विशेष लेख :प्रेम अर्पावे.. Print

 

गिरीश कुलकर्णी - मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२

यश चोप्रा यांचं मोठेपण कशात होतं, हे सांगण्यासाठी ‘लोकसत्ता’नं दोघांना निमंत्रित केलं : पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे अष्टपैलू निर्माते गिरीश कुलकर्णी आणि लोकप्रिय हिंदी चित्रपट देणारे निर्माते-दिग्दर्शक एन. चंद्रा
अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांची मुलाखत पाहिली होती. मी प्रत्यक्ष दिल्लीत काही वर्षांपूर्वी पाहिलेले, ऐकलेले यश चोप्रा बहुतांशी तसेच होते. बोलणं थोडं अस्पष्ट होतं. झालं होतं. मुलाखतीचा एकूण रागरंग हा फक्त ‘प्रमोशनल’ पठडीतला नव्हता. त्यातून आजकालच्या प्रथेतलं प्रमोशन त्यांनी स्वत: कधी केल्याचं पाहिलं, ऐकलं नव्हतं. पुसटशी शंका आली. हेतू कळेना.

आज त्या मुलाखतीचे, त्यांच्या शेवटच्या चित्रपटाच्या शीर्षकाचे वेगळे अर्थ लागताहेत. माणसं निखळ कार्यकर्तृत्वावर कशी मोठी होतात या प्रश्नाची अगदी साधी, सोपी उकल या त्यांच्या शेवटच्या बोलण्यातून होते. भारतीय संस्कारपरंपरेतून आलेली मूल्यं प्रमाण मानत, प्रसंगी या परंपरेला सहज आव्हान देणारा विचार मांडत यशजींनी स्वत:चा सिनेमा सतत समकालीन ठेवला. दोन प्रमुख व्यक्तिरेखांच्या भावनिक संघर्षांतून समाजातील प्रस्थापित मूल्यांना आव्हान दिलं. काळाबरहुकूम नवता आणण्याचा प्रयत्न केला. वरकरणी ‘प्रेमाचे त्रिकोण’ असा एकच एक विषय हाताळूनही प्रत्येक सिनेमा लोकप्रिय करून दाखवला. इतकंच नव्हे तर, कदाचित स्वातंत्र्योत्तर दोन दशकांत हरवलेला रोमँटिसिझम समाजमनात पुनप्र्रस्थापित केला. माणसं पडद्यावरच्या प्रतिमांमध्ये उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहू लागली. एरवी सामान्य माणसाला ऊर्जा देणारा भवताल नसताना सिनेमानं ती ऊर्जा पुरवण्याची जबाबदारी उचलली आणि हे स्वप्नरंजन माणसांना बेगडी मूर्ख बनवणार नाही याची पूर्ण खबरदारी त्या प्रतिमांनी अधोरेखित केलेल्या भारतीय मूल्यांनी घेतली. एवढय़ा थोरल्या भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून पाहू जाता या लोकप्रिय चित्रपटांचं महत्त्व कुणी कमीअधिक मानेल, पण त्यांनी घाऊक प्रमाणात समाजात ओतलेली ऊर्जा आणि उत्साह नाकारता येणार नाही. प्रसंगी यशजींनी पुरस्कृत केलेली मूल्यं ही सिनेमा या कलाप्रकाराला आधुनिक बनवण्यातला अडथळा ठरली, असंही कुणी म्हणेल. पण ‘माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागावं’ या विनोबांच्या तत्त्वाला ‘माणसानं माणसावर प्रेम करावं’ ही सिनेमॅटिक फोडणी यशजींनी दिली. त्याचा दुष्परिणाम म्हणून की काय, आजच्या भ्रष्ट राज्यव्यवस्थेतल्या माणसांबद्दल बहुसंख्यांना प्रेमच वाटतं.
समाजावर ठोस प्रभाव पाडणारं माध्यम आपण वापरतो याची पूर्ण जाणीव असलेला माणूस म्हणजे ‘यश चोप्रा’. या जाणिवेतूनच कदाचित त्यांच्या सिनेमानं कधी कुणी दुखावल्याचं, अपमानित झाल्याचं ऐकिवात नाही. ‘प्रेम’ हा एकच एक चिरस्थायी व्यवच्छेदक मानवी गुण प्रेरणास्रोत मानून काळाबरहुकूम बदलत जाणारी जगण्यातली आव्हानं, तलखी आणि दु:ख याचं वेगवेगळं आकलन त्यांनी मांडलं. आमच्या समाजानं कुणाला ‘हीरो’ म्हणावं हेही त्यांनी ठरवलं. ‘हीरो’ का म्हणावं याची कारणंही त्यांनीच समजावली. दहा माणसांना मारून येणारं हीरोपण फुकाचं असतं. कुणालाही न मारता प्रामाणिक राहण्याचं मूल्य ‘माँ’ मिळवणारं टिकाऊ हीरोपण देतं हे प्रेक्षकांच्या मनावर परिणामकारकरीत्या बिंबवण्याची त्यांची हातोटी, सिनेमातल्या ‘नाटय़ा’ची त्यांची जाण दर्शवणारी आहे.
वर्षांगणिक पिढी बदलण्याच्या काळापर्यंत जुन्या पिढीचा हा माणूस स्वत:ला सतत शोधत राहिला. उत्तम कथेची वाट पाहात त्यांनी सिनेमाच्या अस्थिर भूमीवरही ठेहेराव साधला. माणसाच्या जगण्याची लय शोधणारा कसबी कलावंत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. हे ठेहेरावाचं अधिष्ठान आणि ‘लय’ जाणण्याची विलक्षण प्रतिभा यांचं प्रतिबिंब त्यांच्या संगीतात पडलेलं दिसतं. सिनेमाचं कथन ‘साँग अँड डान्स’ या प्रकारात करताना त्यांनी जे संगीत निर्माण करवून घेतलं ते जगभरात ‘बॉलिवूड डान्स’ हा नृत्यप्रकार प्रस्थापित करून गेलं. भारतीय परंपरेत असलेलं संगीताचं महत्त्व जाणून त्यांनी संगीताला जगण्याचा अविभाज्य भाग बनवलं. शास्त्रीय संगीताचं कलाधर्मीशास्त्र बाजूला ठेवून ‘लोकसंगीता’च्या लोकधर्मी लय, ताल, ठेक्याचं त्यात मिश्रण करीत अभिजातता जपणारं संगीत निर्माण केलं. त्यांच्या चित्रपटातील संगीताची मेजवानी हा एक स्वतंत्र मनोरंजनाचा अध्याय असे. ‘चित्रपट’ या व्यवसायाला असलेली अनिश्चिततेची जोड त्यांनी पुरेपूर अनुभवली. अनुभवातून समज वाढवत त्यांनी व्यवसाय म्हणूनही नवनवीन प्रयोग ‘यश राज फिल्म्स’ (वायआरएफ)मार्फत केले.  चाळीस र्वष सातत्यानं समाजाला ऊर्जा देणारा हा शांत, निगर्वी माणूस अचानक गेला. रोमँटिसिझमचे मेरुमणी धक्कादायक एग्झिट घेतात याचं हे देवसाहेब, शम्मी कपूर यांच्यानंतरचं अलीकडचंच तिसरं उदाहरण!
हळुवार रोमँटिक असण्याचा काळ सरला आहे. ‘प्रेमाची’ गोष्ट सांगण्याचा काळ सरला आहे. सर्वच क्षेत्रांत ऊर्जेचा क्षय होत असताना काळानं आमचं मोठंच नुकसान केलं आहे. कृतार्थ आयुष्य जगलेल्या या ज्येष्ठ जिवलगाला मृत्यूच्या संकल्पनेतली ठोस निश्चितता माहीत नसण्याचं काही कारणच नाही. म्हणूनच कदाचित ‘हा माझा शेवटचा चित्रपट’ असं सगळय़ांचा निरोप घेऊन यशजी गेले. Thank you  so much Yashji. For all the love you spread in this world!

‘आजचाच’ दिग्दर्शक!
एन. चंद्रा
यशजी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. असे ‘भाग्य’ फारच थोडय़ा दिग्दर्शकांच्या कर्तबगारीत असते. अगदी नावेच घ्यायची तर, विजय आनंद, नासिर हुसेन, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, शक्ती सामंता असे त्यांच्या काळातील अनेक दिग्दर्शक केव्हाच ‘जगाच्या पडद्याआड’ गेले, पण यशजी कधीच ‘इतिहासाचा भाग’ न होताच पुढची पावले टाकत राहिले. केवळ नियतीच त्यांना अखेर थांबवू शकली. पण त्यातही काय घडले ते बघा, आणखी अवघ्या मोजून तीनच आठवडय़ांनी त्यांनी दिग्दर्शिलेला ‘जब तक है जान’ झळकेल नि त्यांनी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन इतक्या जवळ आल्यावर ‘एग्झिट’ घेतली. मी याला ‘द ग्रेट क्लायमॅक्स’ म्हणेन. दिग्दर्शकाच्या जीवनात यापेक्षा नाटय़मय ते काय घडणार? या चित्रपटाचे आता फक्त ‘प्रमोशनल गीत’ तेवढे चित्रित होणे शिल्लक असले तरी यशजींची एकूण कार्यशैली, कामावरची निष्ठा व झोकून देण्याची प्रवृत्ती पाहता ते काम पूर्ण झाल्यासारखेच आहे.
यशजींच्या अनेक वैशिष्टय़ांत आणखी एक म्हणजे, त्यांनी आपल्या ‘यशराज फिल्म’ या प्रतिष्ठित निर्मिती संस्थेची वाटचाल ‘एकला चलो रे’ अशी ठेवली नाही. फार अगोदरपासूनच त्यांनी आपल्या साहाय्यक दिग्दर्शकांनादेखील स्वतंत्रपणे काम करण्याची संधी दिली. त्यानुसार रमेश तलवारने यशराज फिल्मसाठी दुसरा आदमी, सवाल, तर दिलीप नाईकने ‘नाखुदा’ दिग्दर्शित केला. अगदी राजेश सेठी हादेखील त्यांचा साहाय्यक अन्य निर्मात्यांसाठी ‘अंगारे’ दिग्दर्शित करून स्वतंत्र वाटचाल करू लागला. यशजींनीच ‘नूरी’च्या वेळी चरित्र अभिनेते मनमोहनकृष्ण यांना दिग्दर्शन सोपवले. स्वत:च्या कार्यकर्तृत्वावर विश्वास असणारा
निर्माता-दिग्दर्शकच असा इतरांना चांगली संधी देतो. अन्यथा काही बडय़ा दिग्दर्शकांकडे तब्बल चाळीस-चाळीस वर्षे साहाय्यक असलेले आयुष्यात कधीच स्वतंत्रपणे दिग्दर्शन करू शकत नाहीत. पण यशजी अत्यंत सकारात्मक प्रवृत्तीचे व खेळकर मनाचे असल्यानेच अशी चांगली पावले टाकू शकले. हा त्यांचा गुण तमाम दिग्दर्शकांनी अमलात आणण्यासारखा आहे.
यशजींना प्रेमाचा बादशहा अथवा प्रेमपटाचा किमयागार असे म्हटले जाते. पण ती प्रसारमाध्यमांनी त्यांना दिलेली.. अथवा अगदीच स्पष्ट सांगायचे तर चिकटवलेली प्रतिमा आहे. त्यांनी खरं तर कोणाही दिग्दर्शकाने दिली नसेल अशी प्रचंड विविधता दिली आहे. ‘धूल का फूल’मध्ये ‘तू हिन्दू बनेगा ना मुसलमान बनेगा’ असे जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले, ‘वक्त’मध्ये तीन भाऊ हरवले व गवसले यांचा फॉम्र्युला मसालेदार केला, ‘इत्तफाक’मध्ये रहस्याचा चकमा दिला, ‘दाग’च्या प्रेमत्रिकोणाला भावनिक किनार होती, ‘दीवार’मध्ये दोन भिन्न प्रवृत्तीच्या भावांच्या संघर्षांत आईचा करारीपणा होता, ‘त्रिशूल’मध्ये बदले की भावना होती. अशी त्यांची प्रेमपटाव्यतिरिक्त केवढी तरी उदाहरणे सांगता येतील. अशी विविधता ठेवल्यानेच ते सतत ताजे व उत्साही राहिले. प्रेमाच्या गोष्टींकडे ते खूप उशिरा वळले, त्यातही त्यांनी आपली ‘चमक’ दाखवली. पण तीच त्यांची कायमस्वरूपी ओळख झाली.
मी स्वत: एक दिग्दर्शक या भूमिकेतून त्यांच्या बावीस चित्रपटांचा विचार करतो, तेव्हा मला ‘दीवार’ व ‘वक्त’ हे त्यांचे चित्रपट सर्वाधिक आवडतात. ‘दीवार’ माझ्या पठडीतील चित्रपट आहे, बऱ्याच बाबतीत मला तो जवळचा. उत्तम पटकथा कशी असावी याचे ते एक उदाहरण आहे व योग्य कलाकार निवडीने तो त्यांनी साकारला. ‘वक्त’मध्ये बलराज साहनी, राजकुमार, सुनील दत्त व शशी कपूर असे चार नायक आणि त्यांच्या इंद्राणी बॅनर्जी, साधना, शर्मिला टागोर अशा नायिका असा ताळमेळ जमवणे सोपे काम नाही. इतक्या कलाकारांचा योग्य प्रकारे वापर करता आला नाही तर एकूणच चित्रपटाचा तोल बिघडू शकतो, यशजींनी त्यात यश प्राप्त केले हे जास्त महत्त्वाचे. मनोरंजनाचा मसाला साकार करताना दिग्दर्शकाला जास्त भान ठेवावेच लागते, तेव्हा प्रेक्षकांना जरादेखील कंटाळा येऊ देता कामा नये. यशजींचे हेच दोन चित्रपट मला आवडण्यामागे ही अशी कारणे आहेत.
यशजींची आणखी एक खासियत म्हणजे त्यांना बदलत्या परिस्थितीचे पूर्ण भान होते. राजेश खन्नाच्या वागण्यात त्यांना काही बदल जाणवला व त्याचा पडता काळ सुरू झाला आहे हे लक्षात येताच त्यांनी नवीन दमाच्या अमिताभसोबत जोडी जमवली, कालांतराने त्याचेही वय वाढत चालल्याचे दिसू लागताच त्यांनी नव्या पिढीच्या शाहरुखसोबत काम सुरू केले. स्वत:ला नवीन पिढीशी जुळवून घेताना व तेव्हाच पुढच्याही पिढीच्या रसिकांसमोर आपला चित्रपट ‘आजचाच आहे’ असे सकारात्मक चित्र निर्माण करण्यास अशा गोष्टींची खूप गरज असते. त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणावाच लागतो.

‘आकलन’ हे सदर पुढील मंगळवारी नेहमीप्रमाणे प्रसिद्ध होईल