‘सत्यम’चे संस्थापक राजू यांच्या ८२२ कोटींच्या मुदत ठेवी गोठविल्या Print

अंमलबजावणी संचालनालयाच्या हैदराबाद कार्यालयाची कारवाई
पीटीआय, हैदराबाद/ नवी दिल्ली

चार वर्षांपूर्वी आर्थिक ताळेबंदात  घोटाळे केल्याची कबुली देणाऱ्या व सध्या तुरुंगात असलेल्या बी. रामलिंगा राजू यांच्या मालकीच्या सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस लिमिटेडच्या ८२२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी गोठविण्याचे आदेश बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने दिले. काळा पैसा जमविण्याच्या सत्यम विरोधातील खटल्यात हा निर्णय हैदराबाद कार्यालयाने घेतला आहे. सध्या ही खाती महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र समूहातील महिंद्रू सत्यमच्या ताब्यात आहेत. पूर्वाश्रमीच्या सत्यम कॉम्प्युटरचा संस्थापक-अध्यक्ष असलेल्या राजू यांनी जानेवारी २००८ मध्ये आर्थिक घोटाळ्याची कबुली दिल्यानंतर या कंपनीचा ताबा २००९  मध्ये बोली प्रक्रियेत महिंद्र समूहातील टेक महिंद्रकडे आला आहे. यानंतर तिचे नामकरण ‘महिंद्र सत्यम’ असे करण्यात आले. दरम्यान इतर व्यवहारांप्रमाणे ही मुदत ठेवींची खातीही महिंद्रकडे आली. त्यात ८२२ कोटी रुपयांची रक्कम आहे. टेक महिंद्र आणि महिंद्र सत्यम यांची विलिनीकरण प्रक्रिया अद्याप बाकी आहे.
सत्यममधील आर्थिक गैरव्यवहारानंतर अंमलबजावणी संचालनालयाने राजू तसेच त्याच्या इतर कुटुंबियांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली होती. राजू व त्याच्या इतर नातेवाईंकांनी ‘सत्यम’च्या समभागांच्या फुगविलेल्या मूल्यावर वित्तसंस्थांकडून शेअर तारण ठेऊन तब्बल २,१७१.४५ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन, ते अन्य कंपन्यांमध्ये गुंतविले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी या आधीही संचालनालयाने २५० कोटी रुपये मूल्याच्या राजू कुटुंबियांच्या ३५४ मालमत्तांवर टाच आणली आहे. गोठविल्या गेलेल्या ८२२ कोटींच्या मुदत ठेवी आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय आणि आयएनजी वैश्य बँकेमध्ये कंपनीच्या या मुदत ठेवी आहेत.