संक्षिप्त : ..तर सहाराविरुध्द कारवाईचा ‘सेबी’ला अधिकार : सर्वोच्च न्यायालय Print

  गुंतवणूकदारांकडून जमा केलेले २४ हजार कोटी रुपये परत करण्यासंदर्भात सहारा समूह कागदपत्रांची पूर्तता करीत नसेल तर त्याविरोधात कारवाई करण्याचा भांडवली बाजार नियामक सेबीला सर्वाधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. संपूर्ण परिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून जमा केलेले २४,००० कोटी रुपये सव्याज परत करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सहाराला ३१ ऑगस्ट रोजी दिला आहे. मात्र सहारा समूह यासंदर्भात सहकार्य करीत नसल्याची तक्रार सेबीने सर्वोच्च न्यायालयात केली होती. सहारा समूहाने सेबीला येत्या १० दिवसात सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच माहिती द्यावी, असेही न्यायमूर्तीचे फर्मान असून मुदतवाढीची सहाराची मागणी फेटाळण्यात आली आहे.
देना बँकेची कर्जप्रक्रिया शुल्कात सवलत
  स्टेट बँकेपाठोपाठ राष्ट्रीयकृत देना बँकेने गृह तसेच वाहन कर्जासाठी आकारले जाणारे प्रक्रिया शुल्क कमी केले आहे.  बँकेने येत्या ३१ ऑक्टोबपर्यंत गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क १०० टक्के माफ तर वाहन कर्जासाठीचे प्रक्रिया शुल्क ५० टक्के सवलतीने देऊ केले आहे. बँकेने  ३१ ऑक्टोबपर्यंत आपल्या ‘देना व्यापार वित्त’ योजनेंतर्गत २ कोटी रुपयांपर्यंत असलेली पतपुरवठा योजनाही तसेच ‘देना डॉक्टर+’ ही योजनाही विस्तारली आहे. देना बँकेने गेल्या महिन्यात वाहन, गृह, शिक्षण तसेच वैयक्तिक कर्ज व्याजदर कमी केले होते.
अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाईविरोधात ‘पार्ले’ न्यायालयात
पार्ले बिस्किट्सच्या ‘कच्चा मँगो बाइट’ या उत्पादनाबाबत महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून आव्हान दिले आहे. अन्न व औषध प्रशासनाने ‘कच्चा मँगो बाइट’ या चघळण्याच्या गोळ्यांमध्ये वापरात येणारे लॅक्टिक अॅसिड मानवी आरोग्यास हानीकारक असल्याचा केलेला दावा ‘पार्ले’ला अमान्य आहे. कंपनीच्या प्रवक्त्याच्या मते, खाद्यान्न वर्गवारीतील दही, बाळांचा आहार, पाव, पनीर वगैरेच्या उत्पादन प्रक्रियेतही लॅक्टिक अॅसिडचा वापर होत असतो आणि प्रशासनाने अन्याय्यपणे कंपनीवर कारवाई केली आहे.
टाटा स्काय जोडणी आता ४०० रुपयांत
डिजिटायझेशनची अंतिम मुदत पंधरवडय़ावर येऊन ठेपली असताना, ‘टाटा स्काय’ या डीटीएच सेवेने नव्या ग्राहकांना सेट टॉप बॉक्ससह जोडणी केवळ ४०० रुपयांत देऊ केली आहे, तर उर्वरित रक्कम वर्षभर प्रतिदिन ४ रुपयांच्या हप्त्याने (मासिक १२०) सुलभपणे ग्राहकांना अदा करता येईल. शिवाय अशा ग्राहकांना मराठी व हिंदी मनोरंजन वाहिन्या, हिंदी चित्रपट, मराठी व हिंदी वृत्तवाहिन्या, क्रिडा व संगीत वाहिन्या तसेच लहानग्यांच्या वाहिन्यांचे ‘सुप्रीम स्पोर्ट्स पॅक’ एका महिन्याकरिता मोफत दिले जाईल.