कोलकाता-बंगळुरूपाठोपाठ एअरटेलचे ‘फोर-जी’ पुण्यात दाखल Print

प्रतिनिधी, पुणे
आता इंटरनेटवरून मोठय़ा आकाराच्या फाईल्स आणि व्हिडिओज् एकाच वेळी डाऊनलोड करणे सहज शक्य बनविणाऱ्या ‘एअरटेल फोर-जी एलटीई’ (लाँग टर्म इव्होल्युशन) ही वायरलेस ब्रॉडबँड सेवा ‘भारती एअरटेल’ने गुरूवारी पुण्यात सादर केली. कंपनीने कोलकाता आणि बंगळुरूपाठोपाठ या सेवेसाठी पुणे शहराची निवड केली.
ही सेवा वापरण्यासाठी कंपनीने फोर-जीसाठी ‘यूएसबी डोंगल’ आणि ‘वायफाय मोडेम’ ही उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. यातील प्रत्येक उपकरणाची किंमत ४९९९ रूपये आहे. या उपकरणांबरोबर हवा तो पोस्टपेड प्लॅन निवडून ग्राहकांना फोर-जी सेवा वापरता येईल. डोंगलचा वापर करून लॅपटॉपवर केबल किंवा सेट टॉप बॉक्सविना अडथळा न येता टीव्ही बघता येणार आहे. याबरोबरच हाय डेफिनेशन ऑनलाईन गेमिंगसाठीही ही सेवा उपयोगी पडेल. सध्या फोर-जी एलटीई सेवा चालू शकेल असा मोबाईल हँडसेट उपलब्ध नाही; मात्र असा मल्टिमोड स्मार्टफोन तयार करण्यासाठी कंपनीने ‘क्वालकॉम’ आणि ‘हुवावे’ या कंपन्यांशी भागीदारी केली आहे.
लवकरच फोर-जी सेवेच्या प्रीपेड प्लॅन्सची ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करता येईल. टू-जी नेटवर्कवरील जीपीआरएस सेवेत ५६ केबीपीएस (किलो बाईट्स प्रति सेकंद) इतका डेटा स्पीड मिळतो. तर जीपीआरएसचीच सुधारित आवृत्ती असणाऱ्या ईडीजीई सेवेत १४४ केबीपीएस इतका वेग मिळू शकतो. थ्री-जी सेवेत डेटा स्पीड वाढून २१ एमबी पीएसपर्यंत जाऊ शकतो. तर यात सर्वात वेगवान समजल्या जाणाऱ्या फोर-जी सेवेत डाऊनलोडिंगचा वेग ४० एमबीपीएस, तर अपलोडिंगचा वेग २० एमबीपीएसपर्यंत जाऊ शकतो.