ग्राहकांसाठी दिलासादायक Print

बँकाच्या दृष्टीने रिझव्‍‌र्ह बँकेचे तिमाही पतधोरण यंदा काहीसे कठोर असले तरी ग्राहकांना दिलासा देणाऱ्या अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. फार मोठी व्याजदर कपात न करून मध्यवर्ती बँकेने तमाम गृह, वाहनकर्जदारांची निराशा केली असली तरी बँक दफ्तरी त्यांना भरावे लागणाऱ्या ‘नो यूअर कस्टमर- केवायसी’ प्रक्रिया सुटसुटीत करण्याचे पाऊल उचलले आहे. यासाठी सध्याच्या अटी शिथील करून त्यात अधिक साधेपणा आणला जाईल, असेही नमूद करण्यात आले. मात्र ते आंतरराष्ट्रीय दर्जा आणि गैरमार्गाने देशाबाहेरून निधी आणण्यासाठी बंधक असलेल्या कायद्याला अनुसरूनच असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे जेथे व्यवहार होतात त्या एटीएम तसेच अन्य खरेदी व्यासपीठावर ‘यूआयडी यंत्रणा- आधार’चे सहकार्य घेण्यात येणार आहे. यासाठी रिझव्‍‌र्ह बँक नमुनेदाखल प्रकल्प राबविणार असून त्याचा शुभारंभ येत्या १५ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत होईल. याद्वारे बँका ‘आधार कार्डा’तील विस्तृत माहिती तसेच कोडसह असलेली माहिती उपयोगात आणू शकतील.
बनावट नोटा नेस्तनाबूत करण्यासाठी आढावा
बनावट नोटांमुळे खातेदार आणि बँक कर्मचारी यांच्यात नेहमी वाद होत असतात. बँकांच्या तपासणीत मात्र बँक ग्राहकांकडून आलेल्या या नोटा बनावट असल्याचे अनेकदा सिद्ध होते. अशावेळी त्या नोटा तेथेच नाहीशा केल्या जातात; अथवा ग्राहकाला नव्याने भरणा करण्यास सांगितले जाते. ग्राहकाच्या दृष्टीने  जिकरीच्या ठरणाऱ्या या प्रक्रियेचा ठोस आढावा घेण्यात येत असून अशा बनावट नोटा यंत्राद्वारे कशा नेस्तनाबूत करता येतील, याचा विचार रिझव्‍‌र्ह बँक करीत असल्याचे डेप्युटी गव्हर्नर चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले.  सर्व बँकांचे अभिप्राय नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात जाणून घेऊन व तशा उपाययोजना केल्या जातील, असे ते म्हणाले. देशभरात मोठय़ा प्रमाणात बनावट नोटा तयार केल्या जात असून त्यावर नियंत्रण ठेवणे हे कायदा सुव्यवस्था हाताळणाऱ्यांचे काम आहे, असे नमूद करून चक्रवर्ती यांनी अर्थव्यवस्थेत कमीत कमी बनावट नोटा कशा असतील, याला मध्यवर्ती बँकेचे प्राधान्य असेल, असेही सांगितले.
बनावट नोटांबद्दल रिझव्‍‌र्ह बँकने मेमध्येही काही नियम जारी केले होते. यानुसार ५०० व १००० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्यास त्या त्वरित नष्ट करण्याचे बँकांना सूचित केले गेले आहे.