..अर्थवृद्धीचे आव्हान एकटय़ानेच पेलू Print

अर्थमंत्र्यांची हताशा

अर्थमंत्रालयाने वित्तीय तुटीला आवर घालणारा बृहद् आराखडा सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर करून, अर्थवृद्धीबाबत गांभीर्य दाखविले असतानाही, रिझव्‍‌र्ह बँकेने सहामाही पतधोरण आढाव्यात वाढत्या महागाईला (चलनफुगवटय़ाला) प्राधान्य देत व्याजदर जैसे थे ठेवल्याबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रिया अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सध्याची घडी ही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता मौन बाळगण्याची आहे असे म्हणतानाच चिदम्बरम यांनी उपरोधिक सूरात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांच्या धोरणात्मक कडवेपणाबद्दल हताशा व्यक्त केली, त्याचे हे शब्दश: रूप..
महागाईला आवर घालण्याइतकेच आर्थिक विकासाला चालना देणे हे देखील मोठे आव्हान आहे. अर्थवृद्धीचे हे आव्हान सरकारने एकटय़ानेच पेलायचे असे कुणाला वाटत असले, तर आपण एकटय़ानेच मार्गक्रमणा करू. मी (रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर सुब्बराव यांच्या) निवेदनातील शेवटचा परिच्छेद वाचलेला नाही, पण त्यातून भविष्याविषयी आशावाद असलाच, तर माझ्याही नजरा भविष्याकडे लागल्या आहेत. अनेक प्रसंगी बोलून व्यक्त होणे उत्तम ठरते, तर एकाद प्रसंगी नि:शब्द प्रतिसादच योग्य ठरतो. सध्याची घडी ही गप्प राहण्याचीच आहे.’