवाही अनुवादासाठी ते फार उपयोगी पडतात. लक्ष्यभाषेबरोबरच स्रोतभाषेचाही अभ्यास असलाच पाहिजे. त्यासाठी दोन्ही भाषांमधील ज्याचा अनुवाद करायचा आहे त्याशिवायचे अवांतर वाचनही त्या व्यक्तीने केले पाहिजे. त्यातूनही अनुवाद चांगला होण्यासाठी मदत होते. सतत सराव करणे आणि स्वत:चे समाधान झाल्याशिवाय काम चांगले झाले आहे असे न समजणे, अशी सवय लावून घेतली तर हे काम नक्कीच प्रत्येकाला चांगले जमेल. जगातील सर्वच भाषांमधील चांगले साहित्य मराठीत येण्यास सुरुवात होईल आणि मग ही अनवट वाट हमरस्ता होईल.