अलविदा-जोशिला.. Print

दिलीप ठाकूर, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२

यश चोप्रा यांची वैशिष्टय़े अनेक.. वयाच्या ८० व्या वर्षीदेखील त्यांनी काश्मीरला जाऊन ‘जब तक है जान’ या आपल्या ताज्या दमाच्या प्रेमपटाचे दिग्दर्शन करावे हे अद्भुत व कौतुकाचे. दिग्दर्शकाला, खरे तर ‘क्रिएटिव्ह’ माणसाला वयाची अजिबात अट नसते याचे आदर्श व सुंदर उदाहरण म्हणजे यशजी! आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सिनेमाशी सोबत केली हे विशेष. याबाबत ते आपले वडीलबंधू बी. आर. चोप्रा यांच्या बरोबरीचे ठरले. तेही ‘बागबान’ या आपल्या शेवटच्या चित्रपटापर्यंत कार्यरत राहिले.


यशजींचा उत्साह, शिस्त, व्यावसायिक दृष्टिकोन व रणनीती या गोष्टी वाखाणण्याजोग्या. चित्रपटाच्या क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे यासाठी ते एक परिपूर्ण आदर्श व्यक्तिमत्व. ‘जब तक है जान’ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्याच ओशिवरा येथील यशराज स्टुडिओत शाहरूख खानने त्यांची दिलखुलास, दिलधडक, अधेमधे फिरकी घेत जाहीर मुलाखत घेतली. तेव्हाही यशजींच्या बोलक्या चेहऱ्यावर वय दिसत नव्हते. एका उत्तरात ते पटकन बोलून गेले की, कतरिना कैफ ही आजची कॅमेरासमोर खुलणारी सर्वात देखणी तारका आहे. तिला कॅमेऱ्याचा कोणताही दबाव येत नाही. त्यांच्या या वक्तव्यातच त्यांचे कायमस्वरूपी तरुणपण व हिरवटपणा दिसतो. याबाबत ते ‘शोमन’ राज कपूर यांच्या वृत्तीच्या जवळ जातात असे दिसते. पण अशाच रंगलेल्या गप्पात ‘जब तक है जान’ हा आपला दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट असून आपण आता दिग्दर्शनातून संन्यास घेत असल्याचेही जाहीर केले. कदाचित त्यांना आजच्या पिढीतील काही कलाकारांची वागण्याची पद्धत व एकूणच चित्रपट निर्मितीची प्रक्रिया यांचे दडपण येत असावे.
बी. आर. चोप्रा यांची आपल्या भावाने इंग्लंड येथे जाऊन इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रम करावा अशी इच्छा होती. यशजी आपल्या या मोठय़ा भावाला भाईसाब या नावाने हाक मारीत असत. यशजींच्या यशस्वी, चौफेर व सतत पुढील पावले टाकणाऱ्या कारकीर्दीचे तीन टप्पे दिसतात. ‘धूल का फूल’ ते ‘दाग’, ‘दिवार ते परंपरा’, आणि शेवटचा टप्पा ‘चांदनी’पासून ते ‘जब तक है जान’. त्यांना आपण प्रणयाचा मानबिंदू अथवा प्रेमाचा बादशहा असे जरी म्हणत असलो तरी त्यांच्याइतकी विविधता क्वचितच एखाद्या दिग्दर्शकाने दिली. ‘वक्त’ हा त्यांचा मल्टिस्टारकास्ट चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला यशस्वी व सर्वोत्तम मल्टिस्टारकास्ट चित्रपट गणला जातो. ‘इत्तेफाक’ हा तर त्यापेक्षाही वेगळा. एक रहस्यरंजक कलाकृती. राजेश खन्नाला दिलीप रॉय या वेडय़ाच्या भूमिकेत यशजींनी पेश केले. अखेरीला रहस्याचा चकमा दिला. बीआर फिल्म्स या बॅनरमधून आपण बाहेर पडावे व स्वत:ची चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करावी असे त्यांना वाटत असतानाच तात्कालीन बडे वितरक गुलशन रॉय यांनी त्यांना मोठा आधार दिला. त्यातून त्यांनी यशराज फिल्म्स या आपल्या स्वत:च्या चित्रपटनिर्मिती संस्थेची स्थापना केली.
सहकार्याची जाणीव
यश चोप्रा यांनी ‘दाग’ या पहिल्याच चित्रपटात रौप्य महोत्सवी यश संपादन केले. यशजींनी गुलशन रॉय यांच्या सहकार्याची पूर्णपणे जाणीव ठेवली व त्यांच्या त्रिमूर्ती फिल्म्स या बॅनरसाठी ‘जोशिला’, ‘दिवार’, ‘त्रिशूल’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘जोशिला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय आनंद करणार अशी बरेच चर्चा गाजली. परंतु, त्यांच्या वाढीव मानधनाच्या मागणीने हा चित्रपट यशजींकडे आला व त्यांना देव आनंदला दिग्दर्शित करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. ‘दीवार’ने अमिताभ बच्चन याची ‘अँग्री यंग मॅन’ची प्रतिमा आणखी बळकट केली. ‘दीवार’ हा यशजींचा पूर्णपणे वेगळा चित्रपट म्हणावा लागेल. यातील अमिताभ बच्चनने साकारलेली ‘विजय’ ही व्यक्तिरेखा वादग्रस्त हाजी मस्तान यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती. पण यशजींनी चित्रपट साकारताना कथेचा तोल कुठेही बिघडू दिला नाही. ‘त्रिशूल’मध्ये अमिताभ बच्चनचा सूडनायक ‘एस्टॅब्लिश’ करताना तो खलनायकाचा खात्मा करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन येतो असे दाखविले. ‘काला पत्थर’ हा कोळशाच्या खाणीतील कामगारांवर आधारित चित्रपट होता. ‘कभी कभी’ मध्ये त्यांनी अमिताभला प्रणय नायक म्हणून सादर करून रसिकांना सुखद धक्का दिला. हादेखील त्यांचा मल्टिस्टारकास्ट चित्रपट होता. आपल्या दिग्दर्शनात अमिताभ केवळ मारधाड करतो असे नव्हे तर परिपक्व प्रेमिक देखील साकारतो हे त्यांनी दाखविले.
‘सिलसिला’च्या कथेवर खरे तर त्यांचे बी आर चोप्रा यांच्या ‘गुमराह’ या चित्रपटातील कथेचा प्रभाव होता. यशजींकडून तसे घडावे हे थोडेसे आश्चर्याचे होते. पण प्रसारमाध्यमांनी हा चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना तो अमिताभ व रेखा यांच्या प्रेम प्रकरणाभोवती आहे व त्यातून जया बच्चन हिला मिळणारी सहानुभूती या चित्रपटात दाखविण्यात येत आहे, असे चित्र रंगवल्याने चित्रपटाचेच नुकसान झाले.
रुपेरी रोमान्स
‘चांदनी’पासून त्यांना अस्सल रुपेरी रोमान्स गवसला. प्रेमातला हळुवारपणा, असोशी, तगमग, ओढ या भावना त्यांनी अप्रतिम चितारल्या.  अवघ्या प्रमुख तीन पात्रांभोवती देखील तीन तासांची प्रेमकथा फुलू शकते असे यशजींनी आपले सामथ्र्य दाखविले. वाढत्या वयात ते प्रणयपटांकडे वळले व तेथेच त्यांनी जम बसविला, हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा विशेष होय. ‘लम्हे’ हा काळापुढचा प्रणयपट होता. श्रीदेवीची दुहेरी धाडसी भूमिका हे या चित्रपटाचे वैशिष्टय़. परंतु, रसिकांना हा धाडसी प्रेमपट दुर्दैवाने रुचला नाही.
मेट्रोशी अतूट नाते
यशजींचा चित्रपट व मेट्रो चित्रपटगृह यांचे अगदी अतूट नाते होते. तेथे त्यांचे ‘कभी कभी’, ‘चांदनी’, ‘लम्हे’, आणि ‘डर’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी लम्हे वगळता अन्य चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले.
काही वर्षांनी ‘दिल तो पागल है’ दिग्दर्शित करताना त्यांनी आपण अजूनही ताजेतवाने व रसिक दृष्टीचे आहोत याचा प्रत्यय दिला. या प्रेम त्रिकोण-चौकोनाच्या सादरीकरणासाठी त्यांनी गीत-संगीत-नृत्याचा फॉर्म वापरला व त्यात ते यशस्वी देखील झाले.  ‘वीर-झारा’ हा चित्रपट आणताना त्यांनी संगीतकार मदनमोहन यांची काही दुर्मीळ गाणी मिळवली व या चित्रपटासाठी वापरण्याचा वेगळा प्रयोग केला.
विविध प्रकारची प्रयोगशीलता हे त्यांच्या दिग्दर्शनाचे वैशिष्टय़ आहे. त्यांचा पुत्र आदित्य याने दिग्दर्शित केलेल्या ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे’ या चित्रपटाची चोरटय़ा मार्गाने चित्रफित आली तेव्हा त्यांनी जुहूच्या आपल्या बंगल्यावर आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांना बोलावले असता त्यांची विशेष भेट घेता आली. तेव्हा सर्जनशील कारागिरीला अशा चोरीने कसा धक्का बसतो व त्यातून चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे व चित्रपट रसिक यांचे कसे नुकसान होते हे सांगताना त्यांचे व्यथित होणे हेलावून टाकणारे होते.  
काळानुसार बदल
बदलत्या काळासोबत यशजी स्वत:ला बदलत राहिले. म्हणूनच ते कायम तरुण राहिले. ‘मशाल’ अपयशी ठरला म्हणून यशजी निराश झाले नाहीत. त्याच चित्रपटात त्यांनी बॅलॉर्ड पिअर येथे मध्यरात्री निर्मनुष्य स्थळी दिलीपकुमार आपली आजारी पडलेली पत्नी वहिदा रहमान हिच्या मदतीसाठी कुणीतरी यावे म्हणून विलक्षण टाहो फोडतो असे एक अविस्मरणीय दृश्य साकारले. यशजींच्या दिग्दर्शनातील हा सर्वोच्च क्षण म्हणता येईल. यशजींचा प्रवास असा खूप मोठा व अभ्यासाचादेखील.  यशजींच्या निधनाने एका ‘जोशिला’ व्यक्तिमत्वाची अखेर झाली आहे.     

‘जोशिला’पासून यश चोप्रांनी आपला एकूणच रंगढंग बदलला. स्वित्झर्लण्डचे फुलांचे ताटवे व प्रेमाची असोशी यांचे अनोखे नेत्रदीपक दर्शन त्यांनी घडवायला सुरुवात केली. त्यांना जणू नवा सूर सापडला.