संक्षिप्त व्यापार : पु. ना. गाडगीळ पेढी मुंबईकरांच्या Print

सेवेत लवकरच!
पुण्यातील नामवंत सराफी पेढी ‘पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स’ने सीमोल्लंघन करीत थेट देशाची आर्थिक राजधानी मुंबईत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. प्रभादेवी येथील रचना संसदसमोर मोक्याची जागा तब्बल तीन हजार चौरस फुटाच्या क्षेत्रात विस्तारलेल्या या शोरूमचे उद्घाटन येत्या ४ नोव्हेंबरला शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. आजवर मुंबईतील सराफी पेढय़ांनी राज्यात इतरत्र विस्तार केला आहे, पण पुण्यातील पेढय़ांनी मुंबापुरीत प्रवेश केल्याचे ऐकिवात नाही. या पाश्र्वभूमीवर एक मोठे धाडस करून हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आपल्याकडून गाठला जात असल्याचे पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्सचे भागीदार अजित गाडगीळ आणि अभय गाडगीळ यांनी सांगितले.
राज्यभरात विश्वासार्हतेचे पाठबळ लाभलेल्या आपल्या सराफ पेढीचे मुंबईतही असंख्य ग्राहक असून, त्यांची सोय आता दिवाळीच्या तोंडावर सुरू होत असलेल्या मुंबईच्या नव्या दालनातून होईल, असेही त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.  सोने, चांदी व हिरे यांच्यासाठी स्वतंत्र विभाग असलेल्या या दालनाचे संपूर्ण कामकाज कुटुंबाचाच घटक असलेल्या कौस्तुभ मराठे आणि मंजिरी मराठे पाहणार आहेत, असेही अजित गाडगीळ यांनी स्पष्ट केले.
मोबाईलवर ‘नवायुष’ हेल्थ-अ‍ॅप
वेब आणि मोबाइलवर केवळ व्यापारी उलाढालीच का व्हाव्यात, एखाद्याचे आयुष्य वाचवू शकेल अशा महत्त्वाच्या औषधाच्या उपलब्धतेचीही माहितीही या माध्यमातून का दिली जाऊ नये. इंटरअ‍ॅक्टिव्ह सिस्टीम टेक्नॉलॉजीज (इन्सिस्ट) या कंपनीने नेमकी हीच गरज पूर्ण करताना असे हेल्थकेअर मोबाईल अ‍ॅप्लिकेशन ‘नवायुष’ (Navayush.com) या नावाने विकसित केले आहे. गरजवंत रुग्णांना वा त्यांच्या नातेवाइकांना आसपासच्या दुकानात त्यांना हवे असलेले औषध उपलब्ध नसेल तर ते देशभरात कुठे उपलब्ध आहे याची इत्थंभूत व अद्ययावक माहिती या अ‍ॅपद्वारे दिली जाते.
औषध निर्माते, वितरक, औषधांचे किरकोळ विक्रेते, औषधविक्री दुकाने आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून ‘नवायुष’ची सेवा सध्या मुंबईपुरती आणि आगामी चार महिन्यात संपूर्ण देशभरात कार्यान्वित होऊ घातली आहे.