‘फर्निचर व सजावट उद्योगातील प्रावीण्याला चालना आवश्यक’ Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
वास्तूरचना, बांधकाम, अंतर्गत सजावट तसेच फर्निचर क्षेत्रातही विदेशी भागीदाऱ्यांना चालना मिळणे येत्या काळात अपरिहार्य दिसत आहे. भारतात या क्षेत्रात उपलब्ध कौशल्य व उद्यमप्रतिभेला विदेशातून प्रचंड संसाधनांचे पाठबळ यातून मिळू शकेल, असा विश्वास यूबीएम इंडेक्स ट्रेड फेअर्सचे व्यवस्थापकीय संचालक लियाकत अली खान यांनी केले. वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित देशातील फर्निचर व अंतर्गत सजावट उद्योगाच्या सर्वात मोठय़ा व्यापार मेळा ‘इंडेक्स ट्रेड फेअर २०१२’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गोवा राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाममंत्री रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर यांच्या हस्ते या व्यापारमेळ्याचे गुरुवारी उदघाटन झाले. यंदाचे हे व्यापारमेळ्याचे २४ वे वर्ष असून, विविध ३०० प्रदर्शकांची दालने, तसेच स्पेन, जर्मनी, इटली, इंडोनेशिया आणि चीन या पाच देशांची स्वतंत्र पॅव्हेलियन्स असा या प्रदर्शनाचा थाट आहे.