कवितेसाठीच ‘काव्याग्रह’ Print
विष्णू जोशी , रविवार , १९ जून २०११
शब्दांकन- भक्ती सोमण

वाहिन्यांच्ां जाळं दुर्गम भागापर्यंत जाऊन पोहोचलं तरी मुद्रणकलेच्या अस्तित्वाला तिळमात्र धक्का बसला नाही. वृत्तवाहिन्यांचा रतीब दिवसभर चालू असतानाही त्याचा परिणाम वृत्तपत्रांवर अजिबात होत नाही. याचाच अर्थ असा की, उच्चभ्रू ते सर्वसामान्यांपर्यंतच्या लोकांचा मुद्रित मजकुरावरचा विश्वास अद्यापही ढळलेला नाही. या गोष्टींकडे बारकाईनं बघताना त्याचा माझ्यावर झालेला खोलवर परिणाम मला काहीतरी आगळंवेगळं करण्याकडे नेणारा ठरला. लहानपणापासून वाचनाचं वेड. या वेडापायी मुद्रणकलेविषयी आकर्षण निर्माण झालं. मुद्रण क्षेत्रात उतरून त्यातच काहीतरी आगळंवेगळं करावं, असं स्वप्न उराशी बाळगलं. एखादा डिप्लोमा घेऊन नोकरीत पडावं, असं घरच्यांना वाटायचं. का कोण जाणं, पण माझ्या अस्वस्थ चित्तवृत्तीला चाकोरीबद्ध जगणं मान्यच नव्हतं. यवतमाळला बी.एड्.ला असताना मुद्रण व्यवसायात शिरण्याचा विचार मनात आला. नजरेसमोरच्या सगळ्या वाटा साशंक होत्या. तरी बी.एड्.ला रामराम ठोकला आणि संदिग्ध रस्त्यावरून मुशाफिरी सुरू केली. अनेकांनी मुर्खात काढलं. माझा हा निर्णय घरच्यांना पटला नाही. मुलगा वाया जाणार, अशी हाकाटी केली, पण निर्णय ठाम होता. वाटचालीत कितीही अडथळे आले तर त्यांच्यावर मात करत इच्छित लक्ष्य गाठण्याची मनाची पक्की तयारी होती. त्यासाठी काय करता येईल, याचे ठोकताळे बांधायला सुरुवात केली. मग जाणवलं की, वाचकांना वाचनासाठी प्रवृत्त करणारं लिखाण हळुहळू कमी होत आहे. एकदा सकस लिखाणाची उत्पादन क्षमता वाढली की, सकस वाचन करणाऱ्यांच्या नजरा वाचनाकडे वळतील आणि ढिसाळलेला कणा भक्कम होईल. ही अस्वस्थता मनात सतत राहायची. त्यादृष्टीनं आपल्याला काही प्रयत्न करता येईल का, यासाठी आत्मपरीक्षणही करत होतो. आत्मपरीक्षणाच्या या अस्वस्थ क्षणांमुळे एक नवीन विचार उसळी मारून वर आला. तो विचार म्हणजे कवितेसाठी काहीतरी करण्याचा.
 जिथं प्रसारमाध्यमं पोहोचत नाहीत, अशा ग्रामीण भागातील काही कवींकडून चांगल्या कविता लिहिल्या जातात, परंतु त्या कवी आणि कवितांकडे फारसं कुणाचं लक्ष जात नसतं. वृत्तपत्रात किंवा इतरही ठिकाणी प्रस्थापित कवींना मानाचं स्थान मिळतं, पण ग्रामीण भागात जे नवोदित, चांगले आणि दर्जेदार कवी आहेत, ते मागं पडतात. अशा नवोदित कवींना आणि त्यांच्या दर्जेदार कवितांना स्थान मिळावं, त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात, म्हणून प्रयत्न करायचे, असं ठरवलं. केवळ कवितेसाठीच एखादं नियतकालिक काढावं, हा विचार आला. हा विचार रेखाचित्रकार रा.मु. पगार, गजानन वाघ, शेषराव धांडे आणि विकास देशमुख या मित्रांना बोलून दाखवला. आमच्या वाशीम येथील डॉ. वसंत व डॉ. निलिमा घुनागे तसंच विठ्ठल जोशी यांनीही पाठबळ दिलं. या सर्वाच्या सहकार्यानं एप्रिल २०१० मध्ये ‘काव्याग्रह’ या फक्त कवितेसाठीच वाहिलेल्या त्रमासिकाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
   ‘काव्याग्रह’चा पहिला अंक काढायचं निश्चित झाल्यानंतर मान्यवर तस्ांच नवीन पिढीतल्या सशक्त कवींच्या कविता मिळवण्यासाठी जवळपास सात-आठ महिन्यांचा कालावधी लागला. दर्जेदार साहित्य मिळण्यासाठी वेळ लागणारच होता. पहिल्या अंकासाठी ज्या कवींची यादी तयार करण्यात आली, त्या सर्वाना ‘काव्याग्रह’साठी कविता पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं. त्या आवाहनावर ठरल्याप्रमाणे सर्वच कवींच्या कविता मिळाल्या. सतीश काळसेकर, नारायण कुळकर्णी-कवठेकर, अजीम नवाज राही, दासू वैद्य, लोकनाथ यशवंत, अशोक कोतवाल, प्रकाश होळकर, सदानंद देशमुख, प्रशांत असनारे यांच्यासारख्या जुन्या आणि काही नवीन कवींकडून कविता मिळवल्या. पहिल्या अंकासाठी १६ कवींच्या कविता आणि बाबाराव मुसळे यांचा समीक्षणात्मक लेख मिळवण्यात आला.  औरंगाबादच्या जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर यांनी अंकासाठी अत्यंत महत्वाच्या ठरतील, अशा काही सूचना केल्या. अंकासाठी आलेल्या सर्व कवितांवर रा.मु. पगार यांनी अप्रतिम रेखाटनं केली.  ‘काव्याग्रह’च्या पहिल्या अंकाचे मानकरी म्हणून अजीम नवाज राही यांची निवड करण्यात आली. त्यांच्या कवितेवर एक स्वतंत्र लेख लिहिण्यात आला. ‘चित्रसंवाद’ या सदरासाठी भ. मा. परसावळे यांनीही अप्रतिम चित्र रेखाटलं. अशा रीतीनं एप्रिल २०१० मध्ये ‘काव्याग्रह’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. अंक हाती आल्यावर अभिप्रायासाठी तो काही मान्यवर साहित्यिकांकडे पाठवण्यात आला. आश्चर्य म्हणजे, अंक पाठवून आठ-दहा दिवस होत नाहीत तर, मान्यवर साहित्यिकांची पत्रं यायला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक डॉ. विलास सारंग यांना तर हा अंक इतका आवडला की, त्यातील एक कविता इंग्रजीत अनुवाद करून छापण्याची अनुमती हवी आहे, अशा आशयाचं पत्र लिहून सोबत अनुमतीचा फॉर्मही पाठवला. मातब्बर दैनिकांनीही अंकाची नोंद ठळकपणे घेतली. मनीमानसी नसताना सुरुवातीलाच एवढा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यावर पुढचे अंक काढण्याची उत्सुकता खूपच वाढली.
   एके दिवशी अचानक पैठण तालुक्यातील संदीप शिवाजीराव जगदाळे या कवीच्या ‘इथल्या भेदरलेल्या काळजांवर’ आणि ‘गावाची झिंगलेली रात्र’ या दोन कविता हाती पडल्या. या दोन्ही कवितांमधून ग्रामीण जीवनातला अनुभव सशक्तपणे चित्रित केलेला होता. त्यामुळे या कवितांना दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकात स्थान देण्यात आलं. त्याचबरोबर महेश केळुसकर, प्रफुल्ल शिलेदार, छाया कोरेगावकर यांच्याही कविता मिळाल्या. या कवितांच्या बरोबरीनं महत्त्वाच्या अशा नव्या-जुन्या कवितासंग्रहांवरील परीक्षणंही तिसऱ्या अंकापासून ‘काव्याग्रह’मध्ये घेतली जाऊ लागली. त्यादृष्टीनं अंकात बाबाराव मुसळे, अजीम नवाज राही, अजय देशपांडे अशा काहींनी केलेली कवितासंग्रहांवरील विस्तृत परीक्षणं घेण्यात आली. याच अंकातील कवी लोकनाथ यशवंत यांचा ‘माझ्या कवितेला झाला सूर्यस्पर्श’ हा नारायण सुर्वे यांच्या संदर्भातील लेख नव्यानं कविता लिहिणाऱ्या कवींना प्रेरणा देणारा ठरला. योग्य व्यक्ती योग्य वेळीच भेटणं हे आयुष्यात किती मोलाचं असतं, अशा आशयाचा तो लेख होता. किरण येले, अंजली कुलकर्णी, सुनीता झाडे, राज मेहर अशा काही कवींच्या कविता या अंकात होत्या, पण कवी सतीश सोळांकूरकर यांची ‘एकटा’ ही आईच्या संदर्भातील कविता तर ‘काव्याग्रह’च्या तिसऱ्या अंकाची ‘माईलस्टोन’च ठरली. ही कविता वाचून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. काही वाचक ही कविता वाचून अक्षरक्ष: रडले, तर काहींनी ही कविता आम्ही घरामध्ये फ्रेम करून लावली, असं सांगितलं. गीतकार कवी प्रवीण दवणे, कविवर्य शंकर वैद्य यांनी सुद्धा त्यांचे अभिप्राय कळवले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मशतादी वर्षांनिमित्त नाशिक इथं झालेल्या एका कार्यक्रमात दासू वैद्य यांनी सतीश सोळांकूरकर यांना त्यांची ‘एकटा’ हीच कविता म्हणायला लावली.
    चांगली कविता ही जास्तीत जास्त वाचक-रसिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ‘काव्याग्रह’चा हाच मूळ उद्देश आहे आणि तो काही प्रमाणात सफलही झाला आहे. या वाटचालीत अनेक वळणं, खाचखळगे आहेत. कोणत्याही क्षेत्रात पाळंमुळं खोलवर रुजवताना व्यावहारिक उलथापालथ महत्त्वाची असते. फक्त शाबासकीनं पोट भरत नाही, याचं संपूर्ण भान ठेवून प्रवास सुरू आहे. या प्रवासात आनंदही तितकाच आहे. शेवटी माणसाचं मन जिथे रमतं तिथंच आत्मानंदाचे रंग गवसत असतात. मी ज्या आत्मिक आनंदाच्या शोधासाठी काव्याच्या प्रदेशाकडे वळलो तो आनंद पूर्ण मिळालाय, असं नाही. आजवरचं हे देणं शब्दांचंच देणं आहे. त्याचे धुमारे मला लख्खपणे दिसत आहेत. उद्या बहरही दिसेल. अगदी सुरेश भटांच्या शब्दात- ‘ओथंबलेल्या कफल्लक पण, गर्भश्रीमंत फलश्रृतीसारखा’!
त्यांना पसंत नाही ताजा पहाटवारा
आधीच बंद केले एकेक दार त्यांनी
माझ्या घरी आला पाऊस माणसांचा
त्यांच्या घरी नेला त्यांचा पगार त्यांनी.