कोयाबोली Print
मुकुंद गोखले - रविवार १३ मार्च २०११
आपल्या बहुभाषिक भारत देशात भाषावार प्रांत रचनेनंतर त्या त्या भागात तेथील भाषांतून शिक्षण दिले जाते, परंतु अजूनही असे अनेक भाग आहेत जेथे त्यांच्या मातृभाषेतून शिक्षणाची सोय नाही. या पाश्र्वभूमीवर या आदिवासींकरता काय करता येईल, असा विचार   करून प्रा. मुकुंद गोखले यांनी गोंडी लिपीचा अभ्यास सुरू केला. सीताराम मंडाले यांच्या ‘कोयाबोली’ या पुस्तकामुळे जी थोडी माहिती मिळाली, त्या आधारे एक फॉण्ट तयार केला. सर्व अक्षरांची यथास्थित सोय केली. भविष्यात गोंडी लिपीला युनिकोडमध्येही योग्य स्थान मिळावे यासाठी आखणी करून ठेवली. गोंडी लिपीला साजेसे इंग्रजीचे वळणही त्यासोबत मॅच केले (डिक्शनरीसाठी). संगणकीय सुलभ मुद्राजुळणीसाठी कळफलक व त्याचे प्रोग्रामिंग केले. ३० जानेवारी २०११ ला ‘कोयाबोली’ शब्दसंग्रह गोंडी-मराठी-हिंदी या स्वरूपात प्रकाशित झाला. हाच तो आदिवासी गोंडी समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण!
अनेक घटना आपल्या अवतीभवती घडत असतात. काही गोष्टी अनाहूतपणे आपल्या नजरेस पडतात. त्या सगळ्यांकडेच आपण एक त्रयस्थ म्हणून बघत असतो. आपला या साऱ्यांशी काही संबंध नाही अशा मानसिकतेने त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण काही गोष्टी आपल्याला खुणावत असतात, काही सांगायचा प्रयत्न करत असतात, त्या मनांत घर करून बसतात, अन् असे का, असे प्रश्न मनात पिंगा घालू लागतात अन् अस्वस्थही करतात आणि नकळत त्याचा पाठपुरावा सुरू होतो. असेच काहीसे या गोंडी लिपी संबंधात घडले अन् मी त्यासाठी निमित्तमात्र कोळ्यासारखा गुंतत गेलो अन् जाळे विणत गेलो.
३० ऑगस्ट २००९! हा दिवस माझ्या आयुष्यात कायमचा लक्षात राहील असा दिवस!
माझा परम मित्र प्रा. रंजन जोशी पुण्यात त्याच्या व्याख्यानासाठी आला होता. त्याच्याबरोबर  प्रा. सुभाष कोतवाल यांच्या घरी गेलो. सुभाषने ‘वारली आदिवासी चालीरीती, सण’ यावर दोन शॉर्ट फिल्म्स् पुण्याच्या ट्रायबल रिसर्च इन्स्टिटय़ूटसाठी केल्या होत्या, त्या पाहिल्या. आमच्या गप्पा चालू होत्या. सुभाषची मुलगी दीप्ती,  हिने माझ्या हाती ‘कोयाबोली’ हे सीताराम मंडाले यांनी लिहिलेले पुस्तक दिले. मी पुस्तक चाळले, तिला म्हणालो, ‘हे मी घरी नेतो वाचून बघतो, जरा वेगळे प्रकरण आहे हे.’ माझा गोंडी लिपीशी तसा पूर्वी कधी संबंध आला नव्हता. काळी की गोरी हेही माहीत नव्हते.
लहानपणी नागपूरला सी. पी. अ‍ॅण्ड बेरार शाळेत शिकत असताना जवळच बुधवार बाजारात भाजीपाला डोक्यावरून आणणाऱ्या गोंडी बायका पाहिल्या होत्या, त्यांना ‘डोवके/डौके’ म्हणत असू. त्या जे बोलत ते त्यावेळी काही समजत नसे. शाळेत असताना, महाल भागात बख्तबुलंदशहा या गोंड राजाचा किल्ला आहे. तेथे गोंडवाना क्रिकेट क्लब होता. त्या ग्राऊंडवर आम्ही क्रिकेट खेळायला जात असू. एवढाच काय तो संबंध लक्षात आहे.
