लेलँड डिअर : हिंदुजा व जॉन डिअरचा संयुक्त प्रकल्प Print

‘बॅकहो लोडर’ महाराष्ट्रात दाखल
प्रतिनिधी, पनवेल

हिंदुजा ग्रुपची अग्रगण्य कंपनी अशोक लेलँड आणि जागतिक स्तरावरील नामांकित कंपनी ‘जॉन डिअर’ यांच्या भागीदारीतून साकारलेले ‘लेलँड डिअर ४३५ बॅकहो लोडर’ महाराष्ट्रात दाखल झाले आहे. ‘ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर्स प्रा. लि.’ हे त्यांचे चॅनेल भागीदार असून नवी मुंबईतील पनवेल येथे या लोडरचे महाराष्ट्रातील पहिले ग्राहक संपर्क केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले.  बांधकाम व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जमीन समतल करणे, मोठय़ा प्रमाणावर खोदकाम करणे, अवजड सामान वाहून नेणे यासाठी हा लोडर अतिशय उपयुक्त असून बाजारात सध्या उपलब्ध असणाऱ्या अन्य लोडरपेक्षा तो सर्वार्थाने प्रगत व किफायतशीर आहे, असा दावा लेलँड डिअरचे अध्यक्ष डॉ. व्ही. सुमंत्रन यांनी या उद्घाटनप्रसंगी केला. या लोडरची निर्मिती करताना भारताच्या ग्रामीण भागातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करण्यात आला असून उच्च तंत्रज्ञान, किमान कार्यात्मक खर्च, प्रभावी उत्पादकता, सर्व प्रकारच्या परिस्थितीत काम करण्याची क्षमता, लेलँडच्या एच मालिकेतील दणकट इंजिन, मेकॅनिकल फ्यूएल इंजेक्शन पंप आदी वैशिष्टय़ांमुळे हा लोडर वेगळा ठरला आहे, असे ते म्हणाले. आधुनिक पॉवर सिस्टमचे तंत्र वापरण्यात आल्याने चालकाची बिलकूल दमछाक होणार नाही तसेच चालकाच्या सुरक्षेलाही यात प्राधान्य देण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले. चेन्नईमधील गुमडीपुंडी येथील नवीन उत्पादन केंद्रात या लोडरची निर्मिती होत असून देशभरात सध्या त्याची ६० ग्राहक संपर्क केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पुढील वर्षांच्या अखेरीपर्यंत ही संख्या अडीचशेपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट कंपनीने आखले आहे.