नाराज बाजारात मोठी घसरण Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
अल्पशा व्याजदर कपातीने तमाम अर्थव्यवस्थेची निराशा करणाऱ्या भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकासह व्याजदराशी संबंधित बँक, बांधकाम तसेच वाहन कंपन्यांचे समभाग मंगळवारी चांगलेच आपटले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानुसार कर्ज पुर्नबांधणीसाठी अधिक अतिरिक्त तरतुद करावी लागणार असल्याने एकूणच बँक समभाग तब्बल ६ टक्क्यांपर्यंत खाली आले होते.
रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षित व्याजदराच्या आशेवर कालची तेजी सुरुवातीच्या सत्रातही कायम राखणारा ‘सेन्सेक्स’ दिवसअखेर मात्र तब्बल २०० अंशांनी आपटला. यामुळे १८,५०० च्याही खाली आलेला मुंबई निर्देशांक त्याच्या सव्वा महिन्याच्या नीचांकावर गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ही ६७.७० अंश घसरणीमुळे ५,६०० ची पातळी सोडली. दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजार ५,५९७.९० वर विसावला.
केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांची घोषणा केल्यानंतर सेन्सेक्स १८,००० पासून ४ ऑक्टोबपर्यंत १९,००० पर्यंत झेपावला होता. मंगळवारी सत्राच्या सुरुवातीला सेन्सेन्समध्ये ५० अंशांपर्यंत वाढ नोंदली जात होती. मात्र सकाळी ११ वाजता अपेक्षित व्याजदर कपात न झाल्याने व्याजदराशी संबंधित सर्व कंपन्यांचे समभाग गडगडायला लागले. यामुळे सेन्सेक्सही घसरला. निफ्टीही दुपारच्या सत्रापूर्वीच ५,६३० च्याही खाली आला होता. दिवसअखेर दोन्ही प्रमुख निर्देशांकातील घसरण विस्तारत गेली. ‘सेन्सेक्स’ यापूर्वी २० सप्टेंबर रोजी आजच्या पातळीवर होता.