रसग्रहण : स्त्री : जगण्याचा पसारा! Print

महेंद्र भवरे , रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

‘चिंध्यांची देवी आणि इतर कविता’ हा नामदेव ढसाळ यांचा काव्यसंग्रह लोकवाङ्मयगृहाने अलीकडेच प्रसिद्ध केला आहे. या सर्व कविता स्त्रीकेंद्री, स्त्रीविषयक अशा स्वरूपाच्या आहेत. त्यात आई, मावशी, बहीण, बायको, प्रेयसी, वेश्या या सर्व रूपांचा विविधांगी आविष्कार झाला आहे. ही सारी नाती कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनून अविभाज्यपणे येतात. स्त्रीगूढत्वाची केंद्रे शोधण्याच्या नादात विविध पातळ्यांवरील तत्त्वज्ञानाच्या अनेक छटा कवितागत अनुभूतीसोबत येतात.
‘चिंध्यांची देवी’ ही साक्षात आईचीच प्रतिमा आहे. तिला पाहिल्यानंतर डोळे पाणावतात, असा भावाविष्कार कवीने केला आहे. स्त्रीच्या संदर्भात मन, शरीर आणि बुद्धीच्या पातळीवरील शोधाची ही संहिता आहे. त्या अनुषंगाने आविष्कृत झालेल्या भावनांची निरीक्षणे हा वाचकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरतो. स्त्रीच्या दु:खभोगांचं, राग-लोभ आणि सोशिकतेचं विशाल विश्व अनुभवाला येते. दु:खापासून तृष्णा आणि वासनेपर्यंत किती स्तर असतात, त्या दु:खाची केंद्रेही मानवी जीवनात कशी खोलवर रुतून बसलेली असतात,  याचा प्रत्यय या कविता देतात. प्राथमिक गणसमाजात स्त्रीला प्रतिष्ठा होती. स्त्रीकडे एक शक्ती म्हणून पाहिले जात होते. अशा स्त्रीशक्तीशी या कवितेने नाळ जोडली आहे.
तुझे डोळे ज्वालेचे आहेत आणि तुझा स्पर्श क्रांतिदायी
तू चंदनाचं लाकूड आणि बाभळीची साल
तू हाडातून खेळणारी वीज आणि पाणी
तुझी सुकी ओली बोटं चराचराला लाव
आणि बघ किमया तुझ्यातल्या निस्तेजपणाची
बोट लावताच प्लेटिनम होईल दगडाचं (पृ. ३२)
असं सामर्थ्यांचं रूप जे शंभर मरणं मरूनही न मरणारं आहे. मात्र आज या रूपाची काय अवस्था आहे, हे स्पष्ट करण्यासाठीच या कविता आकारास आल्या आहेत. ‘सहजपणे सापडावीत खनिजं तशा या आया, सारवायला हव्यात त्यांच्या अंतराच्या भिंती’ या हेतूनेच या कविता दाखल झाल्या आहेत. ‘माझ्या कविते तू टिपून घे समस्त बाईजातीचे दुखणे’ असे कवितेला बजावणारे ढसाळ, ‘बाई गूढ राहिली कायमची माझ्यासाठी’  अशी कबुलीही देतात. त्याचवेळी ‘किती सहजगत्या या पशूला तू माणसात आणलेस’ अशी बायकोबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करतात. साळूबाईच्या अंगणात जमलेल्या कष्टकरी स्त्रियांची मांदियाळी या कवितेत उभी राहते. त्यात राहीबाईसारखी देवदासी असते, विनती, बिन्नी, जहिदा, फ्रिडा, लोरा, सलमा अशा वेश्या असतात, अनुराधा बुधाजी उपशाम पासून मंदाकिनी पाटलांपर्यंत अनेक स्त्रिया आपल्या अस्तित्व आणि जगण्याच्या पसाऱ्यासह कवीच्या नजरेतून साक्षात होतात.
‘चिंध्यांची देवी’तील स्त्रीप्रतिमा विचारतत्त्वाशी जोडूनच साकार होतात. एकीकडे स्त्री हेच एक तत्त्व म्हणून साकार होते, त्याचवेळेस स्त्रीजीवनाला नागवणारी तत्त्वे आणि विचारप्रणालीला ज्या धर्म आणि पुरुषी सत्ताकेंद्रातून उगम पावल्या आहेत त्यांचे एक छिद्रान्वेषी अन्वेषण या कविता वाचकांपुढे ठेवतात. स्त्री-पुरुष नातेसंबंधाचे जंजाळ उकलण्याचा प्रयत्न हा या कवितांचा खास विशेष आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंधांची व्यवस्था कशी टाकाऊ आहे, याचे एक समीकरण ही कविता मांडते.
‘थोडय़ाशा रांडा थोडेसे भडवे दातवण
जे वापरल्यानंतर थुंकून टाकायचे आणि गंगेत दात खंगाळायचे’-  (पृ. ३२)
या समीकरणातून हाती येणारा निष्कर्ष म्हणजे ‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व होय. व्यभिचार करून गंगेत दात खंगाळण्याची सोय पुरुषी व्यवस्थेने करून ठेवली आहे. नातेसंबंधांची निखळ व्यवस्थाच अस्तित्वात नाही. अस्तित्वात आहे ती व्यवस्था कशी हास्यास्पद आहे, हे ठरविण्यासाठी व्यभिचारी रूपकाची योजना या कवितेने केली आहे. पुरुषांनी निर्माण केलेल्या व्यवहारी, कावेबाज आणि चालबाज व्यवस्थेचे रूप या कवितेने अधोरेखित केले आहे.
देहविक्रय करून जगणाऱ्या वेश्यांचे जग हा या कवितांतील प्रबळ विभाग आहे. ढसाळांची कविता वेश्याजीवनाच्या आधारेच समाजजीवनाचे अध:पतन रेखाटते. या जगात स्त्रीला यंत्रवत बनवले जाते. यंत्राद्वारे अधिक उत्पादन काढणे हेच येथे तत्त्व ठरते. भांडवली जगात देहाचा भांडवल म्हणून उपयोग करण्याची पाळी येते, तेथे केवळ श्रमाचीच नव्हे तर स्त्रीत्व आणि मातृत्वाचीही खरेदी होऊ लागते. त्यामुळे नैसर्गिक जगणे जगता येणे केवळ अशक्य होते. ‘वय उंची बांधा यांचेऐवजी हिशोब ठेवला तिनं हाडाचा चामडय़ाचा, चिखलाचा’ असे अनैसर्गिक नरकाचे भीषण वास्तव वाचकांसमोर उभे राहते. नवी भाषा, नवे भाषिक संकेत घडवत आकारास येत असते. ढसाळांच्या कविता अनेक संदर्भ जागृत करतात, विविधार्थी आकलन मांडतात आणि अर्थाची अनेक वलये निर्माण करतात. उदा. ‘आम्ही कपुरी अंगाने आल्यागेल्याच्या तळव्याखाली जाऊन होरपळतो, दे माय धरणी ठाय!’ अशा अभिव्यक्तीतून स्त्रियांपासून शोषितांपर्यंत अनेकस्तरीय होरपळणे येथे दिग्दर्शित होते. त्यातून कवितेचे महात्म्य आपसूकच अधोरेखित होत जाते. वेश्यांच्या जगाचे चित्र पाहिल्यानंतर संवेदना गोठून जाव्यात एवढय़ा या कविता अंगावर येतात.
‘चिंध्यांची देवी’मधील कवितांनी देहमनाचे अनेक विक्रमी जाळे विणले आहे. येथे प्रेम, ओढ, आकर्षण आहे ते वास्तवाच्या भूमीवर. म्हणून येथे रोमँटिक झुले झुलताना दिसत नाहीत.
‘मैथुनापलिकडे जनावराच्या प्रेमाची सीमा नाही
माणूसही जनावरासारखा वागू लागला तर?
ते प्रेम असू शकत नाही माणसासाठी! ’(पृ. ८२)
अशी या कवितेची धारणा आहे. आज प्रेमाचंच काय जीवनाचं आणि जगाचंही पर्यावरण बदललं आहे. म्हणून ‘ती’ गेली तेव्हा येथे पाऊस वगैरे निनादत नाही. तर स्किझोफ्रेनिक, हिंस्र वाऱ्याच्या थोबाडीत लगावून दिली जाते. सूर्याकडे तुच्छतेने पाहून थुंकण्याची क्रिया घडते आणि ती गेली त्या दिवशी कवी स्वत:चा चेहरा काळ्या रंगाने रंगवून घेतो. प्रदर्शनी सौंदर्यवाद आणि हळव्या स्वच्छंदतावादाची धोबीपछाड करण्याचे कार्य ढसाळांच्या कवितेने केले.
‘रमाबाई आंबेडकर’ ही या संग्रहातील सर्वागसुंदर कविता आहे. ऋजुता, निव्र्याज प्रेम आणि कारुण्याचे प्रतीक म्हणून ‘रमाई’ साकार झाली आहे.
‘तुझ्या चेहऱ्यावरलं ते प्रासादिक औदासिन्य
कृष्णहातांच्या चटक्यांच्या कहाण्या सांगता बांगडय़ा
किती गं सहन केलंस हे!
अष्टौप्रहर ती भटीण सरस्वती साहेबांच्या मागे असे!
सवतीमत्सर तुला करताच आला नाही का गं?’- तनामनात विद्या भिनवून, विद्येच्या शिरावर बाबासाहेब उभे राहिले. त्यामुळे शिक्षणविचारांचे ते प्रेरणापुरुष ठरले. त्याच विचाराने समाजमन ढवळून निघाले. पतीच्या या कर्तृत्वात धन्यता मानल्याने रमाईची उंची अधिकच वाढली. ‘तू चंदनाचं मूल्य केलंस कमी’ असे रमाईचे थोरपण. उपसावे लागलेले कष्ट आणि परिस्थितीने पिचून गेलेल्या रमाईने पतीच्या प्रचंड विद्वत्तेशी कधीही सवतीमत्सर केला नाही. अशी महत्पदाला पोहोचलेली ‘रमाई’ येथे साक्षात होते. भूक, दारिद्रय़, शोषण आणि त्याविरुद्धचा संतप्त उद्गार, विद्रोहाचा स्फोटक आविष्कार हे खास लक्षण ढसाळांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. या कवितेत वर्गलढय़ाची, क्रांतीची, क्रांतीला जन्म देणाऱ्या तत्त्वज्ञानाची परिभाषा हे सारे काही वाचकांच्या बुद्धीला ताण देणारे आणि कायम कुरवाळत राहणारे असे खास अनुभूतीक्षेत्र आहे. ढसाळांनी म्हटले आहे की, ‘मी एखादी कविता लिहितो म्हणजे एखादी राजकीय कृतीच करीत असतो. हे सर्व आत्यंतिक गरजेतून घडते.’ ही भूमिका अनेक तत्त्वांच्या स्वीकारातून ठरली असावी. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे बोट धरून चालणारा हा कवी हेगेल, मार्क्‍सची तत्त्वे सहजपणे आपल्या कवितेत पेरत जातो. सामाजिक, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या विकासासाठी अमलात आलेले कुठलेही तत्त्वज्ञान ढसाळांना परके वाटत नाही. विरोधविकासवादापासून बुद्धाच्या अनित्यवादापर्यंतची सर्व तत्त्वे त्यांच्या कवितेत एकवटलेली आहेत. त्यासाठी ‘माझ्या काळ्यासावळ्या लाडक्या मादीस’ ही प्रदीर्घ कविता मुळातूनच वाचली पाहिजे.
‘फुलांच्या सुगंधापेक्षा छान असतो चारित्र्याचा वास’ असे सांगणारा हा कवी आपले चरित्रही नितळपणे मांडतो. ‘माझ्या  चॅप्लिनचा बूटच फाटकातुटका’, ‘माझ्या उकललेल्या टाचात भरता आलं नाही कैलास जीवन’, ‘कैकवेळा मीही वागलो श्वापदासारखा’, ‘र्निबधाच्या सर्वच भिंती मी टाकल्या आहेत पाडून’ एवढी पारदर्शकता या चरित्रात आहे. कवितेने आपणास खराखुरा माणूस बनवून सोडले, देहामनात ‘सहावा सेन्स’ सजविला आणि जगण्याच्या वाटेवर काम, क्रोध, मत्सर, वासना जाळून टाकणारा तथागताचा दगडी ध्यानस्थ पुतळा उभा केला. एवढे कवितेचे आपल्यावर उपकार आहेत, अशी कबुली कवीने दिली आहे.
ढसाळांच्या कवितेत विचार आणि जाणिवांचे स्तर एवढे भक्कम आहेत की, ते खरवडल्याशिवाय गाभ्याचे मार्ग किलकिले होत नाहीत. त्यांची कविता वाचणे म्हणजे एकेक अनुभव अनुभवणे, अनुभवात सखोलपणे गुंतून जाण्यासारखे आहे. त्यात एकदा शिरले की परतीचा मार्ग लवकर सापडत नाही. अशीच ‘चिंध्यांच्या देवी’ची गोष्ट आहे. तथाकथित स्त्रीवादापुढे अनेक प्रश्न या कवितांनी उभे केले आहेत. स्त्रीवादी त्याकडे कशा दृष्टीने पाहतात हे मनोरंजक ठरेल.
पुस्तकाचा उभट आकार, देखणे रूप आणि आशयाची मौलिकता यांमुळे कवितेची श्रीमंती वाढली आहे.
चिंध्यांची देवी आणि इतर कविता
नामदेव ढसाळ
लोकवाङ्मय गृह,
पृष्ठे : १००, मूल्य : ३०० रु.