नागपूर सोडून आता ४६ वर्षे झाली. इतक्या वर्षांनंतर आपला असा गोंडी भाषेशी व गोंडी लिपीशी संबंध येईल हे ध्यानी-मनीही नव्हते. दीप्तीने दिलेल्या ‘कोयाबोली’ या पुस्तकाने माझ्या जुन्या आठवणी चाळवल्या.
घरी आल्यावर शांतपणे रात्री संपूर्ण पुस्तक वाचून काढले. वाचताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे संपूर्ण पुस्तक देवनागरी लिपीत मुद्रित केलेले होते. गोंडी लिपीचा परिचय हाताने लिहिलेल्या अक्षरांमधून करून दिलेला होता, त्यात स्वर, स्वरचिन्हे, व्यंजने व बाराखडी दिलेली होती. शब्दसंग्रह देवनागरी लिपीत-गोंडी भाषेत व मराठीत अर्थ दिलेले होते. गोंडी भाषेची गरज लक्षात घेऊन त्यासाठी अक्षरांची व चिन्हांची योजना स्पष्ट होत होती. एक गोष्ट लक्षात आली की स्वर-व्यंजन व्यवस्था ही देवनागरीसारखीच उच्चारस्थानानुसार वर्गवारी केलेली आढळली.
अन् लख्ख प्रकाश पडावा तसे झाले. मंडालेसरांनी गोंडीमध्ये का नाही मुद्राजुळणी केली?
मुद्रणात गोंडीचा वापर आधी झाला होता का?
काय अडचणी असतील? या प्रश्नांनी मला याकडे लक्ष द्यावयास हवे याची जाणीव झाली.
गोंडी हस्तलिखित अक्षरे बघताना या अक्षरांचा इतर लिप्यांशी काही संबंध आहे का? तो काही आढळला नाही, पण मोहेंजोदडो हडप्पा येथील चिन्हांशी मिळतीजुळती काही अक्षरांची रचना वाटली. हा सगळा भाग कोणता? गोंडवाना प्रदेश कुठला? आधीच इतिहास हा माझा कच्चा विषय आणि त्याची आवडही नाही. पण कुतूहलापोटी माग काढायचे ठरवले, अन् एका बाजूने जुळवाजुळवीला सुरुवात केली.
महाराष्ट्रात नांदेड, किनवट, यवतमाळ, पांढरकवडा, झरीजामणी, मारेगाव, वणी, अमरावती, नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, धाबेपौनी, चंद्रपूर (चांदा), गडचिरोली, आदिलाबाद (आन्ध्र), बस्तर, मंडला, जबलपूर, बालाघाट जिल्हा, छत्तीसगड, झारखंड अशा विस्तीर्ण भागात ही गोंडी भाषा बोलली जाते. स्थानपरत्वे आसपासच्या भागातील भाषांचा प्रभावही त्यात दिसून येतो. हाच तो गोंडवानाचा भाग. ५२ गडांवर गोंडांचे राज्य होते असे इतिहास सांगू लागला. मणिपूरपासून कच्छच्या आखातापर्यंतचा भाग गोंडवानाचा असावा, असा काहीअभ्यासकांचा कयास आहे. एकूण गोंड लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे.
भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर जंगले सरकारी झाली आणि आदिवासी विस्थापित झाले. शेती हा प्रमुख व्यवसाय, शेतीच नाही, पर्यायी व्यवस्था सरकारने केली नाही. आधीच मागासलेपण त्यात ही सरकारी आफत. मातृभाषेत शिक्षणाची सोय नाही. वास्तविक पाहता जगाच्या पाठीवर कुठलाही देश पाहिला तर तेथे त्यांच्या मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. आपल्या बहुभाषिक भारत देशात भाषावार प्रांत रचनेनंतर त्या त्या भागात तेथील भाषांतून शिक्षण दिले जाते. परंतु अजूनही असे अनेक भाग आहेत जेथे त्यांच्या मातृभाषेतून शिक्षणाची सोय नाही. ही पाश्र्वभूमी लक्षात आल्यावर या आदिवासींकरता काय करता येईल, तसेच आपली क्षमता आपण कशी वापरू शकू, या विचाराने गोंडी लिपीचा अभ्यास सुरू केला. मंडालेसर हे जिल्हा परिषदेच्या खडकवासल्याच्या शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांच्या ‘कोयाबोली’ या पुस्तकामुळे जी थोडी माहिती मिळाली, त्या आधारे एक फॉण्ट तयार केला. आदिवासी गोंड लोकांच्या ‘पेरसापेन’ देवाची (महादेव) प्रार्थना टंकीत करून पाहिली. सोबत देवनागरी लिपीत गोंडी भाषेत ती प्रार्थनापण टंकीत केली. मंडालेसरोसमोर गोंडी लिपीत मुद्राजुळणी केलेली प्रार्थना ठेवली, ती वाचत असताना मंडालेसरांचे डोळे पाणावले होते. कंठ दाटलेला होता. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. मंडालेसरांना मी म्हणालो, ‘सर, तुमचेच पुस्तक याला कारणीभूत आहे. हे पुस्तक जर मला मिळाले नसते तर तुमच्या अडचणी काय आहेत हे मला तरी कसे कळले असते? गोंडी लिपीत मुद्रणाची सोय नाही ही अडचण आहे हे मला दिसले, अन् ती मी सोडवू शकेन, असे वाटले म्हणून हा प्रयोग मी केला आहे. पण अजून बरीच माहिती मला हवी आहे. जोडाक्षरांची व्यवस्था कशी आहे हे समजण्यासाठी काही मजकूर, ऐतिहासिक कागदपत्रे, शिलालेख, पोथ्या वगैरे साहित्य जर उपलब्ध झाले तर अजून प्रकाश पडेल व भाषेच्या दृष्टीने मुद्रणासाठी अजून काय करावयास हवे ते कळेल.’
तो प्रयोग बघून मंडालेसरांचा उत्साह प्रचंड वाढला होता . काही महिने मधे गेले, जे काही साहित्य गोळा करता आले ते घेऊन सर एकदा घरी आले. त्यात विठ्ठलसिंह धुर्वे यांचे हस्तलिखित उजळणीचे पुस्तक, गोंडांच्या इतिहासावरील काही पुस्तिका, राजनांदगाव (छत्तीसगड) येथील एक दिनदर्शिका असे साहित्य ते घेऊन आले.
मी त्या सुमारास नागपूरला सहकुटुंब बहिणीकडे (डॉ. दमयंती पांढरीपांडे) जाणार होतो. आम्ही नवेगावबांध व धाबेपौनीलाही भेट देण्याचे ठरवले.
मंडालेसरांनी गोंडांचे धर्मगुरू डॉ. मोतीराम कंगाले यांचा फोन नंबर मला दिला व म्हणाले, तुम्ही यांना फोन करा व जमल्यास भेटा. डॉ. कंगालेसरांनी गोंडीच्या व्याकरणावर पुस्तक लिहिले आहे ते देवनागरीत आहे. तसेच त्यांनी मोहेंजोदडो हडप्पा येथील चिन्ह लिपीचे उद्वाचनही केल्याचे व त्यावर पुस्तकही लिहिल्याचे त्यांनी सांगितल्यावर मी चकित झालो. सरांना भेटायलाच हवे.
या मधल्या काळात मी मंडालेसरांचे ‘कोयाबोली’ हे पुस्तक संपूर्ण गोंडी लिपीत व देवनागरीत शब्दसंग्रहासकट गोंडी भाषेत व मराठीत पूर्ण केलेले होते. पुस्तकाचे प्रिंटआऊट काढलेले होते, ते बाइंडिंग करून नागपूरला घेऊन गेलो.
धाबेपौनीला श्रीनिवास (दादा) डोंगरवार (मानद वन संरक्षक) (हे मारुती चितमपल्ली यांचे मित्र कै. माधवराव डोंगरवार यांचे थोरले चिरंजीव) यांच्या वाडय़ावर गेलो. दादांना मी गोंडीचे प्रिंटआऊट दाखवले तेव्हा त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘मला गोंडी समजते पण लिपी वाचता येत नाही पण आमच्या येथे एक गोंड गृहस्थ आहेत ते शिकलेले आहेत त्यांना बोलावतो.’ निरोप पाठवून त्यांना बोलावून घेतले. त्यांना ते पुस्तक दाखवून म्हणाले, बघा तुमच्यासाठी गोखले यांनी काय आणले आहे ते. पुस्तक पाहून त्यांना आनंदाश्रू आवरेना. ते म्हणाले, ‘पण सर यात काही चुका दिसतात. दुरुस्त करू का?’ म्हटले, ‘अवश्य करा, कारण मला गोंडी अजिबात येत नाही. तुम्ही दुरुस्त केलेल्या चुका मी पुण्यास गेल्यावर बरोबर करीन.’ दुसऱ्या दिवशी डॉ. मोतीराम कंगालेसरांना फोन केला व त्यांना भेटावयास गेलो. सरांना पुस्तक दाखवले, त्यांनी काळजीपूर्वक सर्व पाहिले. ते म्हणाले, छान झाले आहे. छापायला हरकत नाही.
मला अनेक गोष्टींचे खुलासे हवे होते, ते विचारायचे धाडस मी शेवटी केले. मी म्हणालो, ‘सर यात कुठेही जोडाक्षरे नाहीत. जे संदर्भ मला मिळाले त्यांत हलंतसारखे अक्षर नाही. नावांमध्ये, अनेक शब्दांमध्ये जोडाक्षरे येतील त्यासाठी मी माझ्या योजनेत हलंत चिन्ह घातले आहे. ज्या भागांत गोंडी बोलले जाते त्यात आजूबाजूच्या प्रदेशांच्या भाषांचे प्रतिबिंब शब्दांमध्ये बघावयास मिळते. उदा. तेलगूमध्ये ऱ्हस्व ए, ऱ्हस्व ओ, इंग्रजीतील एॅ ऑ यांची सोय करायला हवी, उर्दू शब्दांचा प्रभावही काही भागांत आहे. त्यामुळे नुक्ताक्षरांची योजना हवी, लिप्यंतराचे काम करावयाचे तर या साऱ्या गोष्टींची आवश्यकता आहे. गोंडी लिपीचे जे नमुने मी पाहिले त्यात अनुस्वार आणि विसर्ग हे अक्षराच्या पायथ्याशी आहेत. त्यापुढे जर पूर्णविरामाचे टिंब आले तर अर्थाचा अनर्थ होईल. त्यांच्या जागा देवनागरीप्रमाणे ठेवल्यास हा अनर्थ आपण टाळू शकू. आजच विचारपूर्वक जे काय करायचे ते केले पाहिजे, त्यांची योग्य सोय करून ठेवणे पुढच्या काळाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ती सोय मी गोंडी लिपीत करणार आहे.’ त्या बदलांचे नमुने मी त्यांना दाखवले.
मूळ गोंडी लिपीची योजना भावसिंह मसराम यांनी १९२८ साली मांडल्याचे त्यांनी सांगितले. भावसिंह मसराम यांनी १९५१ च्या सुमारास ‘सुबोध गोंडी लिपी परिचय’ नावाचे पुस्तक लिहिले, ते भाग एक व भाग दोन असे होते, पण ती पुस्तके कुठे बघावयास मला मिळाली नव्हती.’ डॉ. कंगाले त्यांच्या अभ्यासिकेत गेले. त्या पुस्तकाची दोन पाने झेरॉक्स केलेली आणली व मला देत ते म्हणाले, ‘हेच काय ते साहित्य माझ्याकडे आहे. त्यानंतर विठ्ठलसिंह धुर्वे यांनी हाताने लिहिलेले गोंडी लिपीचे पुस्तक १९८९ मध्ये प्रसिद्ध केल्याचे कळले. तेही मी मिळवले.’ पण माझ्या विचारांची दिशा डॉ. कंगालेसरांना जास्त भावली व माझ्या सर्व सूचनांना संमती दिली. माझा जीव थोडा भांडय़ात पडला. प्रश्न होता तो जोडाक्षरांचा. मी सरांना म्हटले की, जर काही हस्तलिखिते, पोथ्या, ऐतिहासिक कागदपत्रे मिळाली तर त्यांचा अभ्यास करून काही मार्ग निघू शकेल. कंगालेसर म्हणाले, ‘काही पत्रं मला आलेली आहेत, ती गोंडी लिपीत आहेत.’ त्यांनी दिलेली पत्रे वाचताना माझ्या एकदम लक्षात आले की, येथे जोडाक्षरे आहेत. मुळाक्षरातील स्वरदंड (आडवा काना) काढला की त्यांची अर्धी अक्षरे होतात, हेही देवनागरीचे वैशिष्टय़ मला आढळले. लिपीची योजना एकपांक्तिक दिसून येते. देवनागरीसारखी पृष्ठमात्रा नाही.
माझा जोडाक्षर लिखाणाचा, टंकनाचा शिल्लक राहिलेला प्रश्नही निकालात निघाला. खूप समाधान वाटले. आता मला काहीच अडचण दिसेना गोंडीचे मुद्रणसुलभ संगणकीकरण करण्यास. माझा मार्ग प्रशस्त झाला. कंगालेसरांनाही अत्यानंद झाला. १९२८ सालापासून मागे पडलेला दुर्लक्षित विषय आता मार्गी लागणार याबद्दल सरांना खात्री पटली. पुण्यास परत आल्यावर मंडालेसरांना फोन करून घरी बोलावून घेतले व सारा वृत्तान्त त्यांना कथन केला. मंडालेसर भारावून गेले. म्हणाले, ‘आठ दिवसांत मी हिंदी भाषांतर करून आणून देतो.’ त्याप्रमाणे त्यांनी ते आणूनही दिले. माझे काम थोडे सोपे झाले.
या साऱ्या चर्चेनंतर मी आधी केलेल्या फॉण्टमध्ये बरेच बदल केले. सर्व अक्षरांची यथास्थित सोय केली. भविष्यात गोंडी लिपीला युनिकोडमध्येही योग्य स्थान मिळावे यासाठी आखणी करून ठेवली. गोंडी लिपीला साजेसे इंग्रजीचे वळणही त्यासोबत मॅच केले (डिक्शनरीसाठी). संगणकीय सुलभ मुद्राजुळणीसाठी कळफलक व त्याचे प्रोग्रामिंग केले. यासाठी माझे मित्र संगणकप्रणाली तज्ज्ञ राजेश्वर घोडेराव यांनी मला जसे पाहिजे तसे बदल करून दिले. पुस्तक उभे राहायला लागले. हा सारा प्रवास ३० ऑगस्ट २००९ ते ३० जानेवारी २०११ या काळातला.
३० जानेवारी २०११ ला ‘कोयाबोली’ शब्दसंग्रह गोंडी-मराठी-हिंदी या स्वरूपात माजी शिक्षणमंत्री व विद्यमान विधान परिषद उपाध्यक्ष मा. वसंतराव पुरके यांच्या हस्ते व डॉ. मोतीराम कंगाले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आदिवासी गोंड समाज मंडळाच्या स्नेहमेळाव्यात प्रकाशित झाला. हाच तो आदिवासी गोंडी समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण!
या साऱ्या प्रवासात अनेक सुहृदांचे सहकार्य मला मिळाले. कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले. त्या सर्वांचा मी ऋणी आहे. माझ्या वाटय़ाला आलेले हे काम मी करू शकलो यात एक मानसिक समाधान आहे. आता कुठे सुरुवात झाली आहे, पुढे बरेच काम करायचे आहे. आदिवासी गोंड समाजास याचा उपयोग होऊन ते मुख्य प्रवाहात येतील तो दिवस माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असेल. त्या दिवसाची मी वाट बघतो आहे.
नुकतेच गोंडवाना विश्वविद्यालयाची घोषणा झाली आहे व हे विद्यापीठ गडचिरोली येथे प्रस्थापित होणार आहे असे कळते. शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी गोंड समाजाची भरभराट होवो, हीच सदिच्छा!
कोयाबोली
गोंडी शब्दसंग्रह- गोंडी-मराठी-हिंदी
लेखक- सीताराम मंडाले
गोंडी फॉण्ट डिझाइन/ कळफलक / संगणकप्रणाली
प्रा. मुकुंद वासुदेव गोखले
स्क्रिप्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, पुणे
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it