नाट्यरंग : प्रेक्षकशरण ‘घालीन लोटांगण’! Print

रवींद्र पाथरे

एकीकडे आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार करून भौतिक सुखोपभोग अधाशीपणे ओरबाडणारा आणि त्याचवेळी भंपक बाबा- बुवा- बापू- महाराजांच्या कच्छपि लागलेला आजचा भोंदू, दांभिक समाज आणि त्याच्या मूर्खपणाचा फायदा उठवत अध्यात्माची दुकानं टाकणारे बुवा-महाराज, तसंच या भोंदू बाबा-बुवांचा आणि त्यांच्या अंध भक्तीत मश्गुल असलेल्या भक्तांचा ‘वापर’ करून आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेणारे धूर्त, मतलबी राजकारणी आणि लोकांच्या तथाकथित भल्याचा मक्ता घेतलेल्या आणि ‘सोयी’स्कर समाजसेवा करणारे गणंग समाजसेवक यांनी सध्या आपल्याकडे भलताच धुमाकूळ घातलाय. या सर्वाचा पर्दाफाश करणारं ‘घालीन लोंटागण’ हे ज्ञानेश महाराव लिखित नाटक पाहण्याचा योग नुकताच आला. यापूर्वी संतोष पवार यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग त्यावेळी आला नव्हता. परंतु आता दशरथ हातिसकर यांनी नव्यानं बसवलेलं ‘घालीन लोटांगण’ पाहिलं आणि एका प्रबोधनपर नाटकाची लक्तरं झाल्याचं पाहण्याचं दुर्भाग्य नशिबी आलं.  
दवंडे, चावंडे आणि लवंडे या नावाचे तीन उचापतखोर आपल्या एका मित्राला हाताशी धरून, त्याला ‘चिलटे महाराज’ बनवून सत्संगाचं दुकान टाकतात. हल्ली असल्या आध्यात्मिक धंद्याला चांगली बरकत असल्यानं आणि आध्यात्मिक दुकानदारीसाठी लागणाऱ्या नाना हिकमती त्यांच्याठायी असल्यानं अल्पावधीतच अनेक भक्तगण या चिलटे महाराजांच्या नादी लावण्यात ते यशस्वी होतात. चिलटे महाराज हे शिकलेले, संत-महात्म्यांच्या वचनांचा, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा उत्तम अभ्यास वगैरे केलेले असल्याने त्यांचं पितळ उघड पडण्याची शक्यता नसते. स्वर्गलोकातील कुबेरापासून कामदेवापर्यंत समस्त देवांशी त्यांचं डायरेक्ट फिटिंग असल्यानं मोबाइलवरून थेट संपर्क साधून महाराज त्यांना भक्तांच्या आर्थिक नडीपासून पुत्रकामनेपर्यंतच्या नानाविध समस्यांची त्वरित तड लावण्याचे ‘आदेश’ देतात. भक्तजन महाराजांच्या या ‘पॉवर’मुळे साफ गारद होतात.
चिलटे महाराजांचं हे वाढतं प्रस्थ ‘बुनिस’ (बुवाबाजी निर्मूलन समिती)चे कार्यकर्ते दे. व. लोके आणि मंडळींना खटकू लागतं. चिलटे महाराजांचा पर्दाफाश करण्यासाठी दे. व. लोके ‘आमरण उपोषण’ फेम समाजसेवक आबा लाखे यांची मदत घेतात. आजवर केवळ ‘भ्रष्टाचार’ या एकाच मुद्दय़ावर वेळोवेळी आमरण उपोषण करणारे आबा लाखे ‘बुनिस’च्या लढय़ाला पाठिंबा देतात. चिलटे महाराजांविरुद्ध आबा लाखे आणि ‘बुनिस’चे कार्यकर्ते दे. व. लोके लोकांमध्ये जागृती करण्यासाठी जंग छेडतात. चिलटे महाराजांचा वाढता भक्तसंप्रदाय पाहून ‘लोकनेते’ निधडे हे त्यांचा वापर आपल्या राजकारणासाठी करून घ्यायचं ठरवतात. महाराजांचं प्रस्थ वाढवण्यासाठी आणि त्यांच्या बुवाबाजीला अधिकाधिक लोकाश्रय मिळण्यासाठी महाराजांना त्यांना अर्थसाहाय्य पुरवतात. त्यांच्या कच्छपि लागल्याचं ‘नाटक’ करतात. परंतु आपल्या सामर्थ्यांचा फाजील आत्मविश्वास निर्माण झालेले चिलटे महाराज जेव्हा स्वत:च निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर करतात तेव्हा निधडे संतापतात. ही त्यांच्या दुकानदारीवर गदा असते. ती सहन करणं त्यांना शक्य नसतं. तेव्हा चिलटय़ाची परस्पर वासलात लावण्याचं कारस्थान ते रचतात. दरम्यान, चिलटे महाराजांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आबा लाखेंचं अचानक लापता होणं त्यांच्या कामी येतं. आबांच्या लापता होण्याशी चिलटे महाराजांचा संबंध असल्याची भूमका ते उठवतात. या अकस्मात उद्भवलेल्या नस्त्या मन:स्तापानं चिलटे महाराज हताश, उद्विग्न होतात. ‘बुनिस’चे कार्यकर्ते दे. व. लोके यांच्याशी चर्चा करून बुवाबाजीची वस्त्रं अंगावरून उतरवायचं ठरवून लोकांसमोर आपलं खरं रूप स्वत:च उघड करायचा निर्णय घेतात. परंतु चिलटे महाराजांची आजवर दलाली करणारे लवंडे आणि मंडळी तसं करू द्यायला त्यांना प्रचंड विरोध करतात. महाराजांना जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल जाते. लोकनेते निधडे यांनाही महाराजांनी लोकांसमोर असं सत्यकथन करणं परवडणारं नसतं. पण चिलटे महाराजांचा निर्णय झालेला असतो. भक्तगणांसह महाराजांचे चमचे व निधडे त्यांच्यावर चाल करून येतात. त्याचवेळी लापता समाजसेवक आबा लाखे चिलटे यांच्यासमोर उपस्थित होतात आणि आपल्या गायब होण्यामागे चिलटे महाराजांचा हात नसल्याची ग्वाही देतात. महाराज सर्वासमक्ष आपली बुवागिरीची वस्त्रं उतरवून भक्तगणांना आपला खरा चेहरा काय आहे, हे सांगून टाकतात. भक्तांनी आपल्या डोळ्यांवर बांधलेली आपल्याविषयीची अंधश्रद्धेची पट्टी ते दूर करतात..
लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडणारे बुवा-महाराज, त्यांच्या नादी लागणारे नादान भक्त, ढोंगी, आपमतलबी राजकारणी आणि आपल्या सोयीनं लोकांच्या समस्यांसंबंधी रान उठवणारे तथाकथित समाजसेवक या सर्वाचाच बुरखा फाडू पाहणारं ‘घालीन लोटांगण’ हे नाटक ज्ञानेश महाराव यांनी अत्यंत उपरोधिक सुरात लिहिलं आहे. यातील प्रत्येक पात्राच्या उक्ती आणि कृतीतली विसंगती व विरोधाभास नाटकात मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अर्थात् हे करत असताना या सगळ्यांचे परस्परांत गुंतलेले हितसंबंध, त्यांची स्वार्थाधता, त्यातून होणारी समाजविघातक शक्तींची अभद्र युती.. हा सारा पट ‘घालीन लोटांगण’मध्ये आहे. परंतु ही खिचडी काहीशी र्अधकच्चीच शिजली आहे. आपल्या एकूण समाजव्यवस्थेला लागलेली ही कीड इतकी वरवरची अन् ढोबळ निश्चितच नाही. या सडलेल्या व्यवस्थेच्या पोटात शिरून तिचं सखोल अंतरंग समजून घेणं गरजेचं आहे. ज्ञानेश महाराव हे पेशानं पत्रकार असल्यानं त्यांना या वास्तवाची निश्चितच कल्पना आहे. परंतु ‘नाटक’ या माध्यमात प्रचलित वास्तवावर उपरोधिक भाष्य करताना त्यांनी जितकं खोलात शिरायला हवं होतं, तितकं ते गेलेले नाहीत. त्यामुळे नाटकाची मांडणी पृष्ठपातळीवरच राहते. तथापि समाजातील या विविध घटकांच्या परस्पर हितसंबंधांचा बुरखा फाडण्याची लेखकाची कळकळ सच्ची आहे. त्याकरता त्यांनी उपरोधाचं अमोघ शस्त्र नाटकात वापरलं आहे. लेखकानं निर्माण केलेली अनेक पात्रं आपल्यालाही आपल्या अवतीभवती वावरताना आढळत असल्याने नाटकाच्या आशय-विषयाशी आपण अनभिज्ञ नाही. मात्र, आपल्याला वरकरणी ‘दिसणाऱ्या’ वास्तवाच्या पल्याडही बरंच काही ‘दडलेलं’ असतं; जे नाटकानं (किंवा अन्य कुठल्याही कलाकृतीनं!) दाखवणं अपेक्षित असतं. तसं ‘घालीन लोटांगण’मध्ये घडताना दिसत नाही.
याचा दोष दिग्दर्शक दशरथ हातिसकर यांच्याकडेही जातो. त्यांनी प्रेक्षकांचं रंजन करण्याच्या नादात नाटकातील आशयाची वीण विशविशीत केली आहे. अनेकदा आशयाशी विसंगत सादरीकरणामुळे नाटकाचा मुख्य हेतू काय? मनोरंजन करणं की प्रबोधन करणं, असाही प्रश्न पडतो. लेखकाला गुंडाळून दिग्दर्शक हातिसकर यांनी नाटकाचं भजं केलं आहे. नाटक मनोरंजक करण्याच्या नादात त्यातला आशय हास्यास्पद करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. पात्रांना त्यांच्या भूमिका समजावून देताना नाटकात अभिप्रेत उपरोध त्यांनी कसा बाहेर काढावा, याचं योग्य मार्गदर्शन न केल्यामुळे नको तिथं पात्रं पचकतात आणि त्यावर प्रेक्षक फिदीफिदी हसतात. पात्रांच्या क्रिया-प्रतिक्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रियांमधील समन्वयाचा अभाव नाटकाला बाळबोध पातळीवर आणतो. काही कलाकार आपण ‘हौशी’ नाटकात काम करतोय, या समजुतीतून आपल्या वाटय़ाचे पंचेस ‘वसूल’ करण्यासाठी धडपडतात.
कलाकारांच्या या उंचसखल अभिनयामुळे एकंदर नाटकही हौसेचा मामला असल्यासारखंच वाटतं. काही कलाकारांच्या उणिवांचा विचार दिग्दर्शकानं केलेला दिसत नाही. केवळ संवाद पाठ असणं आणि ते घडाघडा बोलणं म्हणजे नाटक करणं नव्हे, हे दिग्दर्शकानं त्यांना समजावणं गरजेचं होतं.
स्वत: दशरथ हातिसकरही चिलटे महाराजांच्या मुख्य ‘भूमिके’तून अधूनमधून ‘गायब’ होतात. त्यातल्या त्यात लोकनेते निधडे झालेले राम बुडके आणि कमलाकांत सुर्वे (प्रा. ढेकणे) हे आपल्या भूमिकेचं बेअरिंग शेवटपर्यंत कायम राखतात. चंद्रकांत कोळी यांचं गाणं बऱ्याचदा ऐकू येत नाही. तीच गोष्ट शाहीर झालेल्या कृष्णकांत जाधव यांची. अन्य कलाकारांनी आपल्याला जितपत उमजलीय तितपत आपली भूमिका वठवली आहे. लवराज कांबळी यांचं नेपथ्य कामचलावू आहे. दादा परसनाईक यांनी संगीतातून जमेल तितकी नाटकात रंगत आणायचा प्रयत्न केलेला आहे. प्रकाश निमकर यांची वेशभूषा पात्रांच्या व्यक्तिमत्त्वानुसारी आहे. प्रकाशयोजनेत उल्लेखनीय काही नाही. एकुणात, ‘आज’चा विषय मांडू पाहणाऱ्या ‘घालीन लोटांगण’ नाटकाचं सादरीकरण सुजाण प्रेक्षकाची निराशा करणारं आहे.