देशाच्या ८० टक्के मनुष्यबळाच्या सुरक्षिततेचा कोणीच वाली नाही Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
व्यावसायिक सुरक्षा आणि स्वास्थ्यविषयक भारतात गेल्या ५० वर्षांपासून कायदेकानू अस्तित्त्वात आहेत, पण या संबंधाने नियामक यंत्रणा मात्र अपुरी किंबहुना अस्तित्त्वातच नाही. देशाच्या संघटित क्षेत्रात जेथे देशाच्या एकूण श्रमशक्तीच्या केवळ १० टक्के लोक रोजगारात आहेत, तेथेही या यंत्रणेला तपास-परीक्षण करणे शक्य होत नाही. एकूणात देशातील असंघटित क्षेत्रातील (सुमारे ८० टक्के) श्रमशक्तीच्या व्यावसायिक स्वास्थ्य आणि सुरक्षिततेचा सध्या कोणी वालीच नाही, अशी उद्विग्नता ‘राष्ट्रीय सुरक्षा परिषदे’चे संचालक व्ही. बी. संत यांनी गुरुवारी येथे बोलताना काढले.
प्रचंड मोठी श्रमशक्ती तीही बहुतांश असंघटित क्षेत्रात राबणारी, श्रम मोबदला किमान राखण्याची प्रवृत्ती, आरोग्य व सुरक्षिततेसाठी प्रतिबंधक उपाययोजना व खर्च करण्याबाबत मालकवर्गाची अनुत्सुकता आणि त्या संबंधाने कामगारवर्गातही दिसून येणारी उदासीनता असे भारतातील व्यावसायिक स्वास्थ्य व सुरक्षेच्या समस्येला अनेकविध पैलू असल्याचे संत यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. नेहरू सेंटर, वरळी येथे आयोजित ‘व्यावसायिक सुरक्षा व स्वास्थ्य- ओएसएच इंडिया २०१२’ या प्रदर्शन आणि परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यूबीएमच्या पुढाकाराने आयोजित या दोन दिवसांच्या प्रदर्शनात थ्रीएम इंडिया, ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल, अन्सेल हेल्थकेअर युरोप, लेकलॅण्ड ग्लोव्हज् अॅण्ड सेफ्टी अॅपरल व हनीवेल सेफ्टी प्रॉडक्ट्स यासारख्या अग्रगण्य सुरक्षा उपकरण निर्मात्या कंपन्या व संस्थांनी सहभाग केला आहे.
मूळात सुरक्षितता हा आपल्या जीवनशैलीचा हिस्सा बनायला हवा; सुरक्षा संस्कृती ही जनमानसाच्या नसानसातच भिनलेली असायला हवी, केवळ कायदे आणि नियम असून चालणार नाही, असेही संत यांनी पुढे बोलताना सांगितले. उद्घाटनप्रसंगी त्यांच्यासोबत यूबीएम-एशियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मायकेल डक हेही उपस्थित होते. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध सुरक्षासामग्री पाहण्यासाठी पहिल्या दिवशी मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले.