‘किंगफिशर’च्या टाळेबंदीला पुन्हा मुदतवाढ Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
वेतन-तिढय़ावर  कर्मचारी व व्यवस्थापनादरम्यान मार्ग निघत नसल्याने किंगफिशर एअरलाईन्सने पुन्हा टाळेबंदी आणखी तीन दिवसांनी वाढविली आहे. हवाई परवाना रद्द करण्याबाबत कंपनीकडून नागरी हवाई महासंचालनालयाला द्यावयाच्या उत्तरासाठीही मुदतवाढीची कंपनीची मागणी आहे.
किंगफिशरच्या टाळेबंदीची मुदत उद्या (२० ऑक्टोबर) संपत आहे. ती २३ ऑक्टोबपर्यंत कायम राखण्याच्या कंपनीच्या प्रस्तावाला नागरी हवाई महासंचलनालयाने हिरवा कंदील दिला आहे. कंपनीवर उद्यापर्यंत तिकिट विक्री करण्यास घातलेली मर्यादाही विस्तारणार आहे. एवढेच नव्हे तर कंपनीचा हवाई परवाना कर रद्द करू नये, अशी विचारणा करणाऱ्या नोटीशीची मुदतही शनिवारीच संपत आहे. मात्र कंपनीने त्यावर उत्तराची मुदतही वाढवून मिळण्याची मागणी केल्याचे समजते. कंपनी चालू महिनाअखेपर्यंत नोटीशीवर उत्तर देणे अपेक्षित आहे.
वेतनतिढा सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांबरोबर सुरू असलेली चर्चा प्रगतीपथावर असून येत्या आठवडय़ात त्यातून मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त करीत किंगफिशर एअरलाईन्सने ६ नोव्हेंबपर्यंत उड्डाणे नियमित होतील, असाही दावा केला आहे. कंपनीची हवाई सेवा १ ऑक्टोबरपासून जमिनीवरच आहे. कंपनीच्या तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना मार्चपासूनचे वेतन मिळालेले नाही. तूर्त मार्चचे वेतन देण्याची तयारी व्यवस्थापनाने दाखविली आहे. मात्र कर्मचारी संघटनेचा आग्रह सर्व सात महिन्यांच्या वेतनासाठी आहे. निदान या कालावधील एकूण वेतनापैकी निम्मे तरी देण्याची उदारता कंपनीने दाखवावी, असेही संघटनेच्या नेत्यांना वाटते. व्यवस्थापनाबरोबर संघटनेची पुन्हा सोमवारी बैठक होणार आहे.