रिझव्‍‌र्ह बँकेची पावले योग्य दिशेने पडावीत : अर्थमंत्री Print

पीटीआय, नवी दिल्ली

रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत दुसऱ्या तिमाही पतधोरणाचा आढावा घेण्यास काही तासांचा अवधी राहिला असतानाच वित्तीय तूट रोखण्यासाठी सरकार दाखवीत असलेल्या गांभीर्याला प्रतिसाद म्हणूनच मध्यवर्ती बँकेची पावले पडतील, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी व्याजदर कपातीबाबत आशावाद व्यक्त केला.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव हे उद्या मंगळवारी पतधोरण आढावा जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी अर्थमंत्र्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण विभागातर्फे नवी दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आगामी पंचवार्षिक कालावधीचा वित्तीय आराखडा जाहीर केला. त्याचा उल्लेख करीत चिदंबरम म्हणाले की, ‘वित्तीय उपाययोजनांसाठी मी नुकतेच भाष्य केले आहे; त्यातून संबंधितांनी अपेक्षित अर्थ काढावा.’ देशात गुंतवणूकसदृश्य वातावरण निर्माण होण्यास लाभदायी ठरणाऱ्या आगामी पाच वर्षांतील वित्तीय उपाययोजनांची त्यांनी सोमवारी घोषणा केली.
सुब्बराव हे गेल्याच आठवडय़ात राजधानीत अर्थमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. पतधोरण तयारीसाठीही ही त्यांची अल्प कालावधीतील दुसरी भेट होती. गेल्या सलग ११ तिमाहीत दाखविलेल्या कडव्या धोरणाला सुब्बराव मुरड घालतील काय, हे उद्या स्पष्ट होईलच.
१३ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष राहिलेल्या डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशींनुसार तयार केलेला  पंचवार्षिक वित्तीय आराखडा चिदम्बरम यांनी जाहीर केला. चालू आर्थिक वर्षांत वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६.१ टक्क्यांपर्यंत जाऊ द्यायची नसेल तर निर्गुतवणूक प्रक्रिया, कमी अनुदान यांचा मार्ग चोखाळावा लागेल, असे या समितीने सुचविल्ेल्या शिफारशींच्या कालबद्ध अंमलबजावणीचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. चालू आर्थिक वर्षांसाठी निश्चित केलेले निर्गुतवणुकीचे उद्दिष्ट अपेक्षित कालावधीत पूर्ण केलेच जाईल असा विश्वास व्यक्त करताना, येत्या पाच महिन्यात ३० हजार कोटी रुपयांची निधी उभारला जाईल,  असा चिदंबरम यांनी विश्वास व्यक्त केला.