यंदा दिवाळीत ४०० कोटींच्या कर्जवितरणाचे ‘बजाज फिनसव्‍‌र्ह’चे उद्दिष्ट Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
ग्राहकोपयोगी उपकरणे व वस्तूंच्या खरेदीसाठी शून्य टक्के अर्थसहाय्याच्या योजनेची जनक असलेल्या बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेड या वित्तीय कंपनीला यंदाच्या दिवाळीत आपल्या कर्जपुस्तिकेत तब्बल ३० टक्के वाढीची अपेक्षा आहे. कंपनीने सणासुदीनिमित्त १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर कालावधीसाठी सुरू केलेल्या ‘स्पार्कलिंग दिवाळी’ या विशेष योजनेतून या महिनाभराच्या कालावधीत सहा लाखांहून अधिक ग्राहक मिळविण्याबरोबरच, कर्ज वितरण सध्याच्या १५०० कोटींवरून १९०० कोटी रुपयांवर जाणे कंपनीला अपेक्षित आहे. या दिवाळी योजनेचे वैशिष्टय़ म्हणजे ग्राहकांच्या खरेदीचे स्वरूप आणि इच्छा-आकांक्षा यावर आधारीत जशी हवी तशी सोयीस्कर योजना कंपनीने प्रस्तुत केली आहे. या विशेष योजनेसाठी कंपनीने सर्व अग्रगण्य निर्मात्यांशी तसेच किरकोळ विक्रेत्यांबरोबर भागीदारी केली असून, ग्राहकांना आपल्या हव्या तशा तऱ्हेने व परवडेल अशा स्वरूपात यंदाच्या दिवाळीत टीव्ही, फ्रीज, कॉम्प्युटर वा घरासाठी अन्य वस्तूंची सुलभ कर्जसहाय्यासह खरेदी करणे शक्य होईल, बजाज फिनसव्‍‌र्ह लेंडिंगच्या ग्राहक वित्त विभागाचे अध्यक्ष देवांग मोदी यांनी सांगितले. शिवाय अशा ग्राहकांसाठी कंपनीने स्पर्धेचेही आयोजन केले असून, सहभागींना २०० आयपॅड्स आणि फोक्सव्ॉगन जेट्टा जिंकण्याची संधीही देऊ केली आहे